तलवारबाजी हा खेळ तसा महागडा खेळ. मात्र, मुलाची आवड आणि हट्ट पुरविणार नाही ते आई-वडील कसले. आई-वडिलांनी नातेवाइकांकडून उसनवारी करत मुलाला तलवारबाजीचे साहित्य घेऊन दिले. मात्र, ते साहित्य उत्तम दर्जाचे नसल्यामुळे त्या खेळाडूने अनेक स्पर्धांत आपल्या मित्राच्या साहित्याचा वापर करून केवळ जिल्हा, राज्य नाही तर आंतरराष्ट्रीय पातळीवर पदक मिळविले. तुषार रावसाहेब आहेर (वय २८) असे या खेळाडूचे नाव असून, नुकत्याच रशिया येथे झालेल्या ब्रिक्स स्पर्धेमध्ये त्याने देशासाठी कांस्यपदक पटकावले आहे.
आतापर्यंत तुषारने राज्यस्तरीय स्पर्धेत ५०, तर राष्ट्रीय स्पर्धेत २६ पदके मिळविली आहे. राज्यातील क्रीडा क्षेत्रातला महत्त्वाचा मानला जाणारा श्री शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारही त्याने प्राप्त केला आहे. दरम्यान, याचवर्षी त्याने पहिले आंतरराष्ट्रीय पदक मिळविल्याने त्याची क्रीडा विभागामध्ये क्रीडा मार्गदर्शकपदी नियुक्ती झाली आहे.
सरस्वती भुवन हायस्कूलमध्ये नववीत असताना २०११ ला तुषारने तलवारबाजी खेळास सुरवात केली. दहावीत असताना त्याने राज्यस्तरीय स्पर्धेत पहिले रौप्यपदक पटकावले व राष्ट्रीय स्पर्धेत निवड झाली. राष्ट्रीय स्पर्धेतही कांस्यपदक मिळाल्यावर तलवारबाजी खेळाला करिअर म्हणून निवडण्याचा त्याने निर्णय घेतला.
मध्यमवर्गीय कुटुंबात करिअरसाठी क्रीडा प्रकार निवडणे, ही त्यावेळी खूप मोठी गोष्ट होती. परंतु. त्यावेळी आई सुजिता व वडील रावसाहेब आहेर यांनी विश्वास ठेवून तुषारला पूर्णपणे पाठिंबा दिला आणि कधीही त्याच्या खेळात अडथळा येऊ दिला नाही.
अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धांना सरकार आर्थिक साह्य करत नसल्याने त्यावेळी तुषारने प्रायोजक शोधण्याचा प्रयत्न केला, परंतु प्रायोजकच मिळाले नाहीत. तुषारच्या वडिलांनी नातेवाइकांकडून थोडेफार पैसे उभे करत त्याला आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभागी केले. दरम्यान, हे तलवारबाजीचे साहित्य महागडे असल्यामुळे तुषारने बऱ्याचदा आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी सहकाऱ्यांचे साहित्य घेऊन सहभाग नोंदविला.
तुषारने २०११ ते २०१७ पर्यंत अनेक राज्यस्तरीय, राष्ट्रीय पदके मिळविली. २०१७ ला अखिल भारतीय आंतरविद्यापीठ स्पर्धेत कांस्यपदक मिळवले व पहिल्यांदा आंतरराष्ट्रीय स्पर्धेत वर्ल्ड युनिव्हर्सिटी गेम्समध्ये त्याची निवड झाली. त्यावेळी तुषार डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा वर्ल्ड युनिव्हर्सिटी गेम्समध्ये निवड होणारा पहिलाच खेळाडू होता.
त्यानंतर २०१८ व २०१९ ला सलग अखिल भारतीय आंतरविद्यापीठ स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले. त्याचप्रमाणे खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्समध्येही त्याने सुवर्णपदक पटकावले. त्यावेळी तुषारला डॉ. उदय डोंगरे यांचे मोलाचे मार्गदर्शन मिळाले.
तुषारच्या कामगिरीची दखल घेत त्यास महाराष्ट्र शासनाने २०१८-१९ चा क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च शिवछत्रपती पुरस्कार देऊन सन्मानित केले. २०१८ ला तुषारने वूक्सी (चीन) कॉमनवेल्थ स्पर्धेत सहभाग नोंदविला. २०१९ ला हंगेरी येथील आशियाई वरिष्ठ तलवारबाजी स्पर्धा, आशियाई यूथ तलवारबाजी स्पर्धा थायलंड, वर्ल्ड युनिव्हर्सिटी गेम्स, इटली अशा एकूण चार स्पर्धांत सहभाग नोंदविला. त्यानंतर २०२३ मध्ये अखिल भारतीय आंतरविद्यापीठ स्पर्धेत सुवर्णपदक मिळवून तुषारची वर्ल्ड युनिव्हर्सिटी गेम्ससाठी (चेंगडू, चीन) निवड झाली.
सलग तीन वर्ल्ड युनिव्हर्सिटी गेम्स खेळणारा बामूचा तो एकमेव खेळाडू आहे. तर २०२४ ला ब्रिक्स गेम्समध्ये भारतीय संघाला तुषारने कांस्यपदक मिळवून दिले. यानंतर भारतात परत आल्यानंतर त्याची महाराष्ट्र शासनाच्या राज्य क्रीडा मार्गदर्शकपदी निवड झाली. आता तुषार २०२६ मध्ये होणाऱ्या आशियाई स्पर्धेची तयारी करीत आहे. तुषारला मार्गदर्शक डॉ. उदय डोंगरे, प्रशिक्षक स्वप्नील तांगडे, दिनेश वंजारे व साईचे तुकाराम यांचे मार्गदर्शन लाभले.
(शब्दांकन - सुनील इंगळे)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.