Mumbai Cricket Association : अनेक दशकांपासून मुंबई क्रिकेट संघटनेची (एमसीए) प्रत्येक निवडणूक राजकीय पार्श्वभूमीवर नेहमीच चर्चेत राहिलेली आहे. येत्या २० तारखेला होणारी निवडणूकही याला अपवाद नसेल. उमेदवारांचे अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी नाट्यमय घडामोडी घडल्या आणि राष्ट्रवादी भाजप शिवसेना यांचे नेते एकत्र येऊन निवडणूक लढणार असल्याचेही स्पष्ट झाले.
माजी अध्यक्ष आणि भाजपचे नेते आशिष शेलार यांनी आज अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केला. शरद पवार-शेलार गटात उद्धव ठाकरे यांचे स्वीय सचिव मिलिंद नार्वेकर, राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड आणि आमदार प्रताप सरनाईक यांचे पुत्र विहंग सरनाईक हे कार्यकारी सदस्य आणि मुंबई लीगच्या पदासाठी निवडणूक लढवणार आहेत.
पवार - शेलार गट तयार झाल्याचे आणि त्यांच्या उमेदवारांची नावे असलेले पत्र आज प्रसिद्धिमाध्यमांसमोर आले. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी शरद पवार यांच्या नावाने वेगळा गट तयार करण्यात आला होता, परंतु आता त्यांचे नाव बदलण्यात आले असून मुंबई क्रिकेट ग्रुप करण्यात आले. माजी कसोटीपटू संदीप पाटील या गटातून अध्यक्षपदाचे उमेदवार आहेत. त्यांच्या गटाकडून सर्व पदांसाठी अगोदरच उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत.
तिरंगी लढत ?
मुंबई क्रिकेट संघटनेमध्ये पारंपरिक बाळ महाडदळकर गटाचे नेहमीच वर्चस्व राहिलेले आहे. यंदा त्यांच्या गटाकडून सचिव, खजिनदार आणि कार्यकारी सदस्य पदासाठी चार अशा सहा उमेदवारांनी अर्ज दाखल केले. त्यामुळे यंदाची निवडणूक तिरंगी होण्याची शक्यता आहे. आज अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवशी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार विविध पदांसाठी मिळून १०७ जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. उद्या अर्जांची छाननी होणार असून, १४ तारखेला उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा अखेरचा दिवस असून, तेव्हाच खरे चित्र स्पष्ट होणार आहे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.