U-19 Women T20 World Cup final India vs England : शेफाली वर्माच्या नेतृत्वात भारतीय महिला क्रिकेट संघाला आज इतिहास रचण्याची संधी आहे. १९ वर्षांखालील महिलांच्या विश्वकरंडकाची अंतिम लढत आज रंगणार असून भारतासमोर इंग्लंडचे आव्हान आहे. पहिल्यांदाच या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून दोन्ही देश विश्वविजेता होण्यासाठी प्रयत्नांची शिकस्त करताना दिसणार आहेत.
भारतीय महिला संघाने या स्पर्धेमध्ये आतापर्यंत अव्वल दर्जाची कामगिरी केली आहे. साखळी फेरी व सुपर सिक्समध्ये उल्लेखनीय कामगिरी केल्यानंतर भारतीय संघाने उपांत्य फेरीच्या लढतीत न्यूझीलंडवर ८ विकेट राखून दणदणीत विजय साकारला आणि जेतेपद पटकावण्याच्या दिशेने शानदार पाऊल टाकले. इंग्लंडनेही ऑस्ट्रेलियन संघावर ३ धावांनी सनसनाटी विजय मिळवला आणि अंतिम फेरीत पाऊल टाकले. दोन देशांमध्ये आता रोमहर्षक लढाई पाहायला मिळेल, अशी दाट शक्यता आहे.
श्वेता, शेफालीकडून अपेक्षा
भारताकडून दोन महिला फलंदाजांनी या स्पर्धेमध्ये चमक दाखवली आहे. श्वेता सेहरावत हिने सहा लढतींमधून तीन अर्धशतकांसह २९२ धावांचा पाऊस पाडला आहे. शेफाली वर्मा हिने एक अर्धशतकासह १५७ धावा फटकावल्या आहेत. अर्थात शेफालीकडून अजूनही मोठ्या खेळीची अपेक्षा आहे. सौम्या तिवारी, ऋषिता बासू यांनाही उद्याच्या लढतीत चमकदार खेळ करावा लागणार आहे. भरतासमोर तगडे आव्हान असणार आहे.
तीन फायनलमध्ये खेळणारी पहिलीच भारतीय
शेफाली वर्मा हिच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे. तीन महत्त्वाच्या स्पर्धांच्या अंतिम फेरीत खेळणारी ती भारताची पहिलीच खेळाडू ठरली आहे. याआधी महिलांच्या टी-२० विश्वकरंडकाच्या व राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारणाऱ्या भारतीय संघाची ती सदस्य होती.
चोप्राकडून आशा
भारतीय संघातील गोलंदाजांनीही या स्पर्धेमध्ये कात टाकली आहे. फिरकी गोलंदाज पार्श्ववी चोप्रा हिने नऊ फलंदाजांना बाद केले असून, मन्नत कश्यप हिने आठ फलंदाज गारद केले आहेत.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.