- पृथा वीर
मनापासून आनंद झाला, की सगळं जग सुंदर वाटतं. अगदी तुमचा साधा ड्रेससुद्धा छान वाटतो. तरीही थोडी तयारी केली, तर तो-तो प्रसंग स्मरणीय ठरतो. दाक्षिणात्य हाफ साडीसुद्धा असाच साधा; पण सुंदर पर्याय ठरतोय. आता तर जुन्या ठेवणीतल्या साडीपासून या साड्या शिवण्याचा ट्रेंड सुरू आहे. या साड्या खरोखरच सुंदर आणि प्रेझेंटेबल वाटतात.
हाफ साडीला तेलगूमध्ये याला ‘लंगा वोनी’, तमिळमध्ये ‘पावसाई धवनी’ म्हणतात आणि कर्नाटकमध्ये ‘लंगा दावणी’ म्हणून ओळखले जाते. ही लेहंग्यासारखी साडी नेसता येते. सोबत सुंदर ब्लाऊज आणि दुपट्टा असतो. ही पायघोळ साडी खरोखरच उठून दिसते. सध्या कांजीवरम सिल्क हाफ साडीचा ट्रेंड सुरू असून एकापेक्षा एक रंगसंगतीमुळे ही साडी कमालीची लोकप्रिय झाली आहे. कांजीवरम साडीचा स्वतःचा इतिहास आहे.