हवाहवासा ‘वाचनानंद’

खरं सांगायचं म्हणजे मला दोनच मुख्य छंद आहेत, एक म्हणजे वाचन आणि दुसरं म्हणजे चित्रपट पाहणे. फावल्या वेळात मला माझ्या भाच्यांसोबत वेळ घालवायलाही फार आवडतं.
actress prajakta mali
actress prajakta malisakal
Updated on

खरं सांगायचं म्हणजे मला दोनच मुख्य छंद आहेत, एक म्हणजे वाचन आणि दुसरं म्हणजे चित्रपट पाहणे. फावल्या वेळात मला माझ्या भाच्यांसोबत वेळ घालवायलाही फार आवडतं. त्यांच्याशी गप्पा मारणं, त्यांच्यावर संस्कार होतील अशा काही गोष्टी करणं हा एक माझा आता आवडता छंद झाला आहे. त्यातली महत्त्वाची गोष्ट म्हणजे वाचन. मला लहानपणापासूनच वाचनाची प्रचंड आवड आहे.

मी अक्षरशः जे हातात पडेल ते वाचायचे. घरूनही मला वाचनासाठी प्रोत्साहन होतं. मी लहानपणापासूनच अभ्यासू मुलगी होते. आम्ही सहलीला जायचो, तेव्हाही मी वाचत बसलेली असायचे. मला अजूनही आठवतं आम्ही सर्वजण तिरुपतीला चाललो होतो, तेव्हा सर्वजण प्रवासात गाण्यांच्या भेंड्या खेळत होते आणि मी एकटी कोपऱ्यात बसून ‘पानिपत’ कादंबरी वाचत होते; पण घरच्यांनी मला मोकळं सोडलं होतं.

‘तुला वाचायचं आहे, तर वाच. भेंड्या नाही खेळलीस तरी चालेल’, अशा पद्धतीचं ‘सायलेंट’ प्रोत्साहन त्यांनी मला कायमच दिलं आहे. ‘आम्ही खेळतोय तर आमच्यासोबत ये, आमच्यात खेळ’, अशी कधीही जबरदस्ती त्यांनी मला केली नाही.

मला ऐतिहासिक कथा कादंबऱ्या, ललित साहित्य, आध्यात्मिक पुस्तकं वाचायला आवडतात. सध्या मी ‘अ नोट टू द सिन्सियर सीकर’ हे पुस्तक वाचत आहे. महाभारत मी अत्यंत मन लावून वाचलेलं आहे. पुण्याच्या भांडारकर इन्स्टिट्यूटमध्ये असलेली महाभारताची मूळ प्रत मी कोरोना काळात वाचून काढली.

मी माझ्या भाच्यांनाही वाचनासाठी प्रेरणा देत असते. कोडी सोडवा, चित्रांवरून गोष्टी बनवा, चित्र काढा, रंगवा अशी पुस्तकं मी त्यांना सतत घेऊन देत असते. त्यांच्याकडून मी ते सगळं करूनही घेत असते. त्यांना वाचनाची गोडी लावण्याचा मी प्रयत्न करत असते.

मी कलाक्षेत्रात काम करत असल्यानं मला वाचनाचा खूप फायदा होतो. मला जाणवतं, की अनेकदा लोकांचं क्रियापद चुकतं किंवा उच्चार, व्याकरणात फार चुका होतात. मात्र, वाचनामुळे माझं व्याकरण चुकत नाही. शब्दांचे अर्थ बरोबर माहीत असल्यामुळे ते योग्य ठिकाणी वापरता येतात. बोलीभाषेत आणि स्क्रीनवर त्याचा फायदा होतो. निवेदनामध्ये मला त्याचा विशेष फायदा होतो, जेव्हा उत्स्फूर्तपणे बोलावं लागतं.

बऱ्याचदा आपण लिहून दिलेलं बोलतो; पण काही वेळा उत्स्फूर्तपणे बोलावं लागतं. तेव्हा तुम्हाला पदरचेच शब्द, स्वतःचंच डोकं लावून बोलावं लागतं. त्यामध्ये मला वाचनाचा भरपूर फायदा झाला. दुसरं म्हणजे तुम्ही ज्या भावना अनुभवलेल्या नाहीत, त्या भावनाही पुस्तकांमुळे अनुभवायला मिळतात. त्यामुळे अभिनयातही त्याचा उपयोग होतो. अनेक भावनांचे पदर कथा कादंबऱ्या, ललित साहित्यांमुळे मला कळतात.

अभिनय आणि निवेदन दोन्हीतही मला कमालीची मदत झाली आहे. माझ्या रोजच्या जीवनात, रुटीनमध्ये मला असा वेगळा वेळ काढावा लागत नाही. एखादं पुस्तक मला आवडलं, की ते मी सतत माझ्यासोबत घेऊन फिरते. मी प्रवासात असेन तर घेऊन जाते किंवा झोपण्याच्या आधी एक दहा पानं वाचणार, अंघोळ झाली की पटकन काही पानं वाचून घेणार, असं जेव्हा जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तेव्हा मी ते वाचत असते. मला ते पुस्तक सोडवत नाही. चांगलं पुस्तक मिळालं की, मी गायब होते आणि ते पुस्तक पूर्ण करते.

थोडं टीव्ही आणि ओटीटीनं वाचनाचा वेळ कमी केला, हे मात्र खरं आहे. जेव्हा या गोष्टी नव्हत्या, सोशल मीडिया नव्हतं, तेव्हा जास्त पुस्तकं हाती यायची. आता चित्रपट, ओटीटी, सोशल मीडिया पाहिल्यानंतर मग वाचन होतं. प्राधान्यक्रम बदलले असले, तरीही हातात पुस्तक असतंच.

वाचन अजून आयुष्यातून गायब झालेलं नाही. मी अजून ऑडिओ बुक ट्राय केलं नाही. मला स्वतः डोळ्यांनी वाचायला आवडतं. मला अजून ऑडिओ बुक ही संकल्पना झेपलेली नाही. मी ‘ओल्ड सोल’ आहे. पूर्वापार जे चालत आलंय, तिचं प्रथा फॉलो करणं, मला आवडतं.

आपण स्वतःसाठी खूप कमी वेळ देतो. आपण स्वतःला कधीच प्राधान्य देत नाही. ओशोंचं एक वाक्य मला फार आवडतं. ते म्हणतात, ‘‘तुम्ही तेच देऊ शकता, जे तुमच्याकडे आहे. तुमच्याकडे जर काही नसेल, तर तुम्ही लोकांना काय देणार?’’ तुम्हाला जर लोकांना काही तरी द्यायचंय, शांती समाधान द्यायचं आहे, तर ते तुमच्याकडे असायला हवं. त्यामुळे तुम्हाला लोकांना आनंद द्यायचा असेल तर तो आनंद तुमच्याकडे असायला हवा. हा आनंद छंदामधून मिळतो.

(शब्दांकन : वैष्णवी कारंजकर)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com