नवी दिल्ली : येत्या पॅरिस ऑलिंपिकसाठी कोटा मिळवणाऱ्या सहाही कुस्तीपटूंची चाचणी स्पर्धा रद्द करण्यात आली आहे; परंतु हंगेरी येथे होणाऱ्या शिबिरातून या खेळाडूंचा फॉर्म आणि तंदुरुस्ती तपासण्यात येईल, असे भारतीय कुस्ती संघटनेने आज जाहीर केले. ऑलिंपिकसाठी पात्र ठरलेले कुस्तीपटू तंदुरुस्तीमध्ये अपयशी ठरले तर त्यांच्याऐवजी फॉर्म असलेला आणि तंदुरुस्त असलेले मल्ला ऑलिंपिकला पाठवण्यात येईल. ८ जुलै ही संघ निवड जाहीर करण्याची अंतिम मुदत आहे, त्याअगोदर ही प्रक्रिया पूर्ण करण्यात येईल, असे कुस्ती संघटनेकडून सांगण्यात आले.
पात्र ठरलेले मल्ल ऑलिंपिकसाठी आतापर्यंत अमन शेरावत (५७ किलो) हा एकमेव पुरुष मल्ल आहे. विनेष फोगाट (५०), अंतिम पंघाल (५३), अंशू मलिक (५७), निशा दहीया (६८) आणि रीतिका हुडा (७६) या महिला खेळाडूंनी कोटा मिळवलेला आहे. चाचणी स्पर्धेत खेळल्यास दुखापतीचा धोका संभवतो, त्यामुळे चाचणी स्पर्धा घेऊ नका, अशी विनंती या सर्व सहाही कुस्तीपटूंनी कुस्ती संघटनेचे अध्यक्ष संजय सिंग यांना केली होती. खेळाडूंच्या विनंतीनंतर या मुद्यावर आम्ही मुख्य प्रशिक्षकांशी चर्चा केली आणि पात्र ठरलेले हे मल्ल पदकांची आशा असलेले खेळाडू आहेत, त्यामुळे चाचणीत त्यांना दुखापत होऊ शकते, हा विचार आम्ही केला, असे संजय सिंग यांनी सांगितले.
जागतिक कुस्ती संघटनेची मानांकन स्पर्धा बुडापेस्ट येथे ६ ते ९ जूनदरम्यान होणार आहे. ऑलिंपिक पात्रता मिळवण्यासाठी ही अखेरची स्पर्धा असेल. या स्पर्धेनंतर १० ते २१ जूनदरम्यान भारतीय खेळाडूंचे सराव शिबिर होणार आहे. ऑलिंपिकसाठी पात्र ठरलेले आपले सर्व कुस्तीगीर पूर्ण तंदुरुस्त असावेत, याला आमचे पहिले प्राधान्य आहे. त्यामुळे देशात चाचणी स्पर्धा खेळवण्याऐवजी मानांकन स्पर्धांतून त्यांची तंदुरुस्ती तपासण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. यात एखादा खेळाडू अनफिट वाटला तर त्यासाठी पर्यायी खेळाडू ८ जून रोजी चाचणीतून निश्चित करण्यात येईल, असेही कुस्ती संघटनेच्या अध्यक्षांनी स्पष्ट केले.
दहिया, सरितासाठी दरवाजे बंद
आता चाचणी न घेण्याच्या निर्णयामुळे टोकियो ऑलिंपिकमधील रौप्यपदक विजेता रवी दहिया (पुरुष ५७ किलो) आणि जागतिक स्पर्धेतील ब्राँझपदक विजेती सरिता मूर (महिला ५७ किलो) यांच्यासाठी पॅरिस ऑलिंपिकचे दरवाजे बंद झाले आहेत. तसेच विनेष फोगाट हिला ऑलिंपिकमध्ये ५० किलो गटातच खेळावे लागेल. चाचणी झाली असती तर तिला ५३ किलो गटाक अंतिम पंघाल हिला हरवावे लागले असते. ५३ किलो हा दोघींचाही एकच गट आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.