आनंदाची ‘रील’मयी दुनिया

मला वाटतं छंद दोन प्रकारचे असतात. एका प्रकारचे छंद आपल्याला लहानपणीच लागतात. त्या छंदासाठी घरचे, नातेवाईक, मित्र-मैत्रिणी तुम्हाला प्रोत्साहन देतात, सतत मागे लागून ती गोष्ट करून घेतात.
neha khan
neha khan sakal
Updated on

छंद माझा

नेहा खान

मला वाटतं छंद दोन प्रकारचे असतात. एका प्रकारचे छंद आपल्याला लहानपणीच लागतात. त्या छंदासाठी घरचे, नातेवाईक, मित्र-मैत्रिणी तुम्हाला प्रोत्साहन देतात, सतत मागे लागून ती गोष्ट करून घेतात. हे लहानपणी लागलेले छंद कदाचित तरुणवयापर्यंत टिकतात, कधी त्याहूनही अधिक काळ आपल्याला ती गोष्ट करायला आवडते. कधी त्याचं व्यवसायात रूपांतर करण्याचाही आपण प्रयत्न करतो. म्हणजे मला लहानपणी अभिनय करायला खूप आवडायचं. तो माझा छंदच आहे. त्याला मी माझ्या व्यवसायामध्ये रूपांतरित केलं आणि आज मी मुंबईत सेटल झाले आहे, माझ्या छंदातून पुरेशी कमाईसुद्धा होत आहे. माझं स्वप्न मी जगत आहे. आता यामध्ये मी खूशही आहे.

दुसऱ्या प्रकारचे छंद तुम्ही मॅच्युअर होता, तेव्हा आपल्याला लागतात. लहानपणीच्या छंदाला तुम्ही जेव्हा व्यवसायात रूपांतरीत करतात, सेटल होता, तेव्हा तुम्हाला दुसऱ्या एखाद्या छंदाची गरज पडते, ज्यातून तुम्हाला मानसिक शांतता मिळेल. तुम्ही तुमच्या आवडीने हा छंद स्वीकारता. तसाच एक छंद मला सध्या जडला आहे. गाण्यातील संगीताचा ठेका समजून घेत त्यावर रील करण्याचा किंवा त्याचा आनंद घेण्याचा मला छंद जडला आहे. मी आज सोशल मीडियावर रील्स करते, तेव्हा मी गाण्याच्या प्रत्येक ठेक्याचा बारकाईने विचार करते. प्रत्येक ठेका एक वेगळा दिसेल, उठून दिसेल याचा विचार मी नृत्यामध्ये किंवा सादरीकरणामध्ये करते. याचा उपयोग मला माझ्या व्यावसायिक आयुष्यातही होतो. मला वाटतं मला ठेका, ताल चांगला समजतो.

लॉकाडाऊन लागला, तेव्हा काही काम नव्हतं. काय करायचं? या प्रश्नातून मी रील्स बघायला, करायला सुरुवात केली. तेव्हापासून मला यामध्ये रस वाटू लागला. रील्स करताना मी अगदी छोट्याछोट्या गोष्टींचा विचार करते. मी वेगवेगळी ॲप्सही ट्राय केले आहेत. मी स्वतः माझी रील्स एडिट करते. त्यातूनही मला मजा येते. मला काही मित्रमैत्रिणी रील्स बनवून द्यायला सांगतात, मीही त्यांना करून देते, त्यातून मला आनंद मिळतो. माझ्या घरचेही मला रील्स बनवण्यासाठी पाठिंबा देतात. माझ्या घरी काम करणाऱ्या ताईंनीही अनेकदा रील बनवण्यासाठी माझी मदत केली आहे. काही कोलॅबोरेशन्ससाठी मला कामे येतात, त्यासाठी बनणारी रील्सही मी स्वतःच एडिट करते. लॉकडाउनमध्येच मी हे रील्सचं एडिटिंग शिकले आणि आज माझ्यासोबत काम करणारेही माझ्या या कौशल्याचं कौतुक करतात. तुम्हाला रीलचा ठेका लक्षात आला, तर तुम्ही चांगलं सादरही करू शकता आणि चांगलं एडिटही करू शकता.

या छंदामध्ये मला नवनिर्मितीचा आनंद मिळतो. मला त्यातून काहीतरी शिकण्याचा आनंद मिळतो. यासाठी मला काही गुंतवणूक करावी लागत नाही, काही पैसे खर्च करावे लागत नाहीत. मी यासाठी शिक्षण घ्यायला जाईन, तेव्हा कदाचित यातला आनंद निघून जाईल, असं मला वाटतं. त्यामुळे मला हा छंद माझ्या आनंदासाठीच जोपासायचा आहे. लोक अनेकदा आपल्या चित्रपटांमुळे आपल्याबद्दल एक मत बनवतात; पण या रील्समुळे तुम्ही लोकांचा तुमच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलू शकता, तुमच्याबद्दल अधिक जाणून घेण्याची संधी रिल्सच्या माध्यमातून चाहत्यांना मिळते. या छंदामुळे मी संयम शिकले. कोणतीही रील एडिट करताना प्रचंड एकाग्रतेनं ते रील पाहावं लागतं, म्युझिक ऐकावं लागतं. हे अगदी बारकाईने करावं लागतं, विचार करावा लागतो. त्यामुळे संयम अधिक गरजेचा असतो. माझे प्रेझेंटेशन स्किल्सही या छंदाच्या माध्यमातून सुधारले आहेत. कोलॅबोरेशन्सच्या माध्यमातून मला रील्स बनवण्याची कामंही येतात. त्यामुळे या छंदातून माझी थोडीफार कमाईही होती आणि आनंदही मिळतो. आज आपण डिजिटलच्या युगात आहोत. कलाकारांनाही या डिजिटल युगासोबत जुळवून घ्यायला लागत आहे. त्यामुळे या माझ्या छंदाचा मला प्रत्येक गोष्टीमध्ये फायदाच होत आहे.

(शब्दांकन : वैष्णवी कारंजकर-इंगळे)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.