बाईक राईडचे आकर्षण सर्वांनाच असते. दिवेघाट, खंडाळा, ताम्हिणी घाटातून जाणारे बाईक रायडर्स पाहतो, तेव्हा त्यांच्या वेगाचे, नियंत्रणाचे अप्रूप वाटणे स्वाभाविक आहे. अशाच बाईक राईडचे आयोजन रॉयल एन्फिल्डच्या वतीने नुकतेच करण्यात आले होते.
पुणे ते ॲम्बी व्हॅली दरम्यानची सुमारे ६५ ते ७० किलोमीटरची राईड ‘वन मिशन, वन वर्ल्ड, वन बाईक’ वर आधारित होती. सह्याद्रीतून मार्ग काढताना निसर्गरम्य पवना नदीच्या काठ आणि तिकोना, तुंगच्या (कठीणगड) पायथ्यातून जाताना येणारा अनुभव रोमांचक होता. बाईकच्या क्षमतेची कसोटी पाहणारी राईड ही चालकासाठी अनुभवाची शिदोरी होती.
बाईक राईड कशासाठी?
महानगरातील रस्त्यावरून दुचाकी गाडी चालवताना त्याच्या दणकटपणाचे आणि क्षमतेचे आकलन होतेच असे नाही. उलट पावसाळ्यात, निसरड्या रस्त्यावर, खाचखळग्यातून अरुंद रस्त्यावरून गाडीचा दमदारपणा कळण्यास हातभार लागतो. घाटातून, खडीचा आणि लाल मातीच्या रस्त्यावरून जाताना दुचाकीच्या टायरचा कस लागतो.
अशा वेळी सुरक्षितपणे वाट काढण्यास गाडी संतुलित राहणे खूप गरजेचे आहे. ब्रेक आणि गिअर यांच्यात समन्वय साधताना अचानक येणारे खड्डे, पाऊस याचा सामना लीलया रितीने करावा लागतो. बाईक राईडमुळे दुचाकीची उपयुक्तता आणि प्रासंगिकता लक्षात येते.
वाहतूक नियमांचे प्रशिक्षण
बाईक रायडर्स हे नेहमीच वाहतुकीचे नियम पाळण्याबाबत सजग असतात. रविवारसारख्या व्यग्र दिवसात आणि तेही ॲम्बी व्हॅलीसारख्या गर्दीच्या ठिकाणी वाहतुकीचे नियम महत्त्वाचे ठरतात. सूस रोड ते ॲम्बी व्हॅलीदरम्यान अनेक गावे लागतात. एकेरी रस्ता असल्याने काळजीपूर्वक डाव्या बाजूने चालविणे चालकाची जबाबदारी असते.
हेल्मेटबरोबरच जॅकेट, गॉगल्स यासारख्या गोष्टी देखील बाळगणे महत्त्वाचे ठरते. गावातून जाणाऱ्या रस्त्यावर जनावरांचा वावर सतत असतो. अशा वेळी बाईक रायडर्स अतिशय सुरक्षितपणे वाहन चालवून वाहतुकीला अडथळा येणार नाही, अशा रीतीने जबाबदारी पार पाडतो. या नियमांची रायडर्स आठवण करून देतात आणि शिस्तबद्ध रीतीने राईडचे नियोजन केले जाते.
राईडला जाण्यापूर्वी
मुंबई-पुणे जुना महामार्ग असो किंवा खंबाटकी घाट असो, सुसाट वेगाने जाणारे बाईकस्वार पाहून आपणही राईड करावी, अशी इच्छा होणे स्वाभाविक आहे. अशावेळी आपण राईडसाठी सक्षम आहोत का आणि त्या तोडीची आपली बाईक आहे का हे देखील तपासले पाहिजे. आजकाल बहुतांश महानगरातून बाईक राईडचे आयोजन केले जाते.
तेव्हा त्यात सहभागी होताना सुरक्षेची पुरेशी साधने, शारीरिक क्षमता, गाडीची क्षमता याची चाचपणी घेऊनच त्यात सहभाग नोंदविणे महत्त्वाचे आहे. साधारणपणे ३५० सीसीपुढील गाड्यांसाठीच बाईक राईडचे आयोजन केले जाते. अशावेळी कमी क्षमतेच्या गाडीचा वापर करून अडचणीत येणे टाळावे. अर्थात संयोजक या सर्व गोष्टींची चाचपणी करूनच बाईकस्वारांना राईडमध्ये सहभागी करून घेतात.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.