T20 World Cup 2022 : टी-२० विश्वकरंडकातील सुपर १२ फेरीतील लढतींना आजपासून सुरुवात होणार आहे; मात्र ऑस्ट्रेलियातील ला निना हवामानामुळे टी-२० विश्वकरंडकातील लढतींवर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ऑस्ट्रेलिया न्यूझीलंड यांच्यामध्ये आज सलामीची लढत रंगणार असून या लढतीवर ९० टक्के पावसाचे सावट आहे.
ऑस्ट्रेलिया न्यूझीलंड लढतीदरम्यान पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे; मात्र सिडनी क्रिकेट ग्राऊंडमध्ये पाण्याचा निचरा होण्याची सुविधा असल्याने पावसाने विश्रांती घेतल्यास कमीत कमी पटकांची लढत होऊ शकते.
अफगाणिस्तान-इंग्लंड
सुपर १२ फेरीत आज इंग्लंड अफगाणिस्तान यांच्यामध्येही लढत होणार आहे. कागदावर या लढतीत इंग्लंडचे पारडे जड वाटत असले, तरी टी-२० प्रकारात काहीही घडू शकते. श्रीलंका पहिल्या फेरीत धक्का बसला असून वेस्ट इंडिजवर स्पर्धेबाहेर होण्याची नामुष्की ओढवली आहे..
दृष्टिक्षेपात
न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनला गेल्या वर्षभरात टी-२० क्रिकेटमध्ये सुमार फॉर्ममधून जावे लागत आहे. गेल्या नोव्हेंबरपासून विल्यमसनच्या टी-२० तील कामगिरीवर नजर टाकता याचा प्रत्यय येईल. त्याला १०५.२६ च्या सरासरीने फक्त ४२० धावाच करता आल्या आहेत.
ऑस्ट्रेलियाच्या मॅथ्यू वेडला रोखण्यासाठी न्यूझीलंडकडे ट्रेंट बोल्ट नावाचे शस्त्र असणार आहे. बोल्टने २३ चेंडूंमध्ये त्याला ३ वेळा बाद केले आहे.
ऑस्ट्रेलियाच्या जोश हेझलवूड याने गेल्या वर्षभरातील ३२ डावांमध्ये २३ फलंदाज बाद केले आहेत. श्रीलंकेच्या माहीश थिकशाना याने २४ फलंदाजांना पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला.
पाहुण्याची चिंता
पाहुणा संघ न्यूझीलंडसाठी आजची लढत खडतर असणार आहे. डॅरील मिचेल, लॉकी फर्ग्युसन, अॅडम मिल्ने यांना दुखापतीमधून जावे लागत आहे. तसेच माटीन गप्टील, डेव्होन कॉनवे, फिन अॅलेन यांच्यापैकी सलामीवीर त्यांना निवडावे लागणार आहेत. शिवाय मिचेल सँटनर, इश सोधी व मायकेल ब्रेसवेल यांच्यापैकी कोणत्या फिरकी गोलंदाजांना संधी देण्यात येते, हे पाहणे रंजक ठरणार आहे. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे २०११ पासून न्यूझीलंडने ऑस्ट्रेलियात एकही विजय मिळवलेला नाही.
यजमान संघाचे पारडे जड
यजमान संघ ऑस्ट्रेलियाचे पारडे आजच्या लढतीत जड असणार आहे. मागील वर्षी झालेल्या विश्वकरंडकात न्यूझीलंडवर मात करीत त्यांनी पहिल्यांदाच जिंकला होता. ऑस्ट्रेलियातील मैदान आकाराने मोठी असली, तरी टीम डेव्हिडसारख्या फलंदाजाकडे षटकार मारण्याची क्षमता आहे. डेव्हिड वॉर्नर, अॅरॉन फिंच, ग्लेन मॅक्सवेल, स्टीवन स्मिथ यांच्याकडून दमदार फलंदाजीची अपेक्षा आहे. मार्कस स्टोयनीस, कॅमरून ग्रीन या अष्टपैलू खेळाडूंवरही नजरा असणार आहे. पॅट कमिन्स, जोश हेझलवूड, मिचेल स्टार्क, अॅडम झाम्पा यांच्या खांद्यावर गोलंदाजीची मदार असेल.
आजच्या लढती
ऑस्ट्रेलिया न्यूझीलंड - दुपारी १२.३० वाजता, सिडनी
इंग्लंड अफगाणिस्तान - संध्याकाळी ४.३० वाजता, पर्थ
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.