विश्वास असलेली मैत्री

दोन व्यक्तींमध्ये असणारं प्रेम, त्याग, पाठिंबा आणि विश्वास म्हणजे मैत्री होय. हे नातं विश्वासावर अवलंबून असतं. कधी गोड, तर कधी आंबट असणारं हे नातं.
actress bhagyashree milind and harshla shirsat
actress bhagyashree milind and harshla shirsatsakal
Updated on

- भाग्यश्री मिलिंद, हर्षला शिरसाट

दोन व्यक्तींमध्ये असणारं प्रेम, त्याग, पाठिंबा आणि विश्वास म्हणजे मैत्री होय. हे नातं विश्वासावर अवलंबून असतं. कधी गोड, तर कधी आंबट असणारं हे नातं. याबद्दल कितीही बोललं तरी शब्द अपुरे पडतील. असंच काहीसं नातं आहे अभिनेत्री भाग्यश्री मिलिंद आणि हर्षला शिरसाट यांच्यामध्ये.

याविषयी भाग्यश्रीनं सांगितलं, ‘‘मी आणि हर्षला शाळेत असल्यापासून एकमेकींना ओळखतो; परंतु शाळेत असताना आमची मैत्री नव्हती. कॉलेजमध्ये आमची खऱ्या अर्थानं मैत्री झाली. एका बेंचवर बसणं असो किंवा सोबत अभ्यास करणं असो, नोट्स शेअर करणं असो.. या सगळ्या गोष्टींतून आमची मैत्री होत गेली आणि आता आम्ही एकमेकींच्या अगदी जीवाभावाच्या मैत्रिणी झालो आहोत.

आमची मैत्री होण्यामागचं मुख्य कारण म्हणजे आमचे स्वभाव. आम्ही अगदी एकमेकांच्या विरुद्ध आहोत. उदाहरणार्थ, मी खूप इंट्रोवर्ट आहे. मी त्यावेळी लोकांशी फारशी बोलायची नाही. मी स्वतः स्वतःमध्येच असायची. अजूनही बऱ्यापैकी मी तशीच आहे. हर्षला मात्र याबाबतीत अगदी विरुद्ध आहे. तिला लोकांमध्ये मिसळायला खूप आवडतं.

ती पटकन् मैत्री करते, सगळ्यांशी बोलून चालून असते... नवनवीन गोष्टी करायला नेहमीच उत्साही असते. माझी तिच्याशी मैत्री झाली, तेव्हा मी फक्त तिच्याशीच नाही तर तिच्या फॅमिलीशीही कनेक्ट झाले. हर्षला मला सगळ्यांमध्ये घेऊन जायची, लोकांशी बोलायला लावायची, मनातल्या सगळ्या गोष्टी शेअर करायला सांगायची. मी माझ्या भावना व्यक्त केल्या पाहिजेत यासाठी पुश करायची. यातूनच खरंतर आमची मैत्री होत गेली.

‘मी हर्षलाला कॉलेजमध्ये भेटले होते, त्यावेळी माझा ‘बालक पालक’ चित्रपट ऑलरेडी प्रदर्शित झाला होता. मात्र, हर्षलाला मी अभिनेत्री आहे, मी आधी चित्रपटात काम केलं आहे, यानं काहीच फरक पडत नव्हता. ती इतर सगळ्या मैत्रिणींसारखीच माझ्याशी वागायची आणि म्हणूनच मलाही ती कधी वेगळी नाही वाटली.’

हर्षला सांगत होती, ‘‘माझी आणि भाग्यश्रीची मैत्री काहीशी अशी आहे, की जिथे आमच्यात दररोज भेट होणं, कॉल किंवा मेसेजेसवर बोलणं होणं मैत्री टिकण्यासाठी गरजेचं नाही. उलट जो वेळ आम्ही सोबत घालवतो तो आमचा असतो. त्यामध्ये आम्ही आमच्या आयुष्यात जे काही चाललं आहे ते एकमेकींशी शेअर करतो. आयुष्यातील प्रत्येक मिनिटाच्या अपडेट्स मला दिल्याच पाहिजेत, असा काही आमच्या दोघींचाही हट्ट नसतो.

‘भाग्यश्रीचा स्वभाव सच्चा आहे. ती कधीच कोणाशी खोटं वागत नाही. तिला जे योग्य वाटतं ते ती करते. तिचा फोकस खूप क्लिअर आहे. तिला माहितीये तिला काय करायचं आहे ते. त्यामुळे ती आपल्या ध्येयाच्या दिशेनं नेहमीच मेहनत करत असते. तसंच ती जे काही ठरवते ते करत असताना त्यामध्ये सातत्यही राखते, हे तिच्याकडून शिकण्यासारखं आहे. ते माझ्यानं नाही होत.

मी एखादी गोष्ट ठरवतेच पण काही दिवसांनी त्यातील सातत्य कमी होत जातं. मात्र, भाग्यश्री अशी नाहीये. मला वाटतं, की तिनं थोडं एक्स्ट्रोवर्ट व्हायला हवं. ती ज्या क्षेत्रात काम करते तिथं तिला अनेक लोकांशी बोलणं गरजेचं आहे आणि ते ती बऱ्यापैकी करतेही; पण तिनं याकडे अजून थोडं लक्ष देऊन स्वतःला थोडं एक्स्प्लोअर केलं पाहिजे असं मला वाटतं.’

भाग्यश्री म्हणाली, ‘हर्षलाची खूप चांगली बाब म्हणजे तिला समोरच्याला न दुखावता त्याची चूक त्याला सांगता येते. आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात अशी एखादी व्यक्ती असलीच पाहिजे आणि मी भाग्यवान समजते, की माझी बेस्ट फ्रेंडच माझ्यासाठी ती व्यक्ती आहे. तिच्यात खूप संयम आहे.

तिला मी एखादी गोष्टी वारंवार सांगितली, तरी ती तेवढ्याच शांतपणे ते ऐकून घेते. तिच्यातील समजूतदारपणाही माझ्या आवडीच्या गुणांपैकी एक आहे. तिचा सिक्स्थ सेन्स खूप छान आहे. तिचे गट फीलिंग खूप स्ट्रॉंग असतात. बऱ्याचवेळा तिला काहीतरी वाटतं आणि ते ती पटकन बोलून जाते; पण पुढे ते खरं होतं.

‘आम्ही गेली कित्येक वर्षं सोबत आहोत आणि आम्ही जशा आहोत तसं एकमेकींना स्वीकारलंही आहे. मला नाही वाटत, की तिनं स्वतःमध्ये काही बदल केले पाहिजेत. मला माझ्या एका सहकलाकारानं सांगितलं होतं, की आपली एखाद्याशी ओळख होते आणि मग कालांतरानं मैत्री होते; पण त्या ओळखीला मैत्री म्हणणं चुकीचं आहे.

आपला खरा मित्र तो असतो ज्याच्यासाठी आपल्याला मनातून काहीतरी करावंसं वाटतं असेल. मग भावनिकरित्या, मानसिकरीत्या आपण त्या व्यक्तीमध्ये आपलं प्रेम, काळजी इन्व्हेस्ट करत जातो. असंच प्रेम समोरची व्यक्तीही आपल्यावर करत असेल, तर ती व्यक्तीच आपला खरा मित्र किंवा मैत्रीण होय.’

(शब्दांकन : मयूरी गावडे)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.