ब्रेकचा कचकचीत आवाज आला, मग गाडी धडकण्याचा सुद्धा आणि सोबत एका आश्चर्यचकित होऊन उचकलेल्या मुलाची अर्धवट किंकाळी सुद्धा ऐकू आली.
klcccch! धडाम!
‘आ ऽऽऽऽ !’
ब्रेकचा कचकचीत आवाज आला, मग गाडी धडकण्याचा सुद्धा आणि सोबत एका आश्चर्यचकित होऊन उचकलेल्या मुलाची अर्धवट किंकाळी सुद्धा ऐकू आली.
‘पच्! कोण आहे ते बावळ...’
‘स्स्स... सॉरी सॉरी! खूप सॉरी!’
घारे निळसर डोळे, तोंडावरचा केशरी रंगाचा स्कार्फ खाली करून गुलाबी रंगांच्या ओठांनी, थोडंसं घाबरून एका विशीतल्या मुलीने हे शब्द उच्चारले. राघव तिला बघून आणि तिची कोमल माफी ऐकून नकळत शांत झाला आणि पुढं रागात जे बोलणार होता ते गिळून गेला.
‘हम्म. नीट चालवा की जरा.’
‘सो सॉरी! लक्ष नव्हतं माझं. मी जरा गडबडीतच होते. माझं ना ॲक्च्युली... मांजर जरा आजारी आहे आणि घरी मला जायची जरा घाई होती... त्याच नादात... खरंच सॉरी.’
‘ठीके ठीके. इट्स ओके.’
‘तुम्हाला लागलं तर नाही ना, पायाला खरचटलं असेल ना!’ तिनं तिच्या गाडीवरून उतरून राघवला विचारलं.
‘नाही नाही.. काही नाही झालं.’
‘नक्की ना?’
‘हो हो नक्की. नो इशूझ.’
‘हम्म. सॉरी अगेन.’
‘इट्स ओके. आणि तुमच्या मांजराला काही नाही होणार... डोन्ट वरी. आय थिंक तुम्ही निघा.’
‘हम्म. थँक यू.’
‘एक विचारू?’
‘हां??’ ती मुलगी वळता वळता आणि स्कार्फ बांधता बांधता थांबली.
‘मांजर लहान आहे? पहिल्यांदा पाळली आहे का?’
‘हां ... हो हो! पण तुम्हाला कसं कळालं?’ तिनं आश्चर्यचकित होऊन विचारलं.
राघव लागलेल्या पायाच्या दुखण्यात कसंबसं हसला. ‘कळतं ते, मी ही असाच होतो. माझ्याकडं पण आहेत मांजरी,’’ तो म्हणाला.
‘ओह अच्छा!’
‘म्हणूनच म्हणालो, काही नाही होणार मांजराला. त्यांच्या पहिल्या पावसाळ्यात ते पडतात थोडं आजारी.’
ती मुलगी हलकी हसली आणि तिचा थोडा डोक्यावरचा भार हलका झाला हे राघवला जाणवले. ती ‘निघते’ म्हणून गाडीवर बसली.
मग स्कार्फ बांधता बांधता म्हणाली, ‘मी एक विचारू तुम्हाला?’
‘हां? हां विचारा ना...’ राघव लक्ष देऊन ऐकायला लागला.
‘तुम्ही कलाकार, ॲक्टर वगैरे नाही आहात ना?’ तिनं विचारलं. राघवनं हसल्यासारखं केलं, ‘हां? हाहा... नाही नाही! मी नाहीये ॲक्टर वगैरे.’
‘हम्म... वाटलंच मला...’
‘म्हणजे? असं का म्हणताय?’ राघवनं गोंधळून विचारलं.
‘तुम्हाला माझ्यामुळं बऱ्यापैकी लागलंय, पण तुम्ही ते माझ्यासमोर लपवायची खूप वाईट ॲक्टिंग करताय... त्यावरून कळालं, तुमचा अभिनयात काय खास रस नसणार.’ ती मुलगी म्हणाली. राघव तिच्या बोलण्यावर काय म्हणायचं हे विचार करत तिथंच चकित आणि मनात हलका लाजलेला उभा राहिला.
‘नाही नाही... म्हणजे...तसं नाही...’ राघवनं ततपप केलं.
समोर गाडीवर बसून स्कार्फमध्ये ती मुलगी हलकी गोड हसतीये हे तिचे बारीक झालेले घारे डोळे बघून राघवला कळालं.
तिनं गाडी सुरू केली आणि ती निघून गेली. राघवनं तिला जाताना बघता बघता थोडीशी डाव्या पायाची जीन्स वर फोल्ड केली, कशी बशी गुडघ्यापर्यंत आणली. त्याच्या पायाच्या जखमेवर थोडी फुंकर मारली. त्याला फार जळजळ होत होती. मग त्यानं जीन्स थोडीशी झटकली. पुन्हा ती गेलेल्या वाटेवर पाहिलं आणि त्याची गाडी सुरु करून त्यानं त्याची वाट पकडली. त्याला गाडीवर जाताना संदीप खरे ह्यांची कविता सारखी आठवत राहिली:
‘देवा मला रोज एक अपघात कर...’
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.