परभणी : वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठांतर्गत घटक (शासकीय) आणि संलग्न (खासगी) महाविद्यालयांमध्ये कृषी व संलग्न पदवी ते पीएचडीपर्यंतच्या अभ्यासक्रमांचे शिक्षण घेणाऱ्या मुलींच्या संख्येत वाढ झाली आहे.
यंदा (२०२३-२४) विविध कृषी विद्यापीठांत पदवीसाठी प्रवेशीत ३ हजार ४९८ मध्ये मुलींची संख्या ९४१ (२६.९० टक्के) आहे. पदव्युत्तर पदवीसाठी प्रवेशीत ५१२ मध्ये २५१ (४९.०२ टक्के) मुली आहेत. पीएचडीसाठी प्रवेशीत ६० मध्ये ३५ (५८.३३ टक्के) मुली आहेत.
कृषी विभागासह प्रशासकीय सेवेतील नोकऱ्या तसेच कृषिपूरक व्यवसायाच्या संधींची शाश्वती असल्यामुळे कृषी व संलग्न पदवी अभ्यासक्रमांकडे मुलींचा कल वाढला आहे. गुणवत्तेमध्येही मुली सरस आहेत.
मराठवाड्यामध्ये १९५६ परभणी येथे कृषी महाविद्यालय स्थापन झाले. त्या वेळी कृषी शिक्षणासाठी प्रवेश घेणाऱ्या मुलींची संख्या बोटावर मोजण्याइतकी देखील नसायची. काही वर्षांपूर्वी कृषी पदवी अभ्यासक्रम जणू काही मुलांची मक्तेदारी मानली जायची.
जेमतेम ५ ते १० मुली कृषी पदवीसाठी प्रवेश घेत असत. त्यातही उत्तर पूर्व आणि दक्षिणेतील राज्यातील मुलींची संख्या अधिक असे. कृषी अभ्यासक्रमासाठी १९८६ पासून मुलींसाठी ३० टक्के जागा राखीव करण्यात आल्या आहेत.
कृषी विभागासह प्रशासकीय सेवेतील नोकऱ्या तसेच खासगी कृषी निविष्ठा उत्पादक कंपन्या, बॅंका, विमा कंपन्यांमध्ये रोजगारांच्या संधी आहेत. स्वयंरोजगार करता येतो. शैक्षणिक शुल्क माफ केले जाते. यामुळे कृषी तसेच संलग्न अभ्यासक्रमांना प्रवेश घेणाऱ्या मुलींची संख्या वाढत आहे.
परभणी येथील कृषी महाविद्यालयामध्ये कृषी पदवी अभ्यासक्रमाची प्रवेश क्षमता २१० एवढी आहे. २००८-०९ मध्ये कृषी पदवीस प्रवेश घेतलेल्या मुलींची संख्या ५९ होती. यंदा कृषी विद्यापीठातील विविध पदवीसाठी प्रवेश घेतलेल्या तीन हजार ४९८ विद्यार्थ्यांमध्ये मुलींची संख्या ९४१ (२६.९० टक्के) एवढी आहे. पीएच.डी. कृषीसाठी ३० व अन्नतंत्र अभ्यासक्रमासाठी पाच विद्यार्थिनींनी प्रवेश घेतलेला आहे.
वर्षे -मुले -मुली- एकूण -मुलींची टक्केवारी
२०२१-२२ -२० -१७ -३७ -४५.९४
२०२२-२३- २४- २० -३४ -५८.८२
२०२३-२४ -२५ -३५ -६०- ५८.३३
काही वर्षांपूर्वी केरळ व पूर्वोत्तर राज्यांतील मुली कृषी शिक्षण अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेत असत. कृषीसाठी मुलींचे शैक्षणिक शुल्क माफी आहे. वसतिगृहाच्या सुविधा आहेत. कृषीसह बँका, विविध क्षेत्रांत नोकरी, रोजगाराच्या संधी आहेत. त्यामुळे कृषी तसेच जैवतंत्रज्ञान, कृषी अभियांत्रिकी अभ्यासक्रमास प्रवेश घेणाऱ्या मुलीची संख्या अधिक आहेत.
- डॉ. उदय खोडके,शिक्षण संचालक तथा अधिष्ठाता वनामकृवि, परभणी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.