अहमदाबाद : राष्ट्रकुल स्पर्धेतील सहभागी भारतीय संघाची सदस्य खेळाडू मयुरी लुटेने राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेमध्ये दमदार पदार्पण करताना पदकांची हॅटट्रिक साजरी केली. तिने सोमवारी टीम स्प्रिंट प्रकारात महाराष्ट्राला सुवर्णपदक जिंकून दिले. आंतरराष्ट्रीय सायकलिस्ट मयुरी लुटे, शशिकला आगाशे आणि आदिती डोंगरे यांनी टीम स्प्रिंट प्रकारात सुवर्णपदक पटकावले. यासह महाराष्ट्राच्या नावे सायकलिंगमध्ये तिसऱ्या पदकाची नोंद झाली.
सायकलिंगमधील थ्री लॅपच्या या प्रकारात महाराष्ट्र संघाने ५०३ गुणांची कमाई केली. यातून मयुरीला स्पर्धेत तिसरे पदक आपल्या नावे करता आले. आता तिच्या नावे वैयक्तिक दोन पदकांसह एका सांघिक पदकाचा समावेश आहे. तिने दोन सुवर्ण आणि ब्राँझपदक जिंकले आहे.
आदर्श भोईरला सुवर्णपदक
राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत ट्रॅम्पोलिन जिम्नॅस्टिक्स स्पर्धेला सोमवारी सुरुवात झाली. ट्रॅम्पोलिन प्रकाराचा प्रथमच राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत समावेश करण्यात आलेला आहे. या प्रकारातील खेळाडूंच्या कामगिरीकडे महाराष्ट्राचे लक्ष लागलेले आहे. आदर्श भोईर याने सुवर्णपदक जिंकून पदक तालिकेत महाराष्ट्राची स्थिती अधिक भक्कम केली. या स्पर्धेत आदर्श याने ५०.१४० गुणांची कमाई करत सुवर्णपदक जिंकले. एसएससीबीच्या मनू मुरली याने ४६.००० गुण घेत रौप्यपदक पटकावले. गोव्याच्या अभिजीत लोखंडे याने ४५.७९० गुणांची कमाई करुन ब्राँझपदक संपादन केले.
कोमलची ‘पॉवरफुल्ल' कामगिरी
अहमदनगरची खेळाडू कोमल वाकळे हिने ८७ किलो गटात सुवर्णपदक जिंकले आणि वेटलिफ्टिंग मध्ये महाराष्ट्रास सोनेरी यश मिळवून दिले. तिने स्नॅचमध्ये ९४ किलो, तर क्लीन व जर्कमध्ये ११६ किलो असे एकूण २१० किलो वजन उचलले. स्नॅचमध्ये ती दुसऱ्या स्थानावर होती. मात्र क्लीन व जर्कमध्ये तिने सर्वोत्तम कामगिरी करीत सुवर्णपदक खेचून आणले.
खो-खोत सुवर्णपदकाच्या दिशेने
महाराष्ट्राच्या महिला आणि पुरुष खोखो संघांनी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत अंतिम फेरीत धडक मारुन सुवर्णपदक जिंकण्याच्या आशा पल्लवित केल्या आहेत. दोन्ही संघ अंतिम फेरीत दाखल झाल्यामुळे एक पदक तर निश्चित झाले आहे. परंतु, दोन्ही संघांनी स्पर्धेत निविर्वाद वर्चस्व गाजवले असल्याने दोन सुवर्ण पदक जिंकण्याच्या आशा टीम व्यवस्थापनाला वाटत आहेत. दोन्ही गटातील अंतिम सामना मंगळवारी होणार आहे.
महिला गटातील पहिल्या उपांत्य लढतीत महाराष्ट्र महिला खोखो संघाने दिल्ली संघाचा एक डाव आणि ८ गुणांनी पराभव करुन अंतिम फेरी गाठली. पुरुष गटातील पहिल्या उपांत्य लढतीत महाराष्ट्र संघाने कर्नाटक संघावर एक डाव आणि ४ गुणांनी (२६-१०) विजय नोंदवत अंतिम फेरीत प्रवेश केला. या सामन्यात महाराष्ट्र संघाने वर्चस्व गाजवले. अविनाश देसाई, प्रतिक वाईकर, लक्ष्मण गावस, अक्षय भामरे, निहार दुबळे, दिलराज सेनगर, रामजी कश्यप या खेळाडूंनी लक्षवेधक कामगिरी बजावत सामना गाजवला.
तलवारबाजीमध्ये एक रौप्य, एक ब्राँझ
राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत तलवारबाजी खेळात ईप्पी प्रकारात महाराष्ट्राच्या पुरुष संघाने रौप्यपदक, तर महाराष्ट्राच्या मुलींच्या संघाने फॉइल प्रकारात ब्राँझपदक पटकावले. तलवारबाजी स्पर्धेत इप्पी प्रकारात महाराष्ट्र पुरुष संघाने ओडिशा संघावर अटीतटीचा सामन्यात 3-0 असा विजय मिळवत उपांत्य फेरीत प्रवेश केला.
जलतरणात रौप्यपदक
राजकोट येथे सुरू असलेल्या जलतरण स्पर्धेत महाराष्ट्राच्या महिला संघाने चार बाय शंभर मीटर्स मिडले रिले शर्यतीत रुपेरी कामगिरी केली. महाराष्ट्र संघाकडून पलक जोशी, ज्योती पाटील, प्रतिष्ठा डांगी व अवंतिका चव्हाण यांनी या शर्यतीत प्रतिनिधित्व केले होते. त्यांना हे अंतर पार करण्यास चार मिनिट ३५ सेकंद वेळ लागला. चुरशीच्या शर्यतीत कर्नाटक संघाला सुवर्णपदक मिळाले. कर्नाटक संघाने हे अंतर चार मिनिटे २७ सेकंदात पूर्ण केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.