क्रिकेटचा जन्म जरी इंग्लंडच्या भूमीवर झाला असला तरीही इंग्लंडला नसेल ऐवढे क्रिकेटचे वेड भारतीयांना आहे. भारतात क्रिकेट हा जणू धर्मच समजला जातो. तथापि भारतीय क्रिकेट संघ हा जगात बलाढ्य असल्यामुळे चाहत्यांना कायमच भारताच्या विजयाची आणि विशेषतः पारंपरिक राजकीय प्रतिस्पर्धी पाकिस्तानच्या पराभवाची आस लागलेली असते.
त्यामुळे अनेकदा भारतीय चाहते मैदानाबाहेर आपल्या खेळाबद्दलच्या भावना व्यक्त करताना दिसतात. परंतु तुम्ही कधी विचार केला आहे का? की भारत, पाकिस्तान किंवा ऑस्ट्रेलियन खेळाडू जितके मैदानावर एकमेकांचे कठोर शत्रू वाटतात तितके मैदानाबाहेर असतील? तर याचे उत्तर नाही आहे. भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली हा अतिशय अग्रेसीव खेळाडू म्हणून ओळखला जातो. परंतु त्याचे प्रतिस्पर्धी असलेल्या खेळाडूंशी त्याचे किंवा इतर बलाढ्य खेळाडूंचे त्याच्याशी कसे मैत्रीपूर्ण संबंध आहेत हे आपण आज 'फ्रेंडशिप डे' च्या निमित्ताने जाणून घेणार आहोत.
विराट कोहली - मोहम्मद अमीर
तुम्हाला आठवत असेल जेव्हा 'चँम्पीयन ट्रॉफी' विश्वकरंडक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात मोहम्मद अमीरने विराट कोहलीचा बळी घेतला तेव्हा सामन्याचे संपूर्ण पारडे कसे बदलले. तर दुसऱ्या बाजूला 'आशिया कप'च्या अंतिम फेरीत जेव्हा आमेरने रोहीत शर्मा आणि अजिंक्य रहाणेला बाद केल्यानंतर कर्णधार विराट कोहलीने अमीर विरुद्ध एकेरी खिंड लढवत 'आशिया कप' भारताला जिंकून दिला. विराट कोहली हा भारताच्या संघातला 'रनमशीन' म्हणून ओळखला जातो. तर पाकिस्तानचा तेजतर्रार गोलंदाज मोहम्मद अमीर हा जगातील सर्वात घातक बॉलर म्हणून प्रसिद्ध आहे. जेव्हा जेव्हा अमीर भारतीय फलंदाजांना गोलंदाजी करतो तेव्हा प्रत्येक भारतीय चाहत्याच्या मनात 'आपल्या आवडत्या फलंदाजा'ची विकेट जाऊ नये यासाठी धडकी भरलेली असते. तर हे दोन प्रसिद्ध खेळाडू आपआपसांत जरूर मैदानावर भिडतात परंतु मैदानाबाहेर या दोघांचे नाते मैत्रीपूर्ण आहेत. कारण विराट कोहली आणि मोहम्मद अमीर हे दोन्ही खेळाडू '१९ वर्षाखालील' विश्वकरंडक स्पर्धेत खेळलेले आहे. तुम्हाला आठवत असेल चँम्पीयन ट्रॉफी स्पर्धेत विराट कोहलीने अमीरला आपली आवडती बँट भेट म्हणून दिली होती. तर अमीरने कोहलीला सही केलेला चेंडू भेट दिला. त्यामुळे मैदानावर 'सव्वाशेर' असणारे हे दोन खेळाडू वैयक्तिक आयुष्यात चांगले मित्र आहेत.
कोहली - स्मिथ
जेव्हा जेव्हा विराट कोहली बाद होतो तेव्हा ऑस्ट्रेलियन कर्णधार स्टीव्ह स्मिथ जोरदार सेलिब्रेशन करतो, आणि जेव्हा स्मिथ बाद होतो तेव्हा कोहली त्याला डिचवतो हे समीकरण तुम्ही नेहमी भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामन्यात बघितलं असेल. भारत आणि ऑस्ट्रेलिया हे दोन्ही संघ क्रिकेटमधील पारंपरिक कट्टर विरोधी संघ म्हणून ओळखले जातात. परंतु जेव्हा जेव्हा मैदानाबाहेर कोहली आणि स्मिथ एकत्र आले तेव्हा अतिशय मैत्रीपूर्ण नातेसंबंधांने वागलेले आहे. आणि यात विशेष बाब म्हणजे स्टीव्ह स्मिथच्या कठीण काळात त्याला विराट कोहलीने मोठा मानसिक आधार दिला होता. तो कसा? तर जेव्हा 'चेंडू कुरतल्या'प्रकरणी ऑस्ट्रेलियन कर्णधार स्टीव्ह स्मिथ आणि सलामीवीर डेव्हिड वॉर्नरला बोर्डाने एका वर्षाची बंदी घातली तेव्हा ते अतिशय नैराश्याग्रस्त परिस्थितीतून जात होते. त्यावेळी स्मिथला धीर देणारा आणि 'खेळ चालू ठेव, हार मानू नको, तु चँम्पीयन आहेस, परत खेळायला ये' असं म्हणणारा विराट कोहली होता. जेव्हा स्मिथ बंदीची शिक्षा भोगून मैदानावर परतला तेव्हा एका भारताविरुद्ध सामन्यात स्मिथ फलंदाजी करत असताना भारतीय चाहत्यांनी त्याला 'चिटर' म्हणून शेरेबाजी केली तेव्हा ते प्रकरण स्मिथच काय कोहलीलाही आवडले नाही. त्यामुळे त्याने मैदानावरुन त्या चाहत्यांना सुनावले. व स्मिथला खेळासाठी प्रोत्साहित करण्यासाठीचे इशारे केले. त्यावेळी स्मिथला खूप मोठा मानसिक आधार मिळाला. त्याने लगेचच कोहलीचे आभार मानले. हे दोन्ही खेळाडू मैदानावर जितके धूरंदर प्रतिस्पर्धी आहेत तितकेच एकमेकांचे प्रेमळ मित्रदेखील आहेत. त्यामुळेच ते नेहमी खेळभावना टिकवून ठेवताना दिसतात.
कोहली-विलीयमसन
भारतीय कर्णधार विराट कोहलीच्या तुलनेत न्यूझीलंडचा कर्णधार केन विलीयमसन अतिशय संयमी खेळाडू म्हणून ओळखला जातो. परंतु त्याचा खेळ हा उच्च दर्जाचा असल्याने तो साहजिकच विराट कोहलीचा प्रतिस्पर्धी ठरतो. कोहली आणि विलीयमसन हे चांगले मित्र आहेत. ते सातत्याने आपल्याला 'इंडियन प्रिमियर लीग'च्या दरम्यान दिसले. जेव्हा मागच्या वेळी न्यूझीलंड विश्वकरंडक स्पर्धेच्या उपांत्य फेरीतून बाहेर झाला तेव्हा जगातील सर्वच क्रिकेट चाहत्यांना त्यांची सहानुभूती वाटली. तितकीच कोहलीलासुद्धा. कोहलीने विलीयमसनला धीर दिला. मैत्रीपूर्ण सल्ला दिला. कारण तोपर्यंत भारतही स्पर्धेतून बाहेर झालेला होता. त्यावेळच्या उपांत्य फेरीतील पराभवाचे हसू विलीयमसनच्या चेहऱ्यावर होते तेच आपण मागच्या विश्वकरंडक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडचा पराभव झाल्यावर बघितले. त्याचा संयम आणि खिलाडूवृत्ती वाखाणण्याजोगी आहे. कदाचित धोनीऐवढीच. काही दिवसांपूर्वी जेव्हा भारत जागतिक कसोटी विश्वकरंडक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडकडून पराभूत झाला तेव्हा विलीयमसनने आपला सुवर्णक्षणाचा आनंद बाजूला ठेवत भारतीय कर्णधार विराट कोहलीच्या खांद्यावर डोक ठेवून आनंद शेयर केला. त्याच्या या कृतीबद्दल जगभरातील क्रिकेट चाहत्यांनी त्याला दाद दिली होती. जणू त्यामुळेच कोहली आणि विलीयमसनची मैत्री, लोकप्रियता वाढली.
हे चारही खेळाडू मैदानावर जितके आक्रमक भूमिका घेतात तितकेच वैयक्तिक आयुष्यात एकमेकांशी प्रेमळ मित्रत्वाची भावना जपतात. त्यामुळेच जगभरातून कोहली-आमेर-स्मिथ आणि विलीयमसनच्या मित्रत्वाला पसंत करतात. आजच्या 'फ्रेंडशिप डे'च्या निमित्ताने आपणही त्यांना शुभेच्छा देऊयात.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.