India vs West Indies : कसोटी मालिका व एकदिवसीय मालिका जिंकल्यानंतर आता भारतीय क्रिकेट संघ आजपासून सुरू होणाऱ्या टी-२० मालिकेत बाजी मारण्यासाठी सज्ज झाला आहे. टीम इंडियाचा संघ गुरुवारी खेळवण्यात येणाऱ्या पहिल्या टी-२० सामन्यात वेस्ट इंडीजशी दोन हात करणार आहे. टी-२० मालिका विजयासाठीही भारतीय संघ प्रबळ दावेदार समजला जात आहे. २०२४ मध्ये वेस्ट इंडीज व अमेरिका येथे टी-२० विश्वकरंडकाचा थरार रंगणार आहे. त्यामुळे ३ ऑगस्टपासून सुरू होणारी टी-२० मालिका दोन्ही देशांसाठी टी-२० विश्वकरंडकाची रंगीत तालीम ठरणार आहे.
भारतीय संघाने मंगळवारी मध्यरात्री वेस्ट इंडीजवर मात करीत तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका २-१ अशी खिशात घातली. त्यानंतर ४८ तासांच्या अंतरात भारत-वेस्ट इंडीज हे दोन्ही संघ टी-२० मालिकेत एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत. भारतात ऑक्टोबर, नोव्हेंबर या दरम्यान एकदिवसीय विश्वकरंडकाचे आयोजन करण्यात येणार आहे.
वेस्ट इंडीजविरुद्धच्या एकदिवसीय मालिका विजयामुळे टीम इंडियाचा आत्मविश्वास नक्कीच उंचावला असेल. हार्दिक पंड्या भारताचा कर्णधार असून सूर्यकुमार यादव याच्याकडे उपकर्णधाराची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. सूर्यकुमारने आतापर्यंतच्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीत टी-२० मध्ये संस्मरणीय कामगिरी करून दाखवली आहे. त्यामुळे वेस्ट इंडीजविरुद्धची मालिका त्याच्यासाठी आव्हानात्मक असेल असे वाटत नाही. इशान किशन, यशस्वी जयस्वाल यांनी या दौऱ्यात ठसा उमटवला आहे. शुभमन गिलने अखेरच्या एकदिवसीय सामन्यात अर्धशतकी खेळी करीत फलंदाजी फॉर्म मिळवला आहे.
अजित आगरकर यांची राष्ट्रीय क्रिकेट निवड समितीच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर त्यांनी सर्वप्रथम संजू सॅमसनला टीम इंडियात संधी दिली. त्याने वेस्ट इंडीजविरुद्धच्या अखेरच्या सामन्यात अर्धशतकी खेळीही साकारली. आगामी सामन्यांमध्ये त्याला संधी देण्यात येईल, पण त्याने मिळालेल्या संधीचे सोने करायला हवे. त्यानंतरच एकदिवसीय व टी-२० या दोन्ही विश्वकरंडकात त्याला भारताचे प्रतिनिधित्व करता येणार आहे. त्याच्या खेळावर तमाम क्रिकेटप्रेमींच्या नजरा खिळलेल्या असणार आहेत.
कर्णधार हार्दिक पंड्या अष्टपैलू खेळाडू आहे. तो मध्यमगती गोलंदाजी करतो. पंड्यासह भारतीय संघात चार वेगवान गोलंदाजांचा समावेश करण्यात आला आहे. अर्शदीप सिंग, आवेश खान, उमरान मलिक व मुकेशकुमार या खेळाडूंच्या खांद्यावर भारताच्या वेगवान गोलंदाजीची मदार असणार आहे.
भारतीय संघाने २०१८ पासून वेस्ट इंडीजविरुद्ध खेळवण्यात आलेल्या टी-२० मालिकांमध्ये यश मिळवले आहे. २०१८ ते २०२२ या दरम्यानच्या पाचही द्विपक्षीय मालिका जिंकताना टीम इंडियाने वर्चस्व राखले आहे. आता हार्दिक पंड्याच्या नेतृत्वात भारतीय संघ सलग सहाव्या मालिका विजयासाठी प्रयत्नांची शिकस्त करताना दिसणार आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.