ऐश्वर्या नारकर
माझ्या आई होण्याच्या प्रवासाची सुरुवात अगदी चित्रपटाच्या चित्रीकरणापासून झाली. माझ्या तिसऱ्या चित्रपटाचं चित्रीकरण कोल्हापूरला सुरू होतं. आईपणाची चाहूल लागल्यानंतर तिसऱ्या-चौथ्या महिन्यापर्यंत मी चित्रीकरण केलं आणि त्यानंतर चित्रपटांचं संकलन झालं. नववा महिना लागला होता, तेव्हा मी आईकडे गेले होते. त्यावेळी डबिंगची प्रोसेस सुरू झाली आणि मी ठरवलं, की डबिंग आत्ता नाही केलं, तर तीन-चार महिने ते होणार नाही.
म्हणून मी नवव्या महिन्यात डबिंग केलं. त्या चित्रपटाचं नाव होतं ‘माहेरची सरस्वती, सासरची लक्ष्मी’. त्या चित्रपटाच्या प्रक्रियेदरम्यानच माझी डिलिव्हरी झाली. कोल्हापूरला चित्रीकरण करताना युनिट खूप चांगलं होतं आणि टीमवर्क उत्कृष्ट होतं. माझी आई माझ्यासोबत होती आणि तिच्या सहकार्यामुळे माझ्या आरोग्याचा एकही प्रश्न उद्भवला नाही. त्यामुळे मी पूर्ण उत्साहाने तिथे काम केलं.
माझ्या गर्भधारणेच्या काळात मला कोणत्याही प्रकारची तडजोड करावी लागली नाही. माझ्या कुटुंबाचा पूर्ण पाठिंबा होता आणि चित्रपटाच्या कामात आईचा आधार मिळत होता. टीम चांगली असल्यामुळे मला जास्त तडजोड करावी लागली नाही. त्यावेळी एक मालिकाही सुरू होती आणि काम करत राहिल्यानं मी सक्रिय राहिले. चित्रीकरण आणि वैद्यकीय तपासण्या एकत्र सुरू होत्या, त्यामुळे सगळं व्यवस्थित होतं. त्यामुळे माझे नऊ महिने कसे निघून गेले, ते समजलंच नाही.
आमच्या लग्नाला दोन वर्षं झाल्यानंतर बाळाचं प्लॅनिंग करायचं हे ठरलं होतं. त्यामुळे काम करता-करता सगळं चाललं होतं. नऊ महिन्यांच्या काळात हातातले प्रोजेक्ट्स संपवावे लागले. आई झाल्यानंतरचा पहिला एक महिना मी माहेरीच होते. आई-बाबा माझ्यासोबत होते आणि नंतर एक-सव्वा महिन्यानंतर मी माझ्या घरी म्हणजे सासरी गेले.
एकत्र कुटुंब असल्यामुळे मला टेन्शन नव्हतं. सहा महिने मी माझ्या बाळाला मनापासून दिले. डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे, स्तन्यपान खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळे मी सहा महिने पूर्णपणे बाळाला दूध दिलं. घरच्यांनी खूप काळजी घेतली आणि त्यामुळे करिअर आणि आईपण हे एकदम हातात हात घालून झालं. अमेय जेव्हा सात महिन्यांचा झाला, तेव्हा दूरदर्शनवर ‘महाश्वेता’ मालिकेत मी काम करू लागले.
त्यावेळी अमेय स्तन्यपानावर होता; पण बाहेरचं खाणंही सुरू होतं. त्यामुळे चित्रीकरण करून जेवणाच्या सुट्टीत मी घरी यायचे, किंवा लवकर पॅकअप झालं, की लवकर घरी यायचे. चित्रीकरणाच्या वेळी मी नणंदेला सोबत घेऊन जायचे. दोन वर्षं चित्रीकरण करत-करत त्यालाही सांभाळलं आणि यत सगळ्यात मोठा हात माझ्या एकत्र कुटुंबाचा आहे.
आईपण हा अडथळा नाही, तर ती एक गुरुत्वाची प्रक्रिया आहे. माणूस बनण्याचा हा महत्त्वाचा टप्पा आहे आणि तो आनंदानं अनुभवायला हवा. करिअर होतं राहील. बऱ्याच वेळा असं होतं की, करिअर फुल स्विंगमध्ये असताना आई होण्याचा निर्णय घेऊ की नको, असा प्रश्न पडतो. मला असं वाटतं की, करिअरला दुसऱ्या प्राधान्यक्रमावर ठेवलं पाहिजे.
आई होण्याचा निर्णय योग्य वेळेत घेतला, तर आपल्याकडे वेळ राहतो. यामुळे आपण करिअरच्या बाहेर जात नाहीत. बाळ मोठं झाल्यावर पुन्हा करिअरकडे लक्ष देता येतं. आई होण्याचा निर्णय योग्य वेळेत घेतल्यास तब्येतीसाठीही चांगलं असतं. बाळ मोठं झाल्यावर आपलं वय काम करण्यासाठी योग्य असतं. करिअर आपण व्यवस्थित मॅनेज करू शकतो.
टेन्शन घेऊन आपले सोन्याचे क्षण घालवण्यात काहीच अर्थ नाही. आई होणं हा आयुष्यातला अनमोल अनुभव आहे, जो आनंदानं उपभोगावा. करिअर आणि आईपण यांचा योग्य समतोल साधल्यास जीवन अधिक समृद्ध होतं.
करिअरिस्ट मुलींसाठी टिप्स...
आई होण्याचा निर्णय योग्य वेळेत घ्यावा, इतर कोणत्याही गोष्टीचा विचार करू नये.
आई होण्याची प्रक्रिया आनंदानं अनुभवावी. आपण आनंदात असलो तर बाळाला सकारात्मक ऊर्जा मिळते.
स्तन्यपान अत्यंत महत्त्वाचं आहे. त्यातून बाळाची रोगप्रतिकारशक्ती वाढते आणि बाळाशी भावनिक नातंही दृढ होतं.
आपल्या आहाराची आणि व्यायामाची काळजी घ्यावी. व्यवस्थित खाणं-पिणं ठेवावं. आई होण्याच्या काळात करिअरचा विचार करू नये. आवडीचं काम नंतरही करता येईल.
बाळंतपणानंतर जितका वेळ बाळाच्या संगोपनासाठी देऊ शकाल, तितका वेळ द्यावा. काम करताना बाळाकडे दुर्लक्ष होतं म्हणून तणाव बाळगू नका.
(शब्दांकन : आकांक्षा पाटील)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.