माझ्या मते, कुटुंब व्यवस्था अनेक गोष्टींवर अवलंबून असते. पण त्यापैकी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रेम, आदर, स्पष्ट संवाद आणि तुमच्या कुटुंबियांचा आधार. एखाद्याचं संगोपन कसं होतं आणि तुम्ही जीवनाकडून कोणत्या गोष्टी शिकता, त्यावर या सर्व गोष्टी अवलंबून असतात.
खरं सांगायचं तर मला माझी आई सर्वाधिक आवडते. मी लहान असल्यापासूनच ती माझी सर्वात चांगली मैत्रीण बनली आहे. असं असलं, तरी मी माझे वडील आणि भावांचीही आवडती आहे. ते सुध्दा माझ्या कठीण काळात माझ्यासोबत उभे राहिले आहेत. पण इतर कुणापेक्षा माझी आई मला अधिक चांगलं ओळखते.
जीवनातील कठीण प्रसंगात तिने माझी मदत केली असून मला तिने मुक्त पक्ष्याप्रमाणे वागण्यास शिकवलं आहे. ती माझी सर्वात मोठी टीकाकारही असून ती मला अनेकदा रागावलीही आहे.
पण त्यामुळेच आमचं नातं अधिक घट्ट बनतं. अशी कोणती गोष्ट नाही, जी मी तिला सांगत नाही. ती खूप समजूतदार व्यक्ती असून मला तिची हीच गोष्ट सर्वात आवडते.
मला चांगल आठवतंय, मी जेव्हा शाळेतून दुपारी अडीच-तीन वाजेपर्यंत घरी येत असे, तेव्हा ती माझ्यासाठी जेवण बनवून ठेवत असे. मी स्वयंपाकघरात ओट्यावर बसून तिला दिवसभरातील सर्व घटना सांगत असे. तिच्याबरोबरचे हेच क्षण माझे सर्वात आवडीचे आहेत.
तुमचं कुटुंबीय हेच तुमचे जीवनातील सर्वात मोठे आधारस्तंभ असतात आणि माझ्या कुटुंबाचंही हेच सर्वात मोठं वैशिष्ट्यही आहे. आमच्या कुटुंबाबद्दल बोलायचं झाल्यास कठीणप्रसंगी आम्ही सर्वजण एकत्र येतो आणि मग आमच्या घराला खरं ‘घरपण’ येतं.
कोणत्याही प्रसंगात आम्ही आमच्या कुटुंबियांच्या मागे उभे राहतो आणि प्रत्येकावर बिनशर्ती प्रेम करतो आणि त्याचा आदर करतो. आम्ही एकमेकांना खूप जपतो आणि आम्ही एकमेकांचे नातेवाईक असण्यापेक्षा आमच्यात मैत्रीचे नाते अधिक आहे.
अगदी आताआतापर्यंत आम्ही सर्वजण मुंबईत एकत्र राहात होतो. पण माझ्या वडिलांच्या कामामुळे माझे कुटुंबीय पुन्हा दिल्लीत स्थलांतरित झाले आहेत.
मला आता त्यांची खूप आठवण येत असली, तरी मला ठाऊक आहे की मी केव्हाही विमानने दिल्लीला त्यांना भेटायला जाऊ शकते. आम्ही एकत्र आल्यावर चित्रपट पाहतो, फिरायला जातो, खेळ खेळतो आणि बरंच काही करतो. आम्ही भरपूर पार्ट्याही करतो, जेवायला बाहेर जातो आणि एकत्र वेळ व्यतीत करतो.
माझं कुटुंब हे माझ्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे, यावर माझा पहिल्यापासूनच विश्वास होता. माझ्या पालकांनी मला ज्या प्रकारे वाढवलं आणि त्यांच्या कुटुंबियांविषयीच्या गोष्टी सांगितल्या, तेव्हापासून मी कुटुंबाचं महत्त्व समजू शकले. असं असलं, तरी इतकी वर्षं मी माझ्या कुटुंबाबरोबरच राहात होते आणि मी जेव्हा दिल्लीला गेले, तेव्हा आपल्या आवडत्या लोकांमध्ये राहणं काय असतं, त्याची मला पुन्हा एकदा जाणीव झाली.
नातेसंबंधांमध्ये सुधारण्यासाठी
एकमेकांशी संवाद हाच सर्व गोष्टींत महत्त्वाचा मुद्दा आहे. मी माझ्या पालकांशी दररोज बोलते, गप्पा गोष्टी करते. मग मी कुठे का असेना किंवा मी कितीही थकलेली का असेना! मी त्यांच्याशी दिवसभरात एकदा तरी बोलतेच. आमचा व्हॉटसअॅपवर कौटुंबिक ग्रुपही आहे.
मी सध्या झी टीव्हीवरिल "रब से है दुआ" या मालिकेत दुआची भूमिका साकारत आहे. चित्रीकरणासाठी सेटवर पोहोचल्यावर मी या ग्रुपवर सतत नवनवी माहिती टाकत असते. त्यात मी घरी कधी आले, जेवण कधी जेवले यासारख्या महत्त्वाच्या गोष्टींची नोंद केलेली असते. ही आमची कौटुंबिक सवयच आहे. माझे भाऊ किंवा आई हे बाहेरगावी जातात, तेव्हा ते सुध्दा हेच करतात. त्यामुळे आम्ही नक्की कोठे आहोत, ते सर्वांना माहित असतं.
नाती दृढ होण्यासाठी...
1) नातं कसं असावं हे प्रत्येक व्यक्तीवर अवलंबून असतं. कारण, प्रत्येकाचं आपल्या कुटुंबियांशी कसं नातं आहे, त्यावर ते अवलंबून असतं.
2) प्रत्येक नातेसंबंधात संवाद अत्यंत महत्त्वाचा असतो. तुमच्या आवडत्या लोकांबरोबर तुम्ही प्रामाणिक असलं पाहिजे.
3) कुटुंबीयांना तुमचं प्रेम दाखवा, व्यक्त व्हा. त्यांना मिठी मारा आणि दरवेळी तुमच्या भावना व्यक्त करा. कारण आपलं प्रेम त्यांना दाखवणं हेही महत्त्वाचं असतं.
4) ते तुम्हाला सुखी करण्यासाठी करीत असलेल्या सर्व छोट्यामोठ्या प्रयत्नांची दखल घ्या. कारण, छोट्या गोष्टींची दखल घेतल्यास त्याचा मोठा प्रभाव पडतो.
5) प्रशंसाही महत्त्वाची असते. तुमच्या कुटुंबाचे तुम्ही स्वत:सुध्दा एक आधार असता. त्यांच्या कामांचा आनंद साजरा करा. त्यांना आराम द्या, त्यांना अधिक चांगलं करण्यासाठी प्रोत्साहित करा. या सगळ्यामुळे तुमचं कौटुंबिक नातं अधिक सुदृढ होईल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.