- रेश्मा हाजिते, उद्योजिका
बांधकाम क्षेत्र हे टप्प्याटप्प्यानं विकसित होत असून त्यात सातत्याने बदल होत आहेत. या बदलांत टिकून राहत मोठं होणं कठीण काम. मात्र, तरी माझं अस्तित्व निर्माण करता आले. मी पहिली ऑनलाइन प्लॉट बुकिंग सुविधाही सुरू केली. आज मी गेल्या चौदा वर्षांपासून एका पुरुषाची मक्तेदारी असणाऱ्या क्षेत्रामध्ये यशस्वीरीत्या काम करत आहे.
माझं इंजिनिअरींगचं शिक्षण पूर्ण झालं आणि लगेचच मला ‘टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस’मधून (TCS) ऑफर आली आणि मी नोकरी करू लागले. समाजसेवा करण्याची सुरुवातीपासूनच आवड होती. त्यामुळे ‘ध्यास’ या संस्थेची स्थापना केली. काम करत असताना समजलं, की एखादी संस्था चालवायची तर आर्थिक पाठबळ गरजेचं असतं. त्यासाठी निधी महत्वाचा ठरतो. त्यातून उद्योग सुरू करायचं ठरवलं आणि जवळच्या चार मित्रांसोबत २००९ मध्ये ‘एक्सलन्स शेल्टर्स प्रायव्हेट लिमिटेड’ या रिअल इस्टेट कंपनीची सुरुवात केली.
माझ्या कुटुंबामधले सर्वच सदस्य शिक्षण क्षेत्रात आहेत. मी मात्र उद्योग क्षेत्राची निवड केली. या सर्व प्रवासात मला वडिलांचा नेहमीच पाठिंबा राहिला. त्यांनी मला वेगवेगळ्या क्षेत्रांत काम करण्याची प्रेरणा आणि मुभा दिली. मला ज्या क्षेत्रात काम करायची इच्छा आहे, ते करण्यासाठी मदत केली. नवनवीन गोष्टींचा अनुभव घेण्यासाठी नेहमीच प्रोत्साहन दिलं. मी उद्योगाची सुरुवात करण्याआधी एका कंपनीत काम करत होते.
त्या दरम्यान व्यवसाय आणि नोकरी दोन्ही सांभाळत होते. मात्र, जेव्हा मी नोकरी कायमची सोडून उद्योग करण्याचा निर्णय घेतला, तेव्हा वडील माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. ‘तुला आवडेल त्या क्षेत्रात तू काम कर’, असे ते त्यावेळी मला म्हणाले होते. त्यामुळे मला नेहमीच घरातून काहीही करण्यासाठी आडकाठी नसायची. त्यामुळे मी लग्नाआधीच उद्योग क्षेत्रात येऊ शकले. लग्नानंतरही मला पती, सासू आणि सासऱ्यांची साथ मिळाली.
असा झाला व्यवसायाचा विस्तार
सुरुवातीला मी पुणे, मुंबई, सोलापूरमध्ये काम केलं. आत्तापर्यंत मी तीनशे एकरपेक्षा जास्त जमीन विकसित केली असून, भारतामध्ये अनेक प्रकल्प केले आहेत. सात देशांमध्ये व्यवसायाचा विस्तार झाला आहे. आमचा अमेरिका आणि सिंगापूरमध्ये कनेक्ट आहे, तर भारतात मोठी गुंतवणूक आहे. सात देशांत कार्यरत असल्यानं आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदारदेखील आमच्यासोबत आहेत.
महिलांमध्ये विश्वास महत्त्वाचा
महिलांमध्ये कोणते ना कोणते गुण किंवा कौशल्यं असतात. ते कौशल्य शोधून त्यावर काम केलं पाहिजे. महिला उद्योजिका म्हणून काम करण्याची महत्त्वाकांक्षा ठेवणाऱ्या महिलांसाठी ही सुवर्णसंधी आहे. सरकारद्वारे महिलांसाठी विविध योजना तयार करण्यात आल्या आहेत. त्यांचा वापर केला पाहिजे. आपण काहीतरी नवीन करू शकतो हा विश्वास महत्त्वाचा आहे. काही करायचं असेल, तर त्यासाठी वेळ द्यावा लागतो. त्यामुळे थकून न जाता काम करत राहावं. सुरुवातीला त्रास होतो. मात्र, कामातील सातत्यामुळे त्याचा भविष्यात नक्कीच फायदा होतो.
(शब्दांकन : सुचिता गायकवाड)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.