युरो करंडक फुटबॉल स्पर्धेच्या महत्त्वाच्या उपांत्यपूर्व टप्प्यास शुक्रवारपासून (ता. ५) सुरुवात होत आहे. पहिल्याच लढतीत जर्मनीसमोर स्पेनचे तगडे आव्हान असून घरच्या मैदानावर आगेकूच राखण्यासाठी यजमान सज्ज आहेत.
घरच्या मैदानावर चाहत्यांच्या पाठबळावर ज्युलियन नागल्समन यांच्या मार्गदर्शनाखालील यजमान संघाने आठ वर्षांतील सर्वोत्तम कामगिरी यंदा बजावली आहे. राऊंड ऑफ १६ फेरीत त्यांनी डेन्मार्कचे कडवे आव्हान २-० फरकाने परतावून लावले. मात्र, यावेळी लुईस दे लाफ्लुएन्टे यांच्या मार्गदर्शनाखालील स्पेनविरुद्ध खडतर आव्हान जर्मनीसमोर आहे.
स्पेनने नवोदित जॉर्जियाला ४-१ फरकाने नमवून आगेकूच राखली. दोन्ही संघांचा फॉर्म लक्षात घेता, शुक्रवारी तुल्यबळ लढत अपेक्षित आहे. स्पेनच्या युवा खेळाडूंनी शानदार खेळ केलेला आहे. यामध्ये स्पर्धेतील सर्वांत युवा खेळाडू १६ वर्षीय लामिन यमाल व २१ वर्षीय निको विल्यम्स यांचा समावेश आहे. फाबियन रुईझ यानेही चमकदार कामगिरी केलेली आहे. एकंदरीत स्पेनचे आक्रमण विरुद्ध जर्मनीचा बचाव यांच्यात संघर्ष अपेक्षित आहे.
जर्मनीला ३६ वर्षांची प्रतीक्षा
जर्मनीविरुद्ध स्पेन युरो करंडकात ३६ वर्षे अपराजित आहे. स्पॅनिश संघाविरुद्ध जर्मनीला १९८८ नंतर विजय नोंदविता आलेला नाही. स्पेनने जर्मनीला २००८ मधील युरो करंडक अंतिम लढतीत हरविले होते, नंतर २०१० मधील विश्वकरंडक उपांत्य लढतीतही स्पॅनिश संघ जर्मनीला भारी ठरला. चार वर्षांपूर्वी नेशन्स लीगमध्ये स्पेनने जर्मनीचा ६-० असा धुव्वा उडविला होता. ‘‘मी कोणाचा अपमान करू इच्छित नाही; पण स्पर्धेतील आमचा संघ सर्वोत्तम आहे,’’ असा आत्मविश्वास स्पेनचे मार्गदर्शक लुईस दे ला फ्लुएन्टे यांनी व्यक्त केला.
चौथ्या विजेतेपदासाठी दावेदार
स्पेनने युरो करंडक यापूर्वी तीन वेळा पटकावला आहे. आता ते चौथ्यांदा दावेदार आहेत. जर्मनीचा संघही तीन वेळा युरोपातील या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत विजेता ठरलेला आहे. घरच्या मैदानावर चौथ्यांदा करंडक जिंकण्यासाठी तेसुद्धा प्रयत्नशील आहेत.
आमने-सामने
- एकूण सामने २६
- जर्मनी विजयी ९
- स्पेन विजयी ८
- बरोबरी ९
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.