Netherlands vs Sri Lanka World Cup 2023 : सलग 3 पराभवानंतर श्रीलंकेने अखेर वर्ल्ड कप 2023 मध्ये आपले खाते उघडले आहे. लखनौच्या मैदानावर त्याने नेदरलँड्सचा 5 विकेट्सने पराभव केला.
कसून रजिथा आणि दिलशान मधुशंका यांच्या उत्कृष्ट गोलंदाजीनंतर सदिरा समरविक्रमाच्या जबरदस्त खेळीच्या जोरावर श्रीलंकेने पहिला विजय नोंदवला. गेल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेला धक्का देणार्या नेदरलँडकडून यावेळीही दमदार कामगिरीची अपेक्षा होती. आणि त्यांनी श्रीलंकेसमोर काही आव्हान उभे केले. रडत खडत का असेना श्रीलंकेने 263 धावांचे लक्ष्य पूर्ण केले.
सामन्याबद्दल बोलायचे झाले तर, नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना नेदरलँडचा डाव 49.4 षटकांत 262 धावांवर आटोपला. एकवेळ नेदरलँड संघाने 91 धावांत सहा विकेट गमावल्या होत्या. मात्र, यानंतर साइब्रांड एंगेलब्रेक्ट आणि लोगन व्हॅन बीक यांच्या 135 धावांच्या भागीदारीने संघाला मजबूत स्थितीत आणले.
वर्ल्ड कपमध्ये सातव्या विकेटसाठी ही सर्वात मोठी भागीदारी ठरली. यामध्ये साइब्रांडने 82 चेंडूत चार चौकार आणि एक षटकाराच्या मदतीने 70 धावा केल्या तर व्हॅन बीकने 75 चेंडूत 1 चौकार आणि एक षटकाराच्या मदतीने 59 धावा केल्या. श्रीलंकेकडून दिलशान मदुशंका आणि कसून राजिताने प्रत्येकी चार विकेट घेतल्या.
लक्ष्याचा पाठलाग करताना श्रीलंकेच्या संघाने पहिल्या तीन विकेट 104 धावांत गमावल्या होत्या. येथून सदिरा समरविक्रमाने संघाची धुरा सांभाळली आणि चरित असलंकाने त्याला दुसऱ्या टोकाला साथ दिली. या जोडीने धावसंख्या 181 धावांपर्यंत नेली आणि असलंका 66 चेंडूत 44 धावा करून आऊट झाला, पण समरविक्रमाने 91 धावांची खेळी खेळत सामना संपवला.
श्रीलंकेच्या संघाला नेदरलँडविरुद्धच्या सामन्यापूर्वी या वर्ल्ड कपमध्ये एकही विजय मिळवता आला नव्हता. एकच संघ असा होता ज्यांच्या खात्यात एकही विजय नव्हता. पण संघाला पहिला विजय नेदरलँडविरुद्ध मिळाला आहे आणि नवव्या क्रमांकावरून आठव्या क्रमांकावर आला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.