T20 World Cup : विजेतेपदासाठी भारत प्रमुख दावेदार; मॉर्गन

ट्वेन्टी-२० विश्वकरंडक ः राखीव खेळाडूंमध्येही सामना जिंकून देण्याची क्षमता
T20 World Cup
T20 World CupSakal

लंडन : भारतीय खेळाडूंमध्ये असलेली गुणवत्ता आणि एकहाती सामना जिंकून देण्याची क्षमता यामुळे भारतीय संघ यंदाच्या ट्वेन्टी-२० विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत विजेतेपदासाठी प्रबळ दावेदार ठरू शकतो, असे मत इंग्लंडचा माजी कर्णधार ऑईन मॉर्गन याने व्यक्त केले आहे.

गत ट्वेन्टी-२० स्पर्धेत खेळलेला जवळपास तोच भारतीय संघ यंदाही खेळणार आहे. अपवाद मात्र यशस्वी जयस्वाल, युझवेंद्र चहल आणि संजू सॅमसन यांचा आहे. काही खेळाडूंना दुखापती झाल्या तरी भारतीय संघाची ताकद कमी होणार नाही. मॅच विनिंग क्षमता असलेले खेळाडू भारतीय संघात अधिक आहेत, असे मॉर्गनने म्हटले आहे.

या स्पर्धेसाठी निवडण्यात आलेल्या राखीव खेळाडूंमध्येही तेवढीच क्षमता आहे. संघ १५ खेळाडूंचाच निवडायचा असल्यामुळे भारताच्या राखीव खेळाडूंना अंतिम संघात स्थान मिळाले नाही. त्यामुळे माझ्या दृष्टीने भारत फेव्हरिट संघ आहे. त्यांनी आपल्या क्षमतेनुसार खेळ केला तर ते कोणत्याही संघाला सहज पराभूत करू शकतात, असा विश्वास मॉर्गनने व्यक्त केला.

तीन राखीव खेळाडू निवडूनही शुभमन गिल आणि केएल राहुलसारख्या खेळाडूंना संधी मिळाली नाही. भारतीय संघ निवडीचा मी सदस्य असतो तर यशस्वी जयस्वालऐवजी शुभमन गिलची निवड केली असती. मी त्याच्याविरुद्ध खेळलो आहे, त्यामुळे त्याची क्षमता मी अनुभवलेली आहे, असे मॉर्गनने म्हटले.

गिल हा भारताचा भविष्यातील कर्णधार आहे. विश्वकरंडक ही मोठी स्पर्धा आहे. त्यामुळे नेतृत्व गुण असलेले खेळाडू संघात असायला हवेत. अशा खेळाडूंना अंतिम संघातून खेळण्याची संधी मिळाली नाही तरी ते सीमारेषेबाहेरूनही सर्वांना प्रोत्साहित करू शकतात, असे गिलबाबत बोलताना मॉर्गनने सांगितले.

प्रत्येक आयसीसी विश्वकरंडक स्पर्धेत भारतीय संघाकडे संभाव्य विजेते म्हणून पाहिले जाते; परंतु २०१३ नंतर एकही करंडक जिंकता आलेला नाही ही वास्तवता आहे. २०१३ मध्ये धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने चॅम्पियन्स करंडक जिंकला होता.

गेल्या विश्वकरंडक स्पर्धेत भारताला इंग्लंडकडून १० विकेटच्या पराभवाची नामुष्की सहन करावी लागली होती. ॲडलेट येथे झालेला उपांत्य फेरीचा तो सामना इंग्लंडने जिंकला आणि त्यानंतर विजेतेपदही मिळवले होते.

भारतीय संघ आता फार पुढे गेला आहे. ॲडलेटमधील तो पराभव आणि विश्वकरंडक स्पर्धेत सव्वा लाख प्रेक्षकांसमोर ऑस्ट्रेलियाकडून झालेला अंतिम सामन्यातील पराभव भारतीयांनी पचवला आहे, त्यामुळे त्यांची मानसिकता आता अधिक सक्षम झाली आहे, असेही मत मॉर्गनने मांडले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com