शैलेश नागवेकर
‘एका पायावर मी कोणतीही गोष्ट करायला तयार आहे’,असे आपल्याकडे म्हटले जाते. याचा शब्दशः अर्थ घेतला जात नसतो, पण ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटपटू ग्लेन मॅक्सवेलबाबत मात्र हे अक्षरशः खरे ठरले. जिद्दीला पेटलेला खेळाडू काय करु शकतो, हे मॅक्सवेलने विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत अफगाणिस्तानविरुद्ध मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर झालेल्या सामन्यातून दाखवून दिले. अद्भूत.. अविस्मरणीय,
अफलातून आणि अवर्णनीय असे सर्व शब्द फिके पडावेत, असा चित्तथरारक आविष्कार मंगळवारी मॅक्सवेलने घडवला. खरे तर २९१ धावांच्या आव्हानासमोर पाचवेळा विश्वकरंडक जिंकलेल्या ऑस्ट्रेलियाची सात बाद ९१ अशी अवस्था झाली, तेव्हा हा सामना ऑस्ट्रेलिया जिंकेल, यावर कोणाचाच विश्वास बसला नसता; पण टायगर जिंदा है...असे मॅक्सवेल कदाचित अगोदर स्वतःला सांगत असेल आणि नंतर त्याच्या बॅटमधून चौकार
, षटकाराच्या डरकाळ्या फुटत होत्या. आत्तापर्यंतच्या विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेच्या इतिहासातील कदाचित उलटवार करणारी द्विशतकी खेळी प्रथमच सादर झाली असावी. पण याचे माहाम्य तेवढ्यावरच थांबत नाही. ही खेळी करत असताना त्याचा पाय दुखावला होता. तो धावूच काय, चालूही शतक नव्हता. अशा परिस्थितीत एका पायावर उभे राहात त्याने केलेली फटकेबाजी थक्क करणारी होती. २१ चौकार १० षटकारांची ती फटकेबाजी नव्हती, तर त्सुनामी होती.
मुळात मॅक्सवेलसारखे फलंदाज कधी काय करतील, याचा नेम नसतो म्हणूच ते सर्वात धोकादायक असतात. याच विश्वकरंडक स्पर्धेत सुरुवातीला त्याचा वरचा क्रमांक होता; परंतु एका सामन्यात सुमार फटका मारुन विकेट गमावल्यामुळे त्याला सहावा क्रमांक देण्यात आला. पण त्याच्यावरचा विश्वास संघव्यवस्थापनाने कायम ठेवला, यावरुन मॅक्सवेलची उपयुक्तता सिद्ध होते. मंगळवारी मनाला वाटेल तो चेंडू, मनाला आवडेल त्या ठिकाणी भिरकावत होता;
पण याच मॅक्सवेलला एका `आयपीएल’मध्ये एकही षटकार मारता आला नव्हता, ही आकडेवारी सांगितली तर कोणाचा विश्वास बसणार नाही. दोन दिवसांपूर्वीच विराट कोहलीच्या ४९व्या शतकाच्या गोडव्याची चव जिभेवर रेंगाळत असताना ही शाही मेजवानी त्याने सादर केली. पण दुसऱ्या बाजूला भरल्या ताटावरून उठण्याची वेळ अफगाणिस्तानची झाली. अगोदर गतविजेते इंग्लंड, मग पाकिस्तान आणि श्रीलंका अशा माजी विजेत्यांना धक्का दिल्यानंतर मंगळवारी पाच वेळा विजेतेपद मिळवणाऱ्या ऑस्ट्रेलियाचीही शिकार त्यांना सन्मानाने मिरवता आली असती;
पण तसे झाले नाही. अफगाणिस्तानच्या गोलंदाजांनी केलेल्या चुका फार मोठ्या होत्या. याचे कारण मॅक्सवेल एका पायाने लंगडत होता. तो केवळ बॅट फिरवणार हे उघड होते. त्यामुळे त्याला पायाची हालचाल करायला लागेल, असे त्याच्या शरीरापासून दूर रहाणारे चेंडू टाकायला हवे होते; पण अफगाणचे गोलंदाज जायबंदी वाघाच्या जबड्यातच हात घालत राहिले. अर्थात अफगाणिस्तान संघाने जी टक्कर दिली, ती कौतुकास्पदच आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.