डॉ. कांचनगंगा गंधे, पुणे । अशोककुमार सिंग, लखनौ
ग णपतीची प्राणप्रतिष्ठा, देव-देवतांची पूजा सुरू करण्याअगोदर चंदनाचं खोड सहाणेवर उगाळून त्याचा टिळा प्रथम कपाळावर दोन भुवयांच्या मध्ये लावल्याने त्याच्या सुगंधाने वातावरण शुद्ध, उत्साही, चैतन्यपूर्ण होतं, मन शांत आणि एकाग्र झाल्यामुळे पूजा मनोभावे होते.
चंदनस्य महत पुण्यं पवित्रं पाप नाशनम्।
आपदं हरति नित्यं लक्ष्मी तिष्ठती सर्वदा।।
चंदन म्हणजे शुद्ध अध्यात्म आणि शीतलता यांचं प्रतीक! सणवारात चंदनाचं विविध प्रकारांनी महत्त्व आहे. स्वतः झिजून दुसऱ्याला सुगंध आणि शीतलता देणाऱ्या चंदनाच्या झाडाला मात्र मातीतलं पाणी आणि क्षार शोषून घ्यायला दुसऱ्या झाडावर अवलंबून राहावं लागतं! नत्रवायू शोषून घेणाऱ्या ‘शेंग’वर्गीय काही वृक्षांच्या मुळांवर चंदन वृक्षांच्या मुळांना अवलंबून राहावं लागतं; परंतु हा वृक्ष स्वतःचे अन्न स्वतः पानांमार्फत तयार करून वाढतो.