‘नथ’ अत्यंत सुंदर आणि नाजूक दागिना. परंपरा, सौंदर्याची प्रचिती देणारी नथ हा स्त्रीचा खास दागिना. कधी केवळ विवाहिता सौभाग्याचे लेणे म्हणून नथ घालायच्या. आता मात्र नथीचा ट्रेंड तरुणींमध्ये कमालीचा लोकप्रिय असून, नथ घालणे हा फॅशन सिम्बॉल झाला आहे. पाश्चिमात्य कपड्यांचा ट्रेंड आला, तरी नथीमुळे येणारा क्लासिक लूक कधीच कालबाह्य होत नाही. अलीकडे तर नथींच्या अनेक डिझाईन आणि प्रकार बाजारात आले आहेत.
नाक टोचण्याचा संबंध
महिलांच्या आरोग्याशी जोडला जातो. भारतात नथीचा उल्लेख नवव्या आणि दहाव्या शतकात सापडतो. पंधराव्या शतकानंतर नथ अधिकच लोकप्रिय झाली आणि सध्या तर नथीच्या इतकी व्हरायटी आल्या, की कोणकोणते प्रकार घ्यावे असे होते. नथीशिवाय नाकात घालण्यासाठी नथनी, बेसर असते; पण सहसा नथ आपण दररोज घालत नाही. मात्र, दररोज नथ घालण्याची पद्धत ग्रामीण भागात आजही कायम आहे.
काळानुरूप नथीचे आकार आणि प्रकार यामध्ये अनेक बदल झालेले आहेत. पूर्वीची जरा मोठ्या आकाराच्या आणि वजनास जड असायच्या. आत्ताच्या नथीचा आकार नाकाला पेलवेल एवढ्या लहान आकाराचा झाला आहे. मोत्याच्या नथीसह नुसत्या सोन्याच्या, हिऱ्यांच्या आणि चांदीच्या नथीदेखील उपलब्ध झाल्या आहेत. ‘महाराष्ट्रीय नथी’चा ट्रेंड संपूर्ण भारतातच लोकप्रिय होत आहे. ही नथ दिसायला सुंदर असते. या नथींना ‘मुखडा’ असेही म्हणतात. महाराष्ट्राची परंपरा या नथीमध्ये पुरेपूर ठासून भरली असते.
महाराष्ट्रीयन नथींना ‘ब्राह्मीनाथ’ असेही म्हणतात. ही नथ खास सोन्याची, मोत्याची असते. या नथी वेगवेगळ्या आकारात असून यात मोती जडलेले असतात. या नथीने वधूच्या पोषाखाला एक खास गेटअप येतो. ‘कारवारी नथ’ महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या सीमाभागाचे प्रतिनिधीत्व करते. या नथीला सोन्याचा मुलामा असतो. यामध्ये बारा मोती किंवा साधे मोती जोडलेले असतात. ‘पुणेरी’ नथीला फुलासारखे डिझाईन असते. नथीच्या वरच्या बाजूला मोठा खडा आणि तळाशी मोत्यांनी तयार केलेले फूल असते. मधला भाग मोत्यांनी तयार केलेला असतो. या मोत्यांचा आकारही थोडा मोठा असतो. जड दागिन्यांवर ही नथ खूप सुंदर दिसते.
‘पेशवाई’ नथ हा महाराष्ट्रात सर्वाधिक लोकप्रिय प्रकार. ही नथ कोणत्याही प्रकारच्या दागिन्यांवर छान तर दिसते; पण मोत्यांच्या दागिन्यांवर अधिक खुलून दिसते. ही नथ ही तिच्या पारंपरिकता, क्रिएटिव्हिटी आणि त्यावरील केलेले नाजूक काम यासाठी ओळखली जाते. याशिवाय हिऱ्याच्या नथीची क्रेझही आहे. या नथीमध्ये हिरे बसवले जातात. ही नथ सोन्या-चांदीच्या दोन्हींमध्ये तयार केली जाते. दिसायला खास, खूप सुंदर असणारी ही नथ सामान्य महाराष्ट्रीय नथींसारखीच आहे. ज्यामध्ये फक्त हिरे जडलेले असतात. ही नथ राजस्थानी आणि मारवाडी विवाहित महिलांमध्ये घालण्याची पद्धत आहे.
पाचूची नथ ही एक साधी महाराष्ट्रीय नथ असून, ती खूप सुंदर दिसते. ती ‘एमराल्ड नथ’ म्हणूनही ओळखली जाते. या नथीतील लखाखणाऱ्या पाचूमुळे ही नथ रॉयल दिसते. ‘मासोळी’ नथीला माशाच्या आकाराचे डिझाइन असल्यामुळे या नथीला तसे नाव देण्यात आले आहे. खणाच्या साड्या अथवा ऑक्सिडाइज्ड दागिने वापरता येणाऱ्या साड्यांसह मासोळी डिझाइनची नथ अधिक उठावदार दिसते. या नथी नाकाला अगदी गोलाकार अशा फिट बसतात. त्यामुळे चेहरा अधिक आकर्षक दिसतो. मोठ्या आकाराच्या आणि जड नथी आवडत नसतील, तर ‘हुप’ नथ हा प्रकार खूपच चांगला आहे. हल्ली लेंहग्यावर अशा तऱ्हेची नथ घालण्याचा ट्रेंड आहे.
हल्ली लग्नामध्ये साडीपेक्षा लेहंगा घालण्याचा ट्रेंड आहे. त्यावेळी नेहमीच्या पारंपरिक नथीपेक्षा ‘मुघल नथ’ घातली जाते. ही नथ म्हणजे एक मोठी रिंग असते आणि त्याला जोडलेली चेन केसात अडकवता येते.
चित्रपट, मालिकांमध्येही वापर
‘जय मल्हार’ मालिकेतील बानूबाई या व्यक्तिरेखेमुळे या नथीचे डिझाइन लोकप्रिय झाले. ही नथ अर्धवर्तुळाकार आहे. तिला खड्याचा एकच थर असून तळाशी मोती टांगलेला असतो. ‘बाजीराव मस्तानी’ चित्रपटात काशीबाईंची व्यक्तिरेखा साकारण्यासाठी प्रियांका चोप्राने घातलेली नथ नंतर फार लोकप्रिय झाली. लाल आणि हिरव्या रंगाच्या खड्याची ही नथ पुणेरी नथ म्हणूनही ओळखली जाते. या नथीमध्ये पांढऱ्या आणि पिवळ्या मोत्यांचा वापर केला जातो. हिचा आकार थोडा मोठा असून हिची तार मात्र सरळ रेषेत असते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.