जगद्गुरू संत तुकाराम महाराज म्हणतात, ‘मन करा रे प्रसन्न...’ सर्व सिद्धींचे कारण. मन समाधानी, प्रसन्न असेल तर चेहराही सदैव प्रसन्न राहतो. प्रसन्न राहिल्याने सकारात्मक ऊर्जा प्राप्त होते. म्हणूनच कठीण समयीदेखील मनाला प्रसन्न कसे ठेवता येईल, याचा विचार केला तर त्यातून मार्ग कसा काढायचा हेदेखील सूचते. प्रसन्न चेहऱ्याच्या व्यक्ती सकारात्मक ऊर्जा निर्माण करतात आणि आपल्या आजूबाजूच्या लोकांमध्येही प्रसन्नता ‘ट्रान्समिट’ करतात. त्यामुळेच चांगल्याची सोबत करण्याचा सल्ला दिला जातो, असे या विषयातील तज्ज्ञांनी सांगितले.
चेहरे अनेक प्रकारचे असतात. मात्र, त्यावरचे भाव मात्र एकतर प्रसन्न किंवा गंभीर असेच बघायला मिळतात. चिंतेचे भाव चेहऱ्यावर लगेच उमटतात. प्रत्येक व्यक्ती चिंतेत असतो. मात्र, काहींकडे त्यांच्या प्रश्नांची उत्तरे असतात, तर काहींकडे नसतात.
मानसोपचारतज्ज्ञ डॉ. संदीप सिसोदिया म्हणाले, की प्रसन्न चेहरा भलेही तो जाणीवपूर्वक ठेवला असला, तरीही ते शरीरात सकारात्मक रसायन तयार करतात. त्यातून चयापचय चांगले राहते. शारीरिक व मानसिक आजारांशी लढण्याची क्षमता वाढते. आनंदी, उत्साही ठेवण्याचे काम मेंदूत तयार होणारे ‘एन्डॉर्फिन’ नावाचे रसायन करत असते.
हसरा चेहरा असणाऱ्या व्यक्तींमध्ये ते अधिक असते, म्हणून ते प्रसन्न दिसतात. एन्डॉर्फिन आपणाला आनंदी, उत्साही ठेवते हे ज्यांच्यात जास्त तयार होते, ती माणसे सतत प्रसन्न चेहऱ्याची दिसतात. ते स्वत:ही प्रसन्न राहतात आणि इतरांचाही उत्साह वाढवितात. प्रसन्न असण्याचा आणि गंभीर चेहऱ्याने राहण्याचा शारीरिक व मानसिक स्थितीवर परिणाम होत असतो. यामुळे प्रसन्न राहिले पाहिजे आणि आपल्या सहवासात येणाऱ्या इतरांनाही प्रसन्न करणे आजच्या ताणतणावाच्या काळात फार महत्त्वाचे आहे.
भावनिक बुद्धिमत्तातज्ज्ञ किशन वतनी म्हणतात, की चेहऱ्यावर दिसणारे भाव म्हणजे मनातील भावनांचा खेळ असतो. मानवी मेंदूत मिरर (आरसा) न्यूरॉन व रडार (आदान-प्रदान) न्यूरॉन असतात. यामुळे मेंदूतील भावभावनांची देवाणघेवाण होत असते.
हसरा चेहरा असणारे प्रसन्न व्यक्तिमत्त्व असेल तर त्याच्या भावभावना समोरच्यामध्ये ट्रान्समिट होतात. त्यामुळे आजूबाजूच्यांनादेखील प्रसन्न वाटते, हे सिद्ध झालेले आहे. म्हणूनच चांगल्यांची संगत करा, चांगल्यासोबत राहा, असा सल्ला वडीलधारी मंडळी देतात.
गंभीर चेहरा ठेवल्यास...
दुसऱ्याचे ऐकून न घेण्याची वृत्ती वाढत जाते.
सतत तणावाखाली वावरतात.
स्वत:चे मत मांडण्याचा अट्टाहास असतो.
पटकन चिडतात, समोरच्याची बाजू समजून घेत नाहीत.
यांच्या झोपेवर, पचनक्रियेवर विपरीत परिणाम होतो.
दिवसभरात जे काही करतील, त्यात एकाग्र होऊ शकत नाहीत.
आयुष्य जगण्याचा आनंद घेऊ शकत नाहीत.
अशांना इतरांनी मोटिवेट केले तर ते खुलतात.
‘स्माइल’चे हे आहेत फायदे
शारीरिक, मानसिक आजारांशी सामना करण्याची प्रतिकारक्षमता अधिक.
सकाळी जेवढा उत्साह, तेवढाच उत्साह संध्याकाळीही. दिवसभर फ्रेशनेस.
हसऱ्या चेहऱ्याची माणसे त्यांच्या सहवासात येणाऱ्यांनाही ठेवतात हसरे.
ताण-तणावात असले, तरी त्यांना लवकर पर्याय सूचतात.
संघर्ष करायला शिकतात, त्यांची संयमीवृत्तीही वाढते.
लहानशा तणावाला ते जुमानत नाहीत, दिवसभरात तणाव येत नाहीत.
‘सेल्फ मोटिवेटेड’ असतात, छोट्या-छोट्या गोष्टींचा आनंद घेतात.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.