Tokyo 2020 Paralympic : टोकियो पॅरालिंपिक स्पर्धेतील बॅडमिंटनमध्ये भारताच्या खात्यात आणखी एका सुवर्ण पदकाची भर पडली आहे. बॅडमिंटनच्या पुरुष एकेरीतील SL 3 गटात भारताचा प्रमोद भगत आणि ब्रिटनचा डॅनियल बेथल यांच्यात अंतिम सामना रंगला होता. यात भारताच्या प्रमोद भगतने बाजी मारलीये. भारताच्या खात्यातील हे चौथे सुवर्ण पदक आहे. प्रमोद भगतने सुरुवातीपासून सामन्यावर पकड ठवली. त्याने पहिला सेट 21-14 असा आपल्या नावे केला. त्यानंतर दुसऱ्या सेटमध्येही त्याने दबदबा कायम राखत 21-17 अशा फरकाने सेटसह सामना जिंकला. याच गटात एम सरकारने 21-20, 21-13 अशा फरकाने सामना जिंकत भारताला कांस्य पदकाची कमाई करुन दिली
पॅरालिंपिक स्पर्धेत भारतासाठी आजचा दिवस सोनेरी असाच होता. नेमबाजीत मनिष नरवाल याने सुवर्ण निशाणा साधला. पुरूषांच्या 50 मीटर एअर पिस्टल SH1 क्रीडा प्रकारात त्याने लक्षवेधी कामगिरी नोंदवली. याच गटात सिंहराज अधाना यांनी रौप्य पदकाची कमाई केली. दुसरीकडे बॅडमिंटनमध्येही भारताचा दुहेरी धमाका पाहायला मिळाला. बॅडमिंटनच्या पुरुष एकेरीतील SL 3 गटात प्रमोदने सुवर्ण कामगिरी करुन इतिहास रचला. बॅडमिंटनमध्ये भारताचे पहिले सुवर्ण आहे. याच गटात एम सरकारने कांस्य पदकाची कमाई केली. नेमबाजी आणि बॅडमिंटनमधील भारतीय खेळाडूंच्या कामगिरीनंतर भारताच्या खात्यात आता 4 सुवर्ण 7 रौप्य आणि 6 कांस्य पदकासह एकूण 17 पदक झाली आहेत. पदतालिकेत भारत 25 व्या स्थानावर पोहचलाय.
ऑलिम्पिकमधील बॅडमिंटनचा इतिहास पाहिला तर 2012 मध्ये लंडन ऑलिम्पिक स्पर्धेत सायन नेहवालने कांस्य पदकाची कमाई केली होती. त्यानंतर 2016 मध्ये पीव्ही सिंधूनं रिओ ऑलिम्पिकमध्ये रौप्य तर यंदा टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत कांस्य पदकाची कमाई केली. ऑलिम्पिक आणि पॅरालिंपिक स्पर्धेत पुरुष गटात बॅडमिंटनमध्ये पदक मिळवणारा भगत पहिला खेळाडू ठरलाय.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.