साहित्य तुमच्या दारी

पुस्तकांशी प्रत्येकाचं काही वेगळंच नातं असतं. त्यात प्रत्येक पुस्तकाशी काही आठवणी जोडलेल्या असतात.
Bookstore On Wheels
Bookstore On Wheelssakal

- ऋतिका वाळिंबे, सहसंस्थापक, ‘पुस्तकवाले’

पुस्तकांशी प्रत्येकाचं काही वेगळंच नातं असतं. त्यात प्रत्येक पुस्तकाशी काही आठवणी जोडलेल्या असतात. त्यातून काहींना प्रोत्साहन मिळतं, तर काहींना भावनिक आणि मानसिक स्थैर्य. वाचक आणि प्रकाशक यामधलाच दुवा बनण्याचे काम करतोय आम्ही आणि आमची ‘पुस्तकवाले’ ही स्टार्टअप.

कोरोना काळात सर्वच कामं ठप्प झाली होती. त्यादरम्यान माझ्या पतीच्या एका मित्राच्या मुलाचा वाढदिवस होता आणि आम्हाला त्याला एक पुस्तक भेट म्हणून द्यायचं होतं आणि लॉकडाऊनमुळे सगळंच बंद होतं. तेव्हा पतीच्या ओळखीच्या एका पुस्तक विक्रेत्याकडे गेलो आणि पुस्तकं खरदी केली.

ते पुस्तक भेट म्हणून दिलं असता त्याच्या आईनं विचारलं, ‘आत्ता कुठून बरं मिळालं हे पुस्तक तुम्हाला?’ त्यादरम्यान झालेल्या बोलण्यातून एक कल्पना सुचली, की आपण अशी पुस्तकं घरपोच उपलब्ध करून देऊ शकलो तर सगळ्यांसाठी सोयीचं होईल. यावर मी आणि पती आशयनं विचार केला आणि या कल्पनेचं रूपांतर व्यवसायात करायचं निर्णय घेतला आणि सुरू केलं ‘पुस्तकवाले’.

आव्हान आणि प्रोत्साहन

सुरुवातीला नवीन उपक्रम असल्यानं सगळीकडून खूप छान प्रतिसाद येऊ लागला. अनेक हौसिंग सोसायट्यांतील रहिवाशांनी आम्हाला बोलवायला सुरुवात केली आणि त्यानंतर आम्ही अनेक पुस्तकं वाचकांसाठी उपलब्ध करून देत होतो. मात्र, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये आव्हानाचा प्रसंग उद्‍भवला. आम्ही अनेक नवीन पुस्तकं विक्रीसाठी आणली आणि दरम्यान अचानक खरेदी बंद झाली.

त्यामध्ये एके दिवशी एका वाचकाचा फोन आला आणि त्यांनी सांगितलं, की त्यांची आई रुग्णालयात आहे आणि तिला कोरोना झाला आहे. तुम्ही मला काही प्रेरक पुस्तकं सांगू शकाल का? आम्ही अशा पुस्तकांची यादी तयार करून त्यांना पाठवली आणि एका ऑनलाईन डिलिव्हरी ॲपद्वारे त्यांच्यापर्यंत पोचवली.

काही दिवसांनंतर त्यांचा फोन आला आणि त्यांनी आमचे आभार मानले, की, तुम्ही त्या दिवशी पुस्तकं उपलब्ध करून दिली, त्यामुळे माझी आई बरी झाली. त्यातून काम करण्याचं प्रोत्साहन मिळालं आणि इथून सुरू झाला नवीन उमेदीचा प्रवास. त्याच दिवशी आम्ही सर्व वाचकांचे नंबर मिळवून त्यांना संपर्क साधण्यास सुरू केले आणि घरापर्यंत पुस्तक पोहचवण्यास सुरुवात केली.

एका संकल्पाच्या निमित्तानं सुरू झालेल्या ‘पुस्तकवाले’ उपक्रमाला पुण्यात तीन वर्षं झाली. १ ऑगस्ट २०२० ला पहिला प्रयोग आम्ही बाणेर येथील सोसायटीमध्ये केला आणि पुणेकरांनी भरभरून प्रतिसाद दिला. त्यानंतर सलग अडीच वर्षं आम्ही सहाशे सोसायट्यांमध्ये पुस्तकं घेऊन गेलो. वीस हजारपेक्षा जास्त कुटुंबांमधे जवळपास पन्नास हजार पुस्तकं पोहचवण्याचा समाधान मिळालं. आमच्या उपक्रमाचं रूपांतर एका स्टार्टअपमध्ये होऊ लागलं.

सुधा मूर्ती, गुलजार यांच्यासारख्या दिग्गजांकडून कौतुक झालं. ISUZU Truck company नं राष्ट्रीय पातळीवर आयोजित केलेल्या एका स्पर्धेत आम्हाला innovative आणि सामाजिक महत्व असलेल्या कामासाठी पहिलं बक्षीस मिळालं. सीओईपीच्या २०२१च्या स्टार्टअप फेस्टमध्ये सोशल स्टार्टअप या विभागात आम्ही पहिलं बक्षीस मिळवलं. जास्तीत जास्त लोकांपर्यंत पुस्तकं पोहचवण्यासाठी आमची पन्नास तरुणांची टीमही आहे.

काय आहे पुस्तकवाले उपक्रम

  • बुक स्टोअर ऑन व्हील संकल्पना

  • परवानगी घेऊन हाउसिंग सोसायटीमध्ये पुस्तकांचे प्रदर्शन

  • वर्षांतून किती वेळा प्रदर्शन भरवायचं याचा करार केला जातो

  • नवीन व पायरसी नसलेली पुस्तकं प्रदर्शनात ठेवली जातात

  • वाचकांपर्यंत पोचण्यासाठी व्हॉट्सॲप ग्रुप

  • पुढील वेळी कधी व कुठं भेटायचं याचं नियोजन केलं जातं

बिझनेस मंत्रा

मला माझ्या पतीनं नेहमीच साथ दिली. सासू-सासरेही नेहमीच मदतीला होते. आम्ही हा उपक्रम सुरू केला, तेव्हा माझी मुलगी चार वर्षांची होती. मात्र, कुटुंबाच्या मदतीमुळेच आम्ही काम करू शकलो. मी नेहमी म्हणते, की कोणतंही काम हे सातत्यानं केलं पाहिजे. म्हणजेच ‘डू इट’ किंवा ‘कीप डुइंग इट’ हा माझा व्यवसायाचा मंत्र आहे. एखादी गोष्ट एकदाच न करता त्यावर नियमित काम करत राहा. सातत्य हे यश मिळवून देतंच.

(शब्दांकन : प्रियांका सत्यवान)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com