Mohammed Shami T20 World Cup 2022 : ऑस्ट्रेलियात होणाऱ्या ट्वेन्टी-२० विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेसाठी भारताचा संघ सोमवारी जाहीर करण्यात आला. अनुभवी वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीला त्यात स्थान मिळाले नाही, यावरून माजी कर्णधार मोहम्मद अजहरुद्दीन तसेच के. श्रीकांत आणि मदनलाल यांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.
अंतिम फेरीही गाठू न शकलेल्या आशियाई करंडक क्रिकेट स्पर्धेतील संघ निवड समितीने वर्ल्डकपसाठी कायम ठेवला; अपवाद आवेश खान आणि रवी बिश्नोईचा. अपेक्षेप्रमाणे तंदुरुस्त झालेल्या जसप्रीत बुमरा आणि हर्षल पटेल यांनी पुनरागमन केले. तीन फिरकी, चार वेगवान, दोन यष्टिरक्षक-फलंदाज, पाच प्रमुख फलंदाज आणि हार्दिक पांड्याच्या रूपाने एकमेव अष्टपैलू अशी संघाची रचना आहे. यातील दीपक हुडा अधूनमधून ऑफस्पीन टाकू शकतो; तर अक्षर पटेल फलंदाजीतही योगदान देऊ शकतो.
विश्वकरंडक स्पर्धा ऑस्ट्रेलियात होणार आहे. तेथील खेळपट्ट्या वेगवान आणि चेंडूला अधिक उसळी देणाऱ्या असतात. अशा ठिकाणी शमी उपयोगी ठरू शकेल, असे अनेकांचे मत आहे. अझरुद्दीन यांनी याच मुद्द्यावर बोट ठेवले आहे. शमीसह श्रेयस अय्यरचीही निवड व्हायला हवी होती. दीपक हुडाऐवजी त्याला स्थान द्यायला हवे; तर हर्षल पटेलऐवजी शमी असा बदल हवा होता, असे अझर यांनी म्हटले आहे.
माजी सलामीवीर के. श्रीकांत यांचेही म्हणणे असेच आहे. हर्षल पटेलऐवजी शमीला स्थान द्यायला हवे होते, असा उल्लेख त्यांनी केला आहे. श्रीकांत हे निवड समितीचे माजी अध्यक्ष राहिलेले आहेत. मी जर आता निवड समितीचा अध्यक्ष असतो, तर शमीला निश्चितच स्थान दिले असते असे त्यांनी सांगितले.
श्रीकांत पुढे म्हणतात, आपण ही स्पर्धा ऑस्ट्रेलियात खेळणार आहोत, शमीकडे चेंडू उसळवण्याची क्षमता आहे. तो आपल्याला डावाच्या सुरुवातीला विकेट मिळवून देऊ शकतो, त्यामुळे हर्षल पटेलऐवजी त्याची निवड करायलाच हवी होती. हर्षल पटेल हा चांगला गोलंदाज आहे, पण ऑस्ट्रेलियात खेळायचे असेल तर शमी हा योग्य पर्याय आहे. अमुक एक गोलंदाज कसोटी सामन्यासाठी किंवा एकदिवसीय क्रिकेटसाठी आहे, असा शिक्का मारू नका, असे श्रीकांत यांचे म्हणणे आहे. विश्वकरंडक स्पर्धेत मेलबर्नच्या भल्या मोठ्या मैदानावर भारताची सलामी २३ ऑक्टोबर रोजी पाकिस्तानविरुद्ध होणार आहे.
तो मॅचविनर : अझरुद्दीन आणि श्रीकांत यांच्याप्रमाणे वेगवान गोलंदाज मदनलाल यांनीही शमीची संघात निवड आवश्यक होती असे मत व्यक्त केले. त्यांनीही ही स्पर्धा ऑस्ट्रेलियात होणार असल्याचा उल्लेख केला. शमी मॅचविनर गोलंदाज आहे. ऑस्ट्रेलियात तो उपयुक्त ठरला असता. त्याची निवड का झाली नाही याचे मला आश्चर्य वाटत आहे. पहिल्या तीन षटकांत तो हमखास विकेट मिळवून देऊ शकतो, असे मदनलाल यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.