आपले कुटुंब आपले सर्वस्व असते; परंतु अनेकदा आपण कुटुंबासोबत असतानाही काहीतरी कमतरता जाणवते. ती दूर करण्याचे काम करतात ते आपले मित्र. असा विचार करणारी निर्माती आणि अभिनेत्री क्रांती रेडकरची अभिनेत्री अमृता संतसोबत अशीच मैत्री आहे. क्रांती म्हणते, ‘‘अमृता फक्त माझी मैत्रीण नसून, तीही माझे कुटुंबच आहे.’’
अमृता सांगत होती, ‘‘क्रांती आणि मी रुईया कॉलेजमध्ये एकत्र होतो. खरंतर क्रांती माझी सीनियर आहे; पण ती कधीच माझ्याशी सीनियरसारखी नाही वागली. ती सर्वांशीच खूप फ्रेंडली असायची. मला अजूनही आठवतंय, आम्ही ‘नाट्यवलय’मध्ये तालीम करत होते, जिथे मी पहिल्यांदा क्रांतीला पहिलं. त्यावेळी तिने लाल रंगाचा फुलाफुलांची डिझाईन असलेला एक ड्रेस परिधान केला होता. ती त्यात खूप सुंदर दिसत होती. तिथं माझा काहीतरी प्रॉब्लेम झाला होता आणि त्यावेळी क्रांती मला मदत करायला पुढे आली.
मला खूप छान वाटलं तेव्हा. तिथून आम्ही खऱ्या अर्थानं कनेक्ट होत गेलो. क्रांती तिच्या कमर्शियल नाटकांमुळे बिझी असायची. एकदा अशीच एक गंमत झाली की, क्रांतीचं ‘श्रीमंत दामोदरपंत’ हे नाटक चालू होतं आणि त्यादिवशीच्या प्रयोगाला तिला जाता येणार नव्हतं. म्हणून तिनं मला कॉल केला आणि म्हणाली, ‘असं असं नाटक आहे, तुला माझी रिपलेसमेंट म्हणून जायचं आहे.’ त्यावेळी मी खरंतर नवीनच होते या क्षेत्रात. म्हणून मी तिला यासाठी नकोच म्हणत होते, त्यावेळी ती मला म्हणाली, की ‘सॅंटा, माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे, तू हे करशील.’ क्रांतीने माझ्यावर दाखवलेल्या विश्वासाच्या जोरावर मी ते नाटक करायला गेले. तिनं म्हटलं तसं ते खूप छान जमलं मला. त्यामध्ये मला अंकुश, केदार आणि बाकी कलाकारांनीही खूप मदत केली; पण क्रांतीने दाखवलेलाविश्वास माझ्यासाठी खरंच खूप खास होता.’’
क्रांती म्हणाली, ‘‘अमृताशी असलेलं माझं नातं खूप वेगळं आहे. आमचं नातं स्पिरीच्युअल आहे. आम्ही ‘आयुष्य जगण्याची पद्धत’ यासारख्या विषयांवर तासन्तास गप्पा मारू शकतो. सामान्यतः दोन मैत्रिणी भेटल्या, की गॉसिप्स होतात, किंवा आपण कोणाबद्दल तरी बोलतो. तसं आमच्यात कधीच नाही होत. आम्ही दोघीही भेटलो की आमच्यात स्पिरीच्युअल विषयावरचं जास्त चर्चा होतात. त्यामुळे तिच्याशी मी खूप जास्त कनेक्ट करते. आम्हाला माहिती आहे, जगातला कितीही मोठा प्रॉब्लेम असोत, आम्ही नेहमीच एकमेकींसाठी आहोत. ती माझी लाइफलॉंग फ्रेंड आहे आणि मी आता तिला केवळ माझी मैत्रीण नाही म्हणू शकत, ती माझी फॅमिलीच आहे.’’
ती पुढे म्हणाली, ‘‘अमृता फक्त मीच नव्हे तर तिच्या जितक्या मैत्रिणी आहेत, त्या सगळ्यांसाठी वेळेला हजर असते. तिच्याइतकी निस्वार्थी मनाने इतरांसाठी उभी राहणारी व्यक्ती मला आतापर्यंत दुसरी सापडली नाहीये. ती फक्त तिच्या जवळच्यांसाठीच असं करेल असं नाही, तर अगदी दूरच्या ओळखीतल्या माणसांसाठीही तेवढंच करते. तिचा हा स्वभाव तिला इतरांपेक्षा वेगळं बनवतो.’’
अमृता पुढे म्हणाली, ‘‘क्रांती खूप सकारात्मक आहे. तिच्याकडे माझ्या, म्हणजे केवळ माझ्याच नाही, तर सर्वांच्या प्रश्नांची उत्तरं असतात. म्हणजे तुम्ही कधीही तिच्याकडे तुमचं दुःख घेऊन गेलात, तर जे एक-दोन तास तुम्ही तिच्यासोबत असणार आहात ना, त्या एक-दोन तासांत तुम्ही नक्कीच तुमचे प्रॉब्लेम विसराल आणि खळखळून हसून याल. तिच्यातली सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे, तिचा संयम. ती प्रचंड संयमी आहे. ती तिच्या प्रत्येक गोष्टींमध्ये म्हणजे स्वतःबाबत, तिचे फ्रेंड्स, तिची मुलं, तिचा नवरा अशा प्रत्येकाबाबत खूप सीरियस असते. सगळ्या गोष्टी ती ज्या प्रकारे हँडल करते, ते बघून मी कायम आश्चर्यचकित होते.’’
क्रांती एक किस्सा सांगत होती, ‘‘एके दिवशी माझ्या दोन्ही मुली आजारी होत्या. त्यांची अवस्था एवढी खराब होती, की त्या बेडवरच उलट्या करत होत्या. त्यांच्यात बाथरूमपर्यंत जाण्याचीही क्षमता नव्हती. त्यावेळी माझा नवराही त्याच्या कामासाठी चेन्नईला होता आणि अमृता माझ्यासोबत राहायला आली होती. मला आठवतंय मी एक बाळ सांभाळत होते आणि अमृता एक बाळ सांभाळत होती. त्यावेळी माझ्या बाळानं तिच्या कपड्यांवर, केसांमध्ये सगळीकडे उलट्या केल्या होत्या; पण त्या मुलीने काहीही न म्हणता एका आईप्रमाणेच माझ्या बाळाला सांभाळलं. ती रात्र मी कधीच नाही विसरू शकत. फक्त तेव्हाच नव्हे, तर इतरवेळीही अमृता माझ्या बाळांची तेवढीच काळजी घेते. चांगले संस्कार करते. त्यांना चांगलं- वाईट काय आहे हे शिकवते. मी माझी दोन्ही बाळं तिच्याकडे निश्चिंत होऊन ठेवू शकते, कारण मला माहितीये ती एका आईप्रमाणेच काळजी घेईल.’’
(शब्दांकन : मयूरी गावडे)
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.