गौरी लहुरीकर
Child Care Tips: शिस्त हा प्रकार जीवनातल्या अनेक प्रकारच्या तालमीमधील एक प्रकार आहे. अनुभव घेत घेत त्याचा सराव होणे महत्त्वाचे ठरते आणि तिथून पुढे प्रत्येक जण स्वतःला ताब्यात ठेऊ शकतो. कोणतेही काम अथवा उद्दिष्ट पूर्ण होण्यासाठी शिस्त उपयोगी ठरते. शिस्त आपल्याला समाजातील आणि कुटुंबातील नियमांचे पालन कसे करावे यासाठी उपयुक्त ठरते. जी स्वयंप्रेरणेने येते ती शिस्त जास्त उपयोगी पडते; कारण त्या शिस्तीत आपला भाव, आपल्या भावना, चूक किंवा बरोबर असल्याची जाणीव आदी सर्व समाविष्ट असते. शिस्त एक प्रकारचे कौशल्य आहे. हे कौशल्य आपण दिवसेंदिवस पाळलेल्या शिस्तीमुळे अधिकाधिक विकसित होत जाते.
आजकालची मुले ऐकतच नाहीत, हे वाक्य घरोघरी ऐकले जाते. मात्र, ज्या घरातील मुले ऐकतात त्या घरातील वातावरण कसे आहे, पालक नेमका कसा संवाद साधतात हे जाणून घेतले तर प्रत्येक घरातील वातावरण आनंदी होण्यात यशस्वी ठरेल. एक पालक म्हणून आपण विचार केला तर असे जाणवते की, मुलांना दिवसभरात किती नकारात्मक प्रतिसाद दिला जातो. ‘तू पांघरुणाची घडी घातली नाही’, ‘छोट्या बहिणीशी भांडलास’, ‘तू माझे ऐकले नाहीस’, ‘मी सांगितले होते जास्त खाऊ नकोस म्हणून’, ‘बघ! फोडलास ना काचेचा ग्लास’ असे अनेक संवाद घराघरांत ऐकू येतात. नकारात्मक वाक्यांनी वागणुकीत सकारात्मक बदल होणार नाहीत.
काही दिवस त्यांनी विसरलेल्या गोष्टींकडे दुर्लक्ष करून त्यांनी केलेल्या फक्त चांगल्या गोष्टींचा उल्लेख आपल्या संवादात केला तर. जिथे जिथे ते चांगले वागले, चांगले काम केले तिथे तिथे मुलांचे लगेच कौतुक करा. ‘अरे वा! ताटातले संपवलेस’, ‘थॅंक्यू तू मला सामान उचलायला मदत केलीस’, ‘अग तू खूप छान बोललीस आज’, ‘अरे वा आज तुझा मूड आनंदी दिसतोय’, ‘आज अभ्यास लवकर संपवलास’ प्रत्येक वेळी वेगवेगळ्या गुणांचे कौतुक करण्याचा प्रयत्न करा. त्यावेळी मुलांना त्यांच्याविषयी नेमके काय आवडले हे लक्षात येईल. प्रेमाने लावलेली शिस्त दीर्घकाळ टिकून राहते.
त्या शिस्तीचे रूपांतर भीतीत होत नाही. शिस्त आनंददायी अनुभव असावा. शिस्तीचे पालन न केल्यास शिक्षा नव्हे तर योग्य गोष्टीचे शिक्षण द्यायला हवे. काही घरात खूप कडक शिस्त लावली जाते तर काही कुटुंबात अजिबातच नाही. शिस्त ही खूप तोलूनमापून अवलंब करण्याची गोष्ट आहे. प्रत्येक घरातील काही नियम असतात, त्या नियमांचे हसतखेळत, ताणविरहित पालन करणे म्हणजेच घराची शिस्त सांभाळणे होय. हीच शिस्त पुढे समाजात, जीवनात एक जबाबदार नागरिक म्हणून जगण्यासाठी आवश्यक ठरते.
(लेखिका या उपचारात्मक शिक्षण प्रशिक्षक आणि समुपदेशक आहेत)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.