मुंबई : अशक्य ते शक्य अशा प्रकारात मोडणाऱ्या अवनीने पॅरालिंपिकमध्येच (paralympics) नेमबाजीत सुवर्णपदक जिंकले. संपूर्ण देशाला तिचा अभिमान वाटत असताना माजी ऑलिंपियन सुमा शिरूरला आपण धन्य झाल्याची भावना निर्माण झाली. नेमबाजांसाठी गुरुकुल असलेल्या सुमा शिरूरची पनवेलमध्ये (panvel) अकादमी आहे. तेथे मनू भाकरसह अवनीच्याही गुणवत्तेला पैलू पडले आहेत.
पॅरालिंपिकमध्ये सुवर्णपदक हे आमच्या दोघींचे अंतिम लक्ष्य होते. तिने केलेली अपार मेहनत सार्थकी लागली. या आव्हानासाठी आम्ही गेल्या दोन वर्षांपासून मेहनत करत होतो; पण पॅरालिंपिकसारख्या स्पर्धेत तुम्ही भावना आणि दडपण याचा कसा सामना करता हे महत्त्वाचे असते, असे सुमाने सांगितले.
सुमा म्हणाली, अंतिम फेरीत तिने सुरुवात चांगलीच केली होती. मी तिच्या पाठीमागेच बसले होते. एक दोन वेळा अवनीच्या जवळ जाऊन तिचा आत्मविश्वास कायम ठेवण्याचा प्रयत्न केला. २० शॉट्सनंतर तिचा आत्मविश्वास वाढला आणि एखादे मोठे भव्यदिव्य यश मिळवण्यासाठी अंतर्मनातून येणारी हाक महत्त्वाची असते.
२०१५ मध्ये नेमबाजी सुरू करणारी अवनी २०१८ मध्ये सुमा शिरूरच्या पनवेल येथील लक्ष्य शूटिंग क्लब या अकादमीत आली आणि तेथून तिचा हा प्रवास सुरू झाला. प्रथम आमचे उद्दिष्ट पॅरालिंपिकमध्ये पात्रता मिळवणे होते आणि नंतर सुवर्णपदकाचे लक्ष्य होते, असे सुमाने सांगितले. ती दिव्यांग आहे, व्हीलचेअरवर असते; परंतु इतर नेमबाजांपेक्षा ती वेगळी आहे, असे आम्ही तिला कधीच वाटू दिले नाही, असे सुमा म्हणाली.आमची ही अकादमी पहिल्या मजल्यावर आहे; परंतु व्हिलचेअरवर असलेल्या अवनीला तिचे नेमबाज सहकारी व्हीलचेअर उचलून पहिल्या मजल्यावर आणायचे. तेव्हा ती स्मितहास्याने सर्वांना जिंकायची. आता आम्ही पॅरा खेळाडूंसाठी वेगळी सुविधा केली आहे, अशी माहिती सुमाने दिली.
कशी घडली अवनी...
राजस्थानमध्ये जन्मलेली अवनी १३ वर्षांची असताना २०१२ मध्ये एका रस्ता अपघातात तिला जबर दुखापत झाली. या अपघातात तिच्या पाठीचा मणका पूर्णपणे बाद झाला. त्याचा परिणाम तिच्या पायावर झाला. तेव्हापासून ती व्हीलचेअरवर आहे. कमालीची जिद्द बाळगून असलेल्या अवनीने शिक्षणातही प्रगती केली. ती सध्या कायद्याचा अभ्यासक्रम पूर्ण करत आहे; पण त्याचबरोबर नेमबाजीतही कारकीर्द घडवत आहे. शिक्षण, नेमबाजी अशा दोन्ही आघाड्यांवर प्रगती करत असताना गतवर्षी कोरोनामुळे तिच्यासाठी अधिक अडचणीचे ठरले. या काळात तिचे रुटिन बिघडले होते. लॉकडाउनमुळे ती नेमबाजीचा सराव तर करू शकत नव्हती; परंतु तिच्यासाठी नित्याची असलेली थेरपीसुद्धा ती घेऊ शकत नव्हती. या कठीण काळात माझे थेरपिस्ट जयपूरपर्यंत आले आणि माझ्यासोबत राहिले. त्यामुळे मी या टोकियो पॅरालिंपिक स्पर्धेत खेळू शकले, असे अवनीने सांगितले.
कशी मिळाली प्रेरणा...
मोठ्या अपघातामुळे आपण अपंग झालो आहोत, याचे दुःख न करता अवनी त्यातूनही चांगले काही तरी करण्याचा मार्ग शोधत होती. भारताचा पहिलावहिला वैयक्तिक ऑलिंपिक सुवर्णपदक विजेता अभिनव बिंद्राचे आत्मचरित्र तिच्या हाती पडले आणि आपणही नेमबाजी होण्याची प्रेरणा तिने घेतली. त्या अगोदर अवनीने वेगवेगळे खेळ खेळण्याचा प्रयत्न केला. तिचा ओढा तिरंदाजीकडे होता; पण बिंद्राला आयडॉल मानून ती नेमबाजीकडे वळली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.