Viswanathan Anand aprreciates indian chess team: बुद्धिबळ विश्वात पुरुषांमध्ये आपली ताकद आणि क्षमता किती आहे हे बुद्धिबळ ऑलिंपियाडमधून सिद्ध झाले आहे. गुकेश, प्रज्ञानंद, अर्जुनसारखे खेळाडू भारताचे भविष्य आहेत. त्यामुळे विश्व अजिंक्यपद स्पर्धा दोन भारतीयांमध्येच झाली तर त्याच्यासारखे दुसरे भाग्य नसेल, असे मत महान बुद्धिबळपटू विश्वनाथन आनंद यांनी व्यक्त केले.
पुढील महिन्यात सुरू होणाऱ्या ग्लोबल चेस लीगचा कार्यक्रमासाठी आनंद मुंबईत आले होते. बुद्धिबळ ऑलिंपियाडमध्ये पुरुष आणि महिला विभागात प्रथमच अजिंक्यपद मिळवल्यानंतर भारतीय संघ मायदेशी परतल्यानंतर बुधवारी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आणि त्यानंतर आज आनंद मुंबईत आले. साहजिकच बुद्धिबळ ऑलिंपियाडमधील यश आणि भारताचे बुद्धिबळातील भवितव्य याबाबत आनंद भरभरून बोलले.
येत्या काळात विश्वविजेत्या चीनच्या डीन लिरेन याला भारताचा गुकेश आव्हान देणार आहे. या लढतीकडे आता बुद्धिबळ विश्वाचे लक्ष लागून राहिले आहे. सध्याची भारताची बुद्धिबळ खेळातील ताकद आणि प्रगती पाहता भविष्यात ही लढत दोन भारतीयांमध्येच व्हावी, असे आनंद गर्वाने म्हणाले.
गुकेश, प्रज्ञानंद, अर्जुनसारख्या खेळाडूंमुळे बुद्धिबळात भारताची व्याप्ती मोठ्या प्रमाणात वाढली आहे. पुढील पाचच काय तर दहा वर्षे तरी भारताचे वर्चस्व राहील, असे आनंद यांनी सांगितले. भारतात बुद्धिबळ खेळाची लोकप्रियता मोठ्या प्रमाणात वाढली आहे. अधिकाधिक महिलांनी या खेळात प्रगती करावी, असे मत आनंद यांनी व्यक्त केले.
बुद्धिबळ ऑलिंपियाडमध्ये भारतीय पुरुषांनी एकतर्फी वर्चस्व राखले, त्यामुळे विजेतेपद निश्चित वाटत होते. कारण एकादी लढत गमावली असली तरी दुसरा खेळाडू त्याची भरपाई करण्याच्या ताकदीचा होता. महिलांमध्ये एक लढत गमावली, नंतर बरोबरीत समाधान मानावे लागले. त्यानंतर मिळवलेले विजेतेपद आनंददायी होते, असे आनंद म्हणाले.
पुढे अनेक वर्षे बुद्धिबळ विश्व गाजवण्याची क्षमता पुरुष संघाकडे असली तरी गाफिल राहून चालणार नाही. कारण माझ्या मते पुढची बुद्धिबळ ऑलिंपियाड स्पर्धा अधिक आव्हानात्मक असू शकेल. भारतीयांनी केलेला खेळ, त्यांनी दाखवलेली मानसिकता याचा अभ्यास प्रतिस्पर्धी देश करेल आणि ते अधिक जोमाने पुढच्या स्पर्धेत उतरतील, त्यामुळे आपल्या संघाला अधिक सावध राहावे लागेल, असे आनंद यांनी सांगितले.
चेन्नईत झालेल्या बुद्धिबळ ऑलिंपियाडमध्ये आपल्याला विजेतेपदाची संधी होती; परंतु अंतिम क्षणी आपला संघ मागे पडला होती, अशी आठवण आनंद यांनी काढली; परंतु आताची युवा पिढी अधिक कणखर असल्याचे त्यांनी आवर्जून नमूद केले.
बुडापेस्ट येथे झालेल्या बुद्धिबळ ऑलिंपियाड स्पर्धेच्या वेळी आनंद तेथे उपस्थित होते. पुरुष आणि महिला संघांनी एकाच वेळी मिळवलेले विजेतेपद दुहेरी आनंद देणारा होता. मुळात एक राष्ट्रगीत (पुरुषांचे विजेतेपद) झाल्यानंतर लगेच दुसरे राष्ट्रगीत (महिलांचे विजेतेपद) सादर होणे हा अत्यंत भावनिक क्षण होता, असे आनंद म्हणाले.
३ ते १२ ऑक्टोबरदरम्यान लंडनमध्ये होणाऱ्या ग्लोबल चेस लीगमधून गुकेशने विश्रांती घेतली आहे, कारण त्यानंतर लगेच त्याची लिरेनविरुद्ध विश्व अजिंक्यपदाची लढत होणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.