अहमदाबाद - एकदिवसीय विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत सलग दहा सामन्यांत विजयाचा गड अभेद्य राखणाऱ्या भारतीय फलंदाजीचे बुरूज विजेतेदाचे साम्राज्य निर्माण करण्याची वेळ आली तेव्हा ढासळले आणि पुन्हा एकदा स्वप्नभंग झाला. ऑस्ट्रेलियाने आपल्या सहाव्या अजिंक्यपदावर अधिकारवाणीने ठसा उमटवला.
याच ऑस्ट्रेलियाला हरवून भारताने या विश्वकरंडक स्पर्धेची मोहीम विजयाने सुरू केली होती; परंतु त्याच ऑस्ट्रेलियाकडून शरणागती पत्करण्याची वेळ नेमकी अंतिम सामन्यात आली. एकीकडे सर्व भारतीय फलंदाज झगडत होते, तेथे ट्रॅव्हिस हेडने मात्र दमदार शतक करून भारतीय गोलंदाजांच्या प्रयत्नांवर पाणी फेरले.
जशी फलंदाजी या पूर्ण स्पर्धेत बहरली होती, तशीच कामगिरी गोलंदाजांनीही केली होती. २४० धावांचे संरक्षण करण्यासाठी मैदानात उतरल्यावर १ लाख ३० हजार प्रेक्षकांनी गलका करत जसप्रीत बुमरा-मोहम्मद शमीच्या पाठीशी आपली ताकद उभी केली. त्या जोशात ऑस्टेलियाची ३ बाद ४७ अशी अवस्था केल्यानंतर अपेक्षा उंचावल्या गेल्या; परंतु ट्रॅव्हिस हेड आणि मार्नस लाबुशेन यांनी या सर्व प्रेक्षकांना शांत राहण्यास भाग पाडणारी दीड शतकी भागीदारी केली.
१९८३ मध्ये कपिलदेव यांच्या संघाने मिळवलेल्या विजेतेपदामध्ये १८३ ही धावसंख्या निर्णायक ठरवली होती. त्यामुळे आजही कोठे तरी आशा कायम वाटत होत्या; परंतु भारतीय संघ तिसऱ्या अजिंक्यपदापासून दूरच राहिला.
नरेंद्र मोदी स्टेडियमवर अनेक खणखणीत खेळी केलेल्या शुभमन गिलला सुरुवातीलाच जीवदान मिळाले होते. सुदैवाने तो चेंडू स्लिपच्या पुढे पडला. गिलने जम बसवण्यासाठी वेळ घ्यायला हवा होता; परंतु कमी वेगात आलेल्या चेंडूवर पूल मारण्याचा प्रयत्न त्याचा हुकला.
स्पर्धेत आत्तापर्यंत बेधडक फलंदाजी केलेल्या रोहितने खेळपट्टी कशीही असली, तरी हाच पवित्रा कायम ठेवला. त्याने सुरुवातीला हेझलवूडवर हल्ला केला. त्यामुळे चार षटकांत ३० अशी नेहमीप्रमाणे सुरुवात झाली होती. ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट कमिन्सने पाचव्याच षटकांत फिरकी गोलंदाज मॅक्सवेलला गोलंदाजी दिली. याच मॅक्सवेलविरुद्ध रोहितने गरज नसताना मोठा फटका मारण्याच्या मोहात विकेट बहाल केली.
मुंबईत झालेल्या उपांत्य सामन्यात चमकदार वेगवान शतक करणाऱ्या श्रेयस अय्यरने वास्तविक रोहित बाद झालेला असताना सावधच खेळायला हवे होते; परंतु एक चौकार मारल्यानंतर तो बाद झाला. पाच चेंडूंच्या फरकाने रोहित आणि श्रेयस अय्यर बाद झाल्यामुळे विराट आणि राहुल यांना चिखलात रुतलेली भारतीय फलंदाजाची गाडी प्रथम बाहेर काढण्यासाठी झुंज द्यावी लागली.
एरवी आक्रमक फलंदाजी करणारे कोहली आणि राहुल कमालीचे शांत झाले. राहुलने एक चौकार मारला तो ९८ चेंडूंनंतर आला होता. त्यामुळे दोघांचीही गोगलगाय झाली होती.
कोहलीने अर्धशतक पूर्ण केले. तो मैदानावर असेपर्यंत धावांचा वेग किती आहे, याला तितकेसे महत्त्व नव्हते; परंतु कमिन्सच्या कटर्स चेंडूवर त्याच्या बॅटला लागलेला चेंडू यष्टींवर लागला तेव्हा भरगच्च स्टेडियममध्ये स्मशान शांतता पसरली होती.
केएल राहुलच्या साथीला जडेजा आला; पण त्यालाही डाव सावरता आला नाही. आदल्या चेंडूवर तो डीआरएसमध्ये वाचला होता; परंतु पुढच्या चेंडूवर तो यष्टिरक्षकाकडे झेल देऊन बाद झाला. कोहलीप्रमाणे राहुलही अर्धशतक करून परतला तेव्हा जेमतेम द्विशतक फलकावर लागले होते.
४ इनिंग. ४५ चेंडू - ३८ धावा. ३ वेळा बाद
(तिन्ही वेळा तो पहिल्या १५ षटकांत बाद)
११ सामने - ५८७ धावा - सरासरी ५४.३७ - स्ट्राईक रेट १२५.९४ - १ शतक आणि ३ अर्धशतके. ३१ षटकार
वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक षटकार
वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक धावा करणारा कर्णधार
वर्ल्डकपमध्ये दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक स्ट्राईक रेट (कमीत कमी ४०० पेक्षा अधिक धावा)
५८० - रोहित शर्मा (२०२३)
५७८ - केन विल्यम्सन (२०१९)
५४८ - महेला जयवर्धने (२००७)
५३९ - रिकी पाँटिंग (२००७)
५०७ - अॅरॉन फिन्च (२०१९)
४८२ - एबी डिव्हिलियर्स (२०१५)
४६५ - सौरव गांगुली (२००३)
४६५ - कुमार संगकारा (२०११)
विश्वकरंडक स्पर्धेत सलग ५० पेक्षा अधिक धावा
५ - स्टीव स्मिथ (२०१५)
५ - विराट कोहली (२०१९)
५ - विराट कोहली (२०२३)
भारताची वाटचाल
१ ते १० षटके - ८०/२ सरासरी ८.०० (८ चौकार, ३ षटकार)
११ ते ३० षटके - ७२/२ सरासरी ३.६० (१ चौकार)
३१ ते ४० षटके - ३५/१ सरासरी ३.५० (१ चौकार)
भारतीयांकडून चौकार
७ - रोहित शर्मा (३१ चेंडू)
९ - इतर १० जणांकडून (२६९ चेंडू)
संक्षिप्त धावफलक - भारत - ५० षटकांत सर्वबाद २४० (रोहित शर्मा ४७, विराट कोहली ५४, केएल राहुल ६६, मिचेल स्टार्क १०-०-५५-३, पॅट कमिन्स १०-०३४-२) पराभूत वि. ऑस्ट्रेलिया - ४३ षटकांत ४ बाद २४१ (ट्रॅव्हिस हेड १३७ - ११९ चेंडू, १५ चौकार, ४ षटकार, मार्नस लाबुशेन नाबाद ५८)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.