कोलकाता : मुंबईच्या संघाने मंगळवारी येथे झालेल्या लढतीत सौराष्ट्रावर २ विकेट व ३ चेंडू राखून रोमहर्षक विजय मिळवला आणि सय्यद मुश्ताक अली टी-२० करंडकात अगदी रुबाबात उपांत्य फेरीत प्रवेश केला.
तुषार देशपांडे, मोहित अवस्थी यांच्यासह सर्व गोलंदाजांची प्रभावी गोलंदाजी आणि श्रेयस अय्यर, साईराज पाटील व शिवम दुबे यांच्या दमदार फलंदाजीच्या जोरावर मुंबईने विजयाला गवसणी घातली.
सौराष्ट्राकडून मिळालेल्या १६७ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबईची अवस्था ३ बाद ५२ धावा अशी झाली. पृथ्वी शॉ (२ धावा), यशस्वी जैसवाल (१३ धावा) व अजिंक्य रहाणे (२१ धावा) यांना अपयशाचा सामना करावा लागला.
श्रेयस अय्यरने ४० धावांची, साईराज पाटीलने ३१ धावांची आणि अत्यंत महत्त्वाच्या क्षणी शिवम दुबे याने १३ चेंडूंमध्ये नाबाद २५ धावांची खेळी साकारत मुंबईला थरारक विजय मिळवून दिला. मंुबईसमोर विदर्भाचे आव्हान असणार आहे.
प्रेरकच्या ६१ धावा
त्याआधी सौराष्ट्राने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रेरक मंकडने २५ चेंडूंमध्ये ७ चौकार व ३ षटकारांसह ६१ धावांची खेळी केल्यामुळे सौराष्ट्राला २० षटकांत ८ बाद १६६ धावा करता आल्या. मुंबईकडून तुषार देशपांडे याने ३७ धावा देत ३ फलंदाज बाद केले. मोहित अवस्थीने २३ धावा देत २ फलंदाजांना पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. अमन खान, शम्स मुलानी व शिवम दुबे यांनी प्रत्येकी एक फलंदाज बाद केला.
संक्षिप्त धावफलक
सौराष्ट्र २० षटकांत ८ बाद १६६ धावा (प्रेरक मंकड ६१, शेल्डन जॅकसन ३१, तुषार देशपांडे ३/३७, मोहित अवस्थी २/२३) पराभूत वि. मुंबई १९.३ षटकांत ८ बाद १६८ धावा (अजिंक्य रहाणे २१, श्रेयस अय्यर ४०, एस. पाटील ३१, शिवम दुबे नाबाद २५, चेतन सकारिया ४/३३).
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.