आनंददायी मातृत्व

मला आईपणाची चाहूल लागली, तेव्हा मी ‘एका लग्नाची पुढची गोष्ट’ हे नाटक करत होते; तसंच ‘चार दिवस सासूचे’ ही मालिकाही सुरू होती.
acting field and motherhood parenting tips relationship
acting field and motherhood parenting tips relationshipsakal
Updated on

- कविता लाड

मला आईपणाची चाहूल लागली, तेव्हा मी ‘एका लग्नाची पुढची गोष्ट’ हे नाटक करत होते; तसंच ‘चार दिवस सासूचे’ ही मालिकाही सुरू होती. अभिनय क्षेत्रात असल्यामुळे पतीसमवेत  विचारविनिमय करूनच बाळ होऊ देण्याचा निर्णय घेतला होता.

त्यानुसार नियोजनही केले होते. नाटकामध्ये अभिनय करत असल्याने वेगवेगळ्या शहरांमध्ये प्रयोगासाठी दौर होतात. मात्र, प्रेग्नंट असल्यामुळे नाटकासाठी काहीकाळ विश्रांती घ्यावी, असं मी ठरवलं. मालिकांमध्येही अभिनय करत असल्याने एकाच प्रॉडक्शनवर लक्ष देण्याचं नियोजन केलं. त्यादरम्यान, प्रॉडक्शन हाऊसच्या लोकांनी मला खूप साथ दिली.

त्यांनी सांगितलं, की ‘तुम्हाला ब्रेक घेण्याची गरज नाही. आम्ही तुम्हाला योग्य ती मदत करू.’  त्यामुळे आठव्या महिन्यापर्यंत मी ‘चार दिवस सासूचे’ ही मालिका केली. आईपणाच्या काळात करिअरबाबत मला फारशी तडजोड करावी लागली नाही, कारण ते क्षण खूप आनंदाचे होते. मला नाटकात काम करणं खूप आवडायचं आणि ते मी अचानक थांबवलं, एवढीच तडजोड मला त्या काळात करावी लागली.

कारण प्रवासामुळे आपली काळजी आपल्यालाच घ्यावी लागणार होती. मी काही काळ नाटकाला ब्रेक देण्याचा निर्णय घेतला, तेव्हा पाचवा महिना सुरू होता आणि मी चिंचवडला शेवटचा प्रयोग केला. तेव्हा प्रत्येक वाक्य म्हणताना माझ्या डोळ्यांत पाणी येत होतं.

कारण, ब्रेक घेण्याचा निर्णय घेतल्याने काहीकाळ का होईना रंगभूमीपासून मी दुरावणार होते. त्यामुळे मला खूप वाईट वाटलं. अभिनय क्षेत्रामध्ये असल्यानं माझ्यासह सर्वच कलाकारांना प्रत्येक गोष्टीचा विचार करावा लागतो.

कामाच्या वेळा, बारा-बारा तासांच्या शिफ्ट्समध्ये कसं काम करायचं, हा विचार मनामध्ये आला होता. मात्र, मला नेहमीच चांगली प्रॉडक्शन हाऊस मिळाली, ज्यामुळे माझ्या प्रेग्नंसी दरम्यानही मी काम सुरू ठेवू शकले.

आई होणं हे प्रत्येक स्त्रीचं स्वप्न असतं. त्यामुळे मी खूप आनंदात होते. घरात लहान बाळ, त्याच्यासोबत सगळं घर भरलेलं होतं. मी स्वतःला खूप नशीबवान समजत होते, कारण घरातल्या लोकांनी मला त्या कालावधीमध्ये खूप मदत केली.

कुणी बाळाला सांभाळायचं, कुणी मला खायला करून द्यायचं, असं सगळं व्यवस्थित सुरू होतं. त्यामुळे मला प्रेग्नंसीच्या दरम्यान आणि आई झाल्यानंतर अजिबात त्रास झाला नाही. मी अगदी आनंदात होते. माझं बाळही खूप शहाणं होतं. वेळेवर झोपायचं, वेळेवर उठायचं, त्यामुळे त्याची काळजी घेण्यामध्ये आमच्या सर्व कुटुंबाला काहीही अडचण आली नाही.

मातृत्वाचा आनंद घेत असतानाच अभिनयात पुन्हा पदार्पण करण्यापूर्वी विचार केला होता, की बाळाची काळजी कशी घेणार? पण माझी आई, सासूबाई आणि घरातल्या इतरांनी खूप साथ दिली. मी पूर्णवेळ काम करत नव्हते, त्यामुळे माझं लक्ष बाळाकडे होतं. जेव्हा बाळ प्लेग्रुपला जायला लागलं, तेव्हा सगळी छोटी-छोटी कामं, शाळेत वेळेत घेऊन जाणं, व्यवस्थित काळजी घेणं, हे सगळे आनंदाचे क्षण मी अनुभवले.

त्यामुळे तो काळ खूप अविस्मरणीय, आनंददायी आणि सुंदर होता. अभिनय क्षेत्र इतकं सुंदर आहे, की त्याचं आकर्षण नेहमीच असतं; पण आई झाल्यानंतर या क्षेत्राकडे पाहण्याचा माझा दृष्टिकोन अधिक सकारात्मक झाला. अभिनय करत असताना आई-मुलाचं नातं रंगवताना ते आपोआपच अधिक खरेपणानं येऊ लागलं. 

आई होणं आणि करिअर यांच्यात मला फारशी तडजोड करावी लागली नाही. उलट, आईपणामुळे जीवनात नवीन आनंद, नवीन अनुभव मिळाले. काम करताना बाळाच्या संगोपनाचं व्यवस्थापन चांगल्या प्रकारे करता आलं. आई-मुलाचं नातं जास्त गहिरं आणि वास्तववादी झालं. एकूणच आईपणाचा आनंद मी मनमुरादपणे घेतला. हे करत असतानाच करिअरकडेही तेवढ्यात काळजीपूर्वक लक्ष दिले.

करिअरिस्ट मुलींसाठी टिप्स

  • प्रत्येक स्त्रीचं मातृत्व, आयुष्य आणि आव्हानं या गोष्टी वेगवेगळ्या असतात. त्यामुळे     विचारविनिमय करून निर्णय घ्या.

  • आपल्याला जे काही करायचं असेल ते मनापासून करा, बाकीच्या गोष्टी आपोआप घडत जातील.

  • बाळाच्या संगोपनात घरच्यांची मदत मिळणं खूप गरजेचं आहे. कुटुंब सोबत असलं, की सगळे मार्ग सोपे होतात.

  • करिअर आणि आई होणं दोन्ही महत्त्वाचं आहे. तुम्ही आयुष्यात कोणत्या टप्प्यावर आहात, याचा विचार करून प्राधान्यक्रम ठरवा आणि निर्णय घ्या.

  • करिअरमध्ये काही काळासाठी लवचिकता ठेवण्याची तयारी असावी. कधी-कधी ब्रेक घेणं गरजेचं असतं.

(शब्दांकन : आकांक्षा पाटील)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.