आषाढी एकादशी हिंदू धर्मांमध्ये सर्वात पवित्र आणि महत्वाची मानली जाते. वारकरी, विठ्ठलभक्त ज्या सोहळ्याची, ज्या तिथीची अगदी डोळ्यात प्राण आणून वाट पाहत असतात, तो दिवस म्हणजे आषाढी एकादशी. महाराष्ट्रातल्या परंपरेनुसार, आषाढी एकादशीच्या दिवशी पहाटे राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय महापूजा पार पडते.
पण तुम्हाला माहितीय का या सुरु असलेल्या परंपरेदरम्यान, एक रंजक किस्सा घडला होता. महाराष्ट्राच्या एका दिग्गज नेत्याच्या बायकोने नवरा मुख्यमंत्री व्हावा म्हणून विठ्ठलाला साकडं घातलं अन् त्यांची इच्छा लाडक्या विठुरायाने पुर्णदेखील केली.
वसंतदादा पाटील हे महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय नेते होते. वसंतदादांना पुन्हा मुख्यमंत्रीपद मिळण्यासाठी त्यांच्या पत्नी म्हणजेच शालिनी पाटील यांनी विठुरायाला नवस केला होता.
‘आमच्या भोळ्या दादांना पक्षातील लोकांनीच दगाफटका केला, पण दादा पुन्हा मुख्यमंत्री होऊ देत, मी तुला पाच तोळ्यांचे मंगळसूत्र वाहीन!’ असा नवस त्यांनी यावेळी केला.
आश्चर्याची बाब म्हणजे, पूजा केल्यानंतर काही काळाने दादा पुन्हा मुख्यमंत्री झाले आणि त्यांनी त्यांचा नवस पुर्ण केला.
वसंतदादांनी 1977 ते 1985 या काळात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून काम पाहिलं. 1977 ला ते मुख्यमंत्री झाल्यानंतर एका वर्षानी त्यांचे सरकार पडून शरद पवार यांच्या नेतृत्वात पुलोदचे सरकार आलं होते. त्यानंतर 1983 ला वसंतदादा पुन्हा राज्याचे मुख्यमंत्री झाले.
शालिनीताईंचा नवस अन् दादा दुसऱ्यांदा मुख्यमंत्री; नेमका किस्सा काय?
1980 च्या दरम्यान, वसंतदादा पाटील हे महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय नेते होते, मुख्यमंत्रीपद त्यांचा हक्क होता. पण केंद्रातल्या श्रेष्ठींनी महाराष्ट्रावर आपला वचक राहावा म्हणून बॅरिस्टर अंतुलेंना मुख्यमंत्री केलं. अंतुले हे संजय गांधींच्या अगदी जवळचे नेते होते.
अंतुलेंच्या मंत्रिमंडळात वसंतदादा सहभागी झाले नाहीत पण शालिनीताई पाटील यांना महसूल मंत्रिपद देण्यात आलं. त्यावेळी शालिनीताईंचे स्थान अंतुलेंच्या मंत्रिमंडळात उपमुख्यमंत्रीपदाप्रमाणे होतं. अंतुलेंच्या अनुपस्थितीत मंत्रिमंडळाचा सर्व कारभार शालिनीताईं पाहत असत.
पण अंतुले आणि वसंतदादा पाटील यांच्यातील स्पर्धा शिगेला पोहचली होती. अंतुले पश्चिम महाराष्ट्रातील सहकारी चळवळ व साखर कारखाने यांचे खच्चीकरण करून वसंतदादांना खाली खेचण्यासाठी प्रयत्न करु लागले होते. तर वसंतदादा पाटलांनी हा अंतुले किती दिवस मुख्यमंत्रीपद राहतो तेच बघतो असं जाहीर वक्तव्य केलं होतं.
पण अंतुलेंचा धाक आणि त्यांचे कामकाज पाहता कोणिही दादांना पाठिंबा द्यायला तयार नव्हतं. शालिनीताई मंत्रिमंडळात असताना आम्हाला तुम्ही हे काम सांगणे न पटणारे आहे. असं वक्तव्य तेव्हा कार्यकर्त्यांनी केलं.
त्यानंतर शालिनीताईंनी ही गोष्ट मनावर घेतली. त्यावेळी त्यांनी एका प्रसिद्ध वृत्तपत्राला अंतुलेंविरोधा मुलाखत दिली. या मुलाखतीनंतर अंतुलेंनी शालिनीताईंवर थेट कारवाई केली अन् त्यांना मंत्रिमंडळातून काढून टाकले. त्यासाठी त्यांनी श्रेष्ठींची परवानगीसुद्धा घेतली नव्हती.
मुख्यमंत्र्यानी केलेली शालिनीताई पाटलांवर केलेली कारवाई अनेक नेत्यांच्या पचनी पडली नव्हती. अंतुले हटाव मोहीम तीव्र झाली. अशातच त्यांचे इंदिरा गांधी प्रतिभा प्रतिष्ठान या ट्रस्टखाली सुरु असलेले गैरव्यवहार बाहेर काढण्यात आले. संपूर्ण देशात हा सिमेंट खरेदीचा घोटाळा प्रचंड गाजला. वसंतदादा आणि शालिनीताई पाटलांनी केलेल्या मोहिमेला यश आले. इंदिरा गांधींनी बॅरिस्टर अंतुलेंनी मुख्यमंत्रीपदावरून पाय उतार केले.
पण त्यानंतरही वसंतदादा पाटलांना मुख्यमंत्री केलं गेलं नाही. तर अंतुलेंचे समर्थक असलेल्या बाबासाहेब भोसले यांना मुख्यमंत्रीपद देण्यात आलं. त्यावेळी शालिनीताई पाटलांनी पंढरपुरात येऊन विठ्ठल रखुमाईला नवस केला होता.
‘आमच्या भोळ्या दादांना पक्षातील लोकांनीच दगाफटका केला, पण दादा पुन्हा मुख्यमंत्री होऊ देत, मी तुला पाच तोळ्यांचे मंगळसूत्र वाहीन!’दादा खरंच परत मुख्यमंत्री झाले आणि शालिनीताईंनी तो नवस फेडला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.