T20 World Cup 2022 : विश्वकरंडक स्पर्धांमध्ये भारताकडून पराभव झाल्यानंतर नेहमीच नाकाला मिरच्या झोंबणाऱ्या पाकिस्तानच्या वसीम अक्रम, शोएब अख्तर, वकार युनूस या माजी खेळाडूंनी नकारात्मक सूर लावला. अखेरच्या षटकातील नो बॉलवरून त्यांनी थयथयाट केला.
रविवारी झालेल्या सामन्यातील अखेरचे षटक कमालीचे नाट्यमय झाले. महम्मद नवाझने एक चेंडू कोहलीच्या कंबरेच्या वर टाकला. त्या चेंडूवर षटकार मारताच विराटने नो बॉलबाबत पंचांकडे विचारणा सुरू केली. पंचांनी नो बॉल जाहीर केला. त्यानंतर नो बॉलवरील फ्रीहिटवर यष्टींना लागून दूर गेलेल्या चेंडूवर विराट-कार्तिकने तीन धावा पळून काढल्या आणि त्याच भारताच्या विजयात मोलाच्या ठरल्या. काहींनी कर्णधार बाबर आझमवर टीका केली.
अखेरचे षटक फिरकी गोलंदाजाला द्यायला नको होते, असे त्यांचे म्हणणे आहे. विराटने मागणी करण्याअाधीच पंचांनी तो चेंडू नोबॉल ठरवायला हवे होते पण तसे झाले नाही, असे वकार युनुस यांनी म्हटले.
नियम काय सांगतो...
नियमानुसार एखाद्या चेंडूची क्रिया चेंडू यष्टीरक्षकाच्या हाती गेल्यावर किंवा चौकार, षटकाराची खुण केल्यानंतर पूर्ण होते. तसेच फलंदाज बाद झाल्यावरही चेंडूची क्रिया पूर्ण होत असते.
वरील नियमानंतर चेंडूची क्रिया पूर्ण झाल्याचे पंच जाहीर करू शकतात. चेंडू यष्टींवर लागला तर त्यावेळी एक किंवा दुसरी बेलही पडली तर पंच डेट बॉल झाल्याचे सांगू शकतात.
काय घडले...
या नियमाचा आधार घेत पाकिस्तानी आजी-माजी खेळाडू विराट कोहलीने चेंडू यष्टींना लागल्यानंतरही तीन धावा पळून काढल्याचा कांगावा करत आहेत, पण तो चेंडू फ्री-हीट होता याचा विसर पडला.
फ्री-हीट फलंदाज केवळ चारच वेळा बाद होऊ शकतो. १) चेंडू हाताळणे, २) दोनदा चेंडू मारणे, ३) क्षेत्ररक्षकाला अडथळा निर्माण करणे आणि ४) धावचीत.
या चारही कारणांमध्ये विराटने केलेली कृती बसत नाही. त्यामुळे त्याने आणि कार्तिकने काढलेल्या तीन धावा पंचांनी ग्राह्य धरल्या.
पंचांनी बायच्या तीन धावा ग्राह्य धरणे नियमानुसारच होते. फ्री हीटवर फलंदाज त्रिफाळाचीत होत नाही, त्यामुळे चेंडू यष्टींना लागला तरी तो ‘डेड’ होत नाही.
- सायमन टॉफेल, आयसीसी माजी सर्वोत्तम पंच
पंचांनी नो बॉल देण्याअगोदर तिसऱ्या पंचांची मदत घ्यायला हवी होती. हा अत्यंत चुरशीने खेळला गेलेला सामना होता.
- शोएब अख्तर, पाकचा माजी कसोटीपटू
नोबॉल देण्यात आलेला चेंडू विराट कोहलीच्या भले कंबरेच्या दिशेने होता परंतु तो यष्टीपर्यंत जाईपर्यंत तो खाली गेला असता, यात विराटची चूक नव्हती, पण तंत्रज्ञान उपलब्ध असेल तर त्याचा वापर करायला हवा.
- वसीम अक्रम, पाक संघाचा माजी कर्णधार
उत्तम सामना झाला, अशा लढतींमध्ये कधी विजय होतो तर कधी पराभव, परंतु हा सामना क्रूर आणि अन्यायकारक होता.
- रमीझ राझा, पाक मंडळाचे अध्यक्ष
पहिल्या दहा षटकांत आमच्या गोलंदाजांनी फारच चांगला मारा केला, परंतु भारताने मिळवलेल्या विजयाचे श्रेय विराट कोहली आणि हार्दिक पंड्या यांना द्यावे लागेल. त्यांनी बघता बघता सामन्याचे पारडे बदलले.
- बाबर आझम, पाकचा कर्णधार
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.