WTCFinals - जागतिक कसोटी अंतिम सामना अंतिम दिवशी दोन सत्र अगोदरच संपला असला तरी भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांना निर्धारित वेळेत षटके पूर्ण न केल्याबद्दल आयसीसीने मोठा आर्थिक दंड ठोठावला. मात्र मोठा फटका भारतीयांना बसला. खेळाडूंचे १०० टक्के सामना मानधन कापून घेण्यात येणार आहे, तर ऑस्ट्रेलिया खेळाडूंना ८० टक्के सामना मानधन कपात असा दंड करण्यात आला.
आयसीसीने आपल्या २.२२ या आचारसंहितेच्या कलमानुसार ही दंडात्मक कारवाई केली आहे. हे कलम निर्धारित वेळेत षटके पूर्ण करण्यासंदर्भात आहे. एका षटकामागे २० टक्के सामना मानधन कपात करण्याचा उल्लेख या कलमात आहे.
सामनाधिकारी वेस्ट इंडीजचे माजी खेळाडू रिकी रिचर्डसन यांनी ही कारवाई केली. भारताने पाच षटकांसाठी निर्धारित वेळेपेक्षा जास्त वेळ घेतला, तर ऑस्ट्रेलियाची चार षटके कमी होती. भारतीय कर्णधार रोहित शर्मा आणि ऑस्ट्रेलियन कप्तान पॅट कमिंस यांनी आपली चूक मान्य केली आणि दंडाची शिक्षाही स्वीकारली.
ओव्हलवर झालेल्या सामन्यात सलग पाच दिवस षटकांची गती दोनही संघांना राखता आली नव्हती. वॉक्सहॉल एंडला फलंदाजी करत असताना चेंडू अचानक पुढे टप्पा पडला असताना उसळत होता, ज्याचा आघात बऱ्याच फलंदाजांना सहन करावा लागला.
मार्नस लबुशेन, अजिंक्य रहाणे आणि शार्दूल ठाकूर चांगलेच शेकाटून निघाले होते. आघातांवर उपचार घेताना खेळाडूंना वेळ लागत होता. पंचांनी या सगळ्या गोष्टी गणितात धरल्या तरीही दोनही संघांना अपेक्षित गती गोलंदाजी करताना वेळ पाळता आली नाही.
भारतीय खेळाडूंचे पर्यटन
ओव्हलच्या सामन्यानंतर भारतीय खेळाडूंना प्रदीर्घ कालखंडानंतर किमान तीन आठवड्यांची विश्रांती असल्याने खेळाडू थोडे सुखावले आहेत. कसोटी अजिंक्यपद अंतिम सामन्यातील अपयश मागे टाकायला हीच सुट्टी थोडी मदत करणार आहे.
मोजकेच खेळाडू सपोर्ट स्टाफसह मायदेशी परतणार असून बाकीचे इंग्लंड किंवा युरोपमधील देशात फिरून गरजेची विश्रांती घेण्याचा विचार पक्का करत आहेत, असे समजले.
शुभमन गिलला मोठा फटका
भारतीय सलामीवीर शुभमन गिलला मोठ्या आर्थिक दंडाला सामोरे जावे लागले. सामना मानधनाचे १०० टक्के आणि तिसऱ्या पंचांनी दिलेल्या वादग्रस्त निर्णयावर सोशल मीडियावर टीका केल्याबद्दल १५ टक्के अशा ११५ टक्के रकमेची शिक्षा त्याला सामनाधिकाऱ्यांनी केली. त्याच्याविरुद्ध २.७ या कलमानुसार कारवाई करण्यात आली.
तसेच त्याचा एक डिमेरिट गुणही कापण्यात आला.या कसोटीच्या दुसऱ्या डावात गिलचा झेल कॅमेरून ग्रीनने गलीमध्ये पकडला होता. तिसरे पंच कॅटलबर्ग यांनी हा झेल ग्राह्य धरून गिलला बाद ठरवले. गिलने सोशल मीडियावर इमोजी टाकून आपली भावना व्यक्त केली होती.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.