क्वालालंपूर - जागतिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धा डेन्मार्क येथील कोपेनहॅगन येथे २१ ते २७ ऑगस्ट या दरम्यान आयोजित करण्यात येणार आहे. या प्रतिष्ठेच्या स्पर्धेचा ड्रॉ गुरुवारी जाहीर करण्यात आला. एकेरी विभागात भारताची मदार पी. व्ही. सिंधू या महिला खेळाडूसह किदांबी श्रीकांत, एच. एस. प्रणॉय व लक्ष्य सेन या खेळाडूंवर असणार आहे.
जागतिक बॅडमिंटन संघटनेचे मुख्यालय मलेशियातील क्वालालंपूर येथे जागतिक बॅडमिंटन स्पर्धेच्या ‘ड्रॉ’ची घोषणा करण्यात आली. दोन विभागात भारताच्या बॅडमिंटनपटूंना अव्वल दहा खेळाडूंचे मानांकन मिळाले आहे. पुरुष एकेरी विभागात एच. एस. प्रणॉय आणि पुरुष दुहेरी विभागात सात्विक साईराज रंकीरेड्डी-चिराग शेट्टी यांना अव्वल दहा खेळाडूंमधील मानांकन मिळाले आहे.
सिंधू हिने २०१९ मध्ये जागतिक बॅडमिंटन स्पर्धेमध्ये सुवर्णपदक पटकावले आहे. भारताच्या एकमेव खेळाडूला प्रतिष्ठेच्या स्पर्धेतील सुवर्णपदक पटकावता आले आहे. सिंधूला यंदाच्या स्पर्धेतील पहिल्या फेरीत पुढे चाल (बाय) देण्यात आली आहे. त्यानंतर दुसऱ्या फेरीत तिच्यासमोर व्हिएतनामची थुए लिन्ह एनगुएन व जपानची नोझोमी ओकुहरा यांच्यापैकी एका खेळाडूचे आव्हान असणार आहे.
भारताची शटलक्वीन सिंधूला तिसऱ्या फेरीत थायलंडची माजी विश्वविजेती रॅचनोक इंतनोन हिचा सामना करावा लागू शकतो. सिंधूने उपांत्यपूर्व फेरीत मजल मारल्यास तिला जागतिक क्रमवारीत नंबर वन स्थानावर असलेल्या दक्षिण कोरियाच्या ॲन सीयंग हिच्याशी दोन हात करावे लागतील.
त्रिमूर्तींकडून अपेक्षा
पुरुष एकेरी विभागात भारताचे तीन खेळाडू बॅडमिंटन कोर्टवर उतरणार आहेत. लक्ष्य सेन, एच. एस. प्रणॉय व लक्ष्य सेन या तीन खेळाडूंकडून भारताला पदक जिंकण्याची आशा असणार आहे. नववे मानांकन मिळालेल्या प्रणॉयला सलामीच्या लढतीत फिनलँडच्या काल्ले कोल्जोनेन याचे आव्हान परतवून लावावे लागणार आहे.
११व्या मानांकित लक्ष्य सेन मॉरिशसच्या जॉर्जेस पॉल याचा सामना करील. जपानच्या केंटा निशिमोटो याचा कडवा संघर्ष श्रीकांतला मोडून काढावा लागणार आहे. प्रणॉयसमोर उपांत्यपूर्व फेरीत अव्वल मानांकित व्हिक्टर ॲक्सेलसेनचे खडतर आव्हान असेल. लक्ष्य तिसऱ्या फेरीत थायलंडच्या कुनलावूत वितीदसर्ण याला भिडणार आहे.
पुरुष दुहेरीत पदकाची पुनरावृत्ती?
सात्विक साईराज रंकीरेड्डी-चिराग शेट्टी या भारतातील पुरुष दुहेरी विभागातील जोडीवरही पदक जिंकण्याच्या आशा आहेत. २०२२ मधील जागतिक स्पर्धेमध्ये या जोडीने भारताला ब्राँझपदक मिळवून दिले होते.
सात्विक-चिराग जोडीला उपांत्यपूर्व फेरीत ओंग सिन-तिओ ई या मलेशियन बॅडमिंटनपटूंच्या आव्हानाचा सामना करावा लागणार आहे. भारतीय जोडीने उपांत्य फेरीत प्रवेश केल्यास त्यांना लियांग केंग-वँग चँग या चीनच्या खेळाडूंना टक्कर द्यावी लागणार आहे.
हे भारतीयही कोर्टवर उतरणार
महिला दुहेरी - ट्रीस जॉली-गायत्री गोपीचंद, अश्विनी भट-शिखा गौतम
मिश्र दुहेरी - रोहन कपूर-एन. सिक्की रेड्डी, व्यंकट प्रसाद-जुही देवांगन
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.