India vs South Africa U19 World Cup semi-final 2024 : आयसीसी 19 वर्षाखालील पुरुष वर्ल्ड कप 2024 चा पहिला उपांत्य सामना आज भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात खेळला गेला आहे. बीडच्या सचिन दासच्या फटकेबाजीमुळे भारतीय संघांनी अंडर-19 वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये एन्ट्री मारली.
भारतीय संघाने उपांत्य फेरीत रोमहर्षक सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा दोन विकेट्स राखून पराभव केला. या विजयासह टीम इंडियाने नवव्यांदा अंतिम फेरी गाठली आहे. भारत पाच वेळा चॅम्पियन बनला असून तीनदा फायनलमध्ये पराभूत झाला आहे. अंतिम सामना 11 फेब्रुवारीला होणार आहे. तिथे टीम इंडियाचा सामना ऑस्ट्रेलिया किंवा पाकिस्तानशी होऊ शकतो.
या सामन्यात भारताकडून बीडच्या सचिन दास आणि कर्णधार उदय सहारनने शानदार खेळी केली. 32 धावांवर चार विकेट पडल्यानंतर कर्णधारने सचिन दाससोबत 171 धावांची भागीदारी केली. सचिनचे शतक थोडक्यात हुकले. तो 96 धावा करून बाद झाला. पण पॅव्हेलियनमध्ये परतण्यापूर्वी त्याने संघाला विजयाच्या उंबरठ्यावर नेले होते. शेवटी राज लिंबानीने चौकार मारून सामना संपवला. आणि भारताने वर्ल्डकप फायनलमध्ये धडक मारली.
नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना दक्षिण आफ्रिकेने 50 षटकांत 7 गडी गमावून 244 धावा केल्या. दक्षिण आफ्रिकेने 46 धावांत दोन विकेट गमावल्या होत्या. यानंतर लुआन ड्रे प्रीटोरियसने रिचर्ड सेलेटस्वेनसोबत तिसऱ्या विकेटसाठी 72 धावांची भागीदारी केली. प्रिटोरियसने 102 चेंडूंत सहा चौकार आणि तीन षटकारांच्या मदतीने 76 धावांची खेळी केली. त्यानंतर ऑलिव्हर व्हाईटहेडने 22 धावा, डेव्हन मरायसने तीन आणि कर्णधार युआन जेम्सने 24 धावा केल्या. भारताकडून राज लिंबानी याने सर्वाधिक तीन बळी घेतले. तर मुशीर खानने दोन विकेट घेतल्या. नमन तिवारी आणि सौमी पांडे यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.
प्रत्युत्तर भारताची सुरुवात खूपच खराब झाली. 32 धावांत संघाच्या चार विकेट पडल्या होत्या. आदर्श सिंग पहिल्याच चेंडूवर खाते न उघडता बाद झाला. त्यानंतर मुशीर खान चार धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. अर्शीन कुलकर्णी 12 धावा करून बाद झाला तर प्रियांशू मोलिया पाच धावा करून बाद झाला.
चार विकेट पडल्यानंतर कर्णधार उदय सहारन आणि सचिन दास यांनी डावाची धुरा सांभाळत संघाला पुनरागमन केले. सचिनने 95 चेंडूत 96 धावा केल्या. त्याने 11 चौकार आणि एक षटकार मारला. उदयने 124 चेंडूत 81 धावा केल्या. त्याने सहा चौकार मारले. राज लिंबानीने शेवटच्या षटकांमध्ये चार चेंडूत 13 धावा देत सामना लवकर संपवला. त्याने एक चौकार आणि एक षटकार मारला.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.