WTC Final 2023 Day 4 Rohit Sharma Cheteshwar Pujara : भारतीय संघ इंग्लंडमध्ये कसोटी सामना खेळतोय तेही ऑस्ट्रेलियासोबत! या कसोटी सामन्यात पहिल्याच दिवशी ऑस्ट्रेलियाने 300 पेक्षा जास्त धावा ठोकल्या. त्यामुळे गतर्षीसारखेच याही WTC Final मध्ये भारत हाराकिरी करणार अशी शंका निर्माण झाली होती. मात्र बॉस हे कसोटी क्रिकेट आहे इथं तासा तासाला खेळ बदलतो. जिंकणार जिंकणार असं म्हणत असतानाच संघ कधी पराभवाच्या खाईत लोटला जाईल याची शाश्वती नसते. (WTC Final 2023 Day 4 Indian Team Fabulous Mindset But Rohit Sharma Cheteshawar Pujara Wrong Shot Cost)
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील WTC Final देखील असाच दोलायमान स्थितीत पोहचली आहे. जरी ऑस्ट्रेलियाने पहिल्या दिवसावर निर्विवाद वर्चस्व गाजवले तरी भारताने दुसऱ्या तिसऱ्या आणि आता चौथ्या दिवशी कांगारूंना कडवी झुंज देत आपली शस्त्रे खाली टाकण्या स्पष्ट नकार दिला. डोक्यावर 444 धावांचे मोठे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या भारताने चौथ्या दिवसाचा खेळ संपला त्यावेळी 3 बाद 164 धावांपर्यंत मजल मारली होती.
म्हणजे आता भारताला विजयासाठी पाचव्या दिवशी 280 धावांची गरज आहे. हातात 7 विकेट्स आणि 90 षटके आहेत. क्रीजवर विराट कोहली आणि अजिंक्य रहाणे ही अनुभवी जोडी आहे. म्हणजे भारत बऱ्या स्थितीत आहे. मात्र भारताला आज ही कसोटी आपल्या हातात घेण्याची नामी संधी होती. भारताची टॉप ऑर्डर विजयी मानसिकता देखील दाखवत होती. मात्र संयम सुटला अन् चुकीचे फटके मारण्याच्या नादात भारताने आपल्या पायवर कुऱ्हाड मारून घेतली.
चौथ्या दिवसाच्या सुरूवातीचा विचार केला तर भारतीय गोलंदाजांनी फलंदाजीला पोषक असलेल्या खेळपट्टीवर जीव तोडून गोलंदाजी केली. यामुळेच भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव स्वस्तात गुंडाळण्याचा प्रयत्न केला. भारतीय गोलंदाजांनी चेंडू स्विंग व्हावा यासाठी फलंदाजाला फ्रंट फूटवर खेळण्यास भाग पाडले. याचबरोबर धावाही जास्त जाणार नाहीत याचं देखील भान ठेवलं.
मार्नसला दिवसाच्या सुरूवातीलाच 41 धावांवर बाद करत कांगारूंना मोठा धक्का दिला. त्यापाठोपाठ कॅमरून ग्रीनला देखील मोठी खेळी करू दिली नाही. मात्र सलग चौथ्या दिवशी भारतीय गोलंदाज गोलंदाजी करत होत. त्यात खेळपट्टी फलंदाजाला पोषक आणि चेंडू जुना झाल्यानंतर कांगारूंनी धावा करण्याचा प्रयत्न केला.
ऑस्ट्रेलियाची अॅलेक्स कॅरी आणि मिचेल स्टार्कची जोडी जमली. या जोडीने सातव्या विकेटसाठी 93 धावांची भागीदारी रचत 6 बाद 167 धावांवरून कांगारूंना 250 पार पोहचवले. दरम्यान, कॅरीचा एक झेल स्लीपमधून पास झाला. यावेळी स्पीपमध्ये उभ्या असलेल्या दोन खेळाडूंच्या मध्ये हा झेल पडला. मात्र पहले आप पहले आपच्या नादात तो झेल घेण्याचा कोणीच प्रयत्न केला नाही.
जर तुम्ही WTC Final मध्ये पहिल्या दिवशी पिछाडीवर पडल्यानंतर झुंजार कमबॅक करत असाल अन् असे हाफ चान्सेस तुमच्याकडून निसटून गेले तर तुम्ही कितीही इच्छाशक्ती असली तरी इतिहास रचू शकत नाही. कारण इतिहास रचण्यासाठी याच संधी निर्माण करायच्या असातात. जर हा झेल पकडला गेला असता तर तो सामन्याचा टर्निंग पॉईंट ठरला असता.
कारण कॅरी आणि स्टार्कची मोठी भागीदारी झाली नसती तर कदाचित भारताला 350 धावांच्या आपसपास चेसचे टार्गेट आले असते. अन् खेळपट्टी, भारतीय फलंदाजांची मानसिकता पाहता आपण सामन्यावर चौथ्या दिवशीच पकड निर्माण केली असती.
भारतीय संघाला कांगारूंचा दुसरा डाव 200 च्या आत गुंडाळण्यात यश आले नाही. मात्र तरी देखील 444 धावांचा पाठलाग करण्याची मानसिकता भारतीय संघाने दाखवली. रोहित शर्मा आणि शुभमन गिलने 7 षटकात 41 धावा करत आम्ही हे ड्रॉसाठी नाही तर जिंकण्यासाठी मैदानात उतरलो असल्याचा स्पष्ट संकेत दिला. मात्र शुभमन गिलला तिसऱ्या पंचांनी वादग्रस्त पद्धतीने बाद दिले.
या धक्क्यातून रोहित अन् पुजाराने सावरले. पुजारा देखील टुकू टुकू न खेळता धावा करण्यावर भर देत होता. दोघांनी अर्धशतकी भागीदारी रचली. ही जोडी आजचा दिवसाचे शेवटचे सत्र गाजवणार असे वाटत होते. मात्र धावा करण्याचे खूळ इतके डोक्यात बसले होते की रोहित अन् पुजारा दोघेही गरज नसताना चुकीचे फटके मारून बाद झाले. रोहितचा स्वीप मारण्याचा प्रयत्न फसला तर पुजाराचा सूर्यकुमार स्टाईलने अप्पर कट मारण्याची चाल त्याच्यावरच उलटी पडली. यामुळे 1 बाद 91 वर असणाऱ्या भारताची 3 बाद 93 अशी अवस्था झाली.
भारताला पाठोपाठ दोन धक्के बसल्यानंतर विराट कोहली आणि अजिंक्य रहाणे यांनी कोणताही आगाऊपणा न करता कसोटी क्रिकेट कसोटी क्रिकेटसारखंच खेळण्यास सुरूवात केली. या दोघांनी फक्त डाव सावरलाच नाही तर रोहित आणि पुजाराने जे रनरेट राखले होते ते जास्त ड्रॉप होऊ दिले नाही.
दिवसाच खेळ संपेपर्यंत या दोघांनी 71 धावांची नाबाद भागीदारी रचत भारताला 40 षटकात 167 धावांपर्यंत पोहचवले. मात्र जर रोहित आणि पुजाराने टी 20 स्टाईलच्या फटक्यांची निवड केली नसती करत आता भारत 200 धावांच्या जवळ असता अन् 7 च्या ऐवजी 8 किंवा 9 विकेट्स हातात असत्या. त्यामुळे भारताला उद्या 90 षटकात जवळपास 250 धावाच करायच्या असत्या अन् विकेट्सही जास्त शिल्लक असत्या. असो अजूनही भारत इतिहास रचू शकतो. फक्त भारताच्या अनुभवाने, विराट अन् अजिंक्यने उद्याचे पहिला एक तास खेळून काढणे गरजेचे आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.