Wrestling Federation Of India : भारतीय कुस्ती संघटनेकडून येत्या ६ ते ८ डिसेंबर यादरम्यान बंगळूरमध्ये वरिष्ठ राष्ट्रीय कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे. या भारतातील प्रतिष्ठेच्या स्पर्धेमध्ये ऑलिंपिक पदकविजेता अमन सेहरावत यासह इतर स्टार खेळाडूंचाही सहभाग असणार आहे, मात्र या स्पर्धेतील निकालाला न्यायालयाकडून महत्त्व देण्यात आलेले नाही. या स्पर्धेतील निकालाचा खेळाडूंच्या क्रमवारीत बदल करता येणार नाही, तसेच या स्पर्धेतील निकालाद्वारे खेळाडूंना आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करता येणार नाही. न्यायालयाच्या या निर्णयाविरोधात भारतीय कुस्ती संघटनेकडून पाऊल उचलण्यात येणार आहे.
वरिष्ठ राष्ट्रीय कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेची घोषणा करताना भारतीय कुस्ती संघटनेचे अध्यक्ष संजय सिंग यांनी सांगितले की, कर्नाटक येथे पहिल्यांदाच राष्ट्रीय स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे. याचा अभिमान वाटतो आहे. या स्पर्धेमध्ये देशातील दिग्गज खेळाडू सहभागी होणार आहेत. आता कर्नाटक कुस्ती संघटनेच्या साथीने ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी प्रयत्नांची शिकस्त करणार आहोत.