जाऊ या ‘सीमे’पल्याड...

नुकताच आपण दसरा साजरा केला.... दसरा म्हणजे सीमोल्लंघन. पूर्वीच्या काळी दसऱ्याच्या मुहूर्तावर योद्धे मोहिमेसाठी निघत असत. आपल्या प्रांताच्या सीमा पार करून नवीन प्रदेश काबीज करणं म्हणजे सीमोल्लंघन.
woman
Womansakal
Updated on

- डॉ. समीरा गुजर-जोशी

नुकताच आपण दसरा साजरा केला.... दसरा म्हणजे सीमोल्लंघन. पूर्वीच्या काळी दसऱ्याच्या मुहूर्तावर योद्धे मोहिमेसाठी निघत असत. आपल्या प्रांताच्या सीमा पार करून नवीन प्रदेश काबीज करणं म्हणजे सीमोल्लंघन. मग मैत्रिणी सहज विचार आला, ‘आजच्या काळात तुला मला सीमोल्लंघन करता येईल का? आपण काही कुठल्या राज्याचे राजे नाही.... किंवा राण्याही नाही.... पण युद्ध मात्र आपल्यालाही चुकलेलं नाही...!! आपल्या मोहिमांचं स्वरूप वेगळं आहे एवढंच.’

मुळात सीमा म्हणजे तरी काय? सीमा म्हणजे मर्यादा किंवा बंधन, ज्याच्या पलीकडे जाणं अवघड असतं किंवा ठरावीक परिस्थितीत शक्य नसतं. सीमा म्हणजे त्या ठरावीक गोष्टींची चौकट, ज्यामुळे एखाद्याचं स्वातंत्र्य मर्यादित होतं. तुला - मला अडकवणाऱ्या आपल्या विकासाला मर्यादा घालणाऱ्या अशा कितीतरी सीमा आहेत... त्या पार करून आपण जाऊ शकलो, तर आपल्यालाही सोनं लुटता येईल.

यातील सगळ्यात जास्त सीमा आपल्या मनात दडलेल्या आहेत. त्यांचं स्वरूप बहुतांशी भावनिक किंवा मानसिक आहे. अनेकदा ते सामाजिकही आहे. कोणत्या वयातल्या स्त्रीनं कसं वागावं याविषयी अनेक मर्यादा घालून दिलेल्या आहेत. त्या सगळ्यांचं भान ठेवूनच आपण वावरत असतो. मात्र, कधी कधी त्याचा अतिरेक होऊन आपण खळखळून हसायलाच विसरत असू, आपले छंद जोपासणं हरवत असेल, तर निश्चित विचार करण्याची गरज आहे.

या सीमा सामाजिक आहेत असं जरी म्हटलं, तरी काही वेळा त्या आपणच आपल्याला घालून घेतलेल्या असतात. नवऱ्याला काय वाटेल, सासू-सासरे काय म्हणतील, मुलांना पटेल का... हे असे प्रश्न आपल्या मनात खूप असतात आणि त्यांना सामोरं जाण्याऐवजी आपण टाळू बघतो. अनेकदा आपल्या मनाच्या इच्छा आपण कुटुंबीयांसमोर मांडतच नाही.

अनेकदा संवाद साधल्यावर या सीमांमध्ये आपण उगीच अडकलो होतो असंही लक्षात येतं. ‘अगं, तुला हे आवडतं तर आधी का नाही सांगितलंस?’ किंवा ‘मुलं मोठी झाल्यावर, नोकरीतून रिटायर झाल्यानंतर आता तुझ्या आवडीचं करायला काय हरकत आहे?’ असं सकारात्मक उत्तर येऊ शकतं हे ध्यानात धरायला हवं.

म्हणूनच आपल्या आवडीनिवडीविषयी आपल्या जवळच्या व्यक्तींशी बोलणं, आपलं मन मोकळं करणं हेही सीमोल्लंघन आहे. आपण बायका खूपदा भूतकाळात जास्त रमतो. कोण आपल्याशी कसं वागलं, काय बोललं हे चटकन मनातून जात नाही. त्याचं एक प्रकारचं बॅगेज तयार होतं.

सीमा ओलांडायच्या असतील, तर आपले खांदे अशा ओझ्यापासून मोकळे हवेत... तरच वेगाने मार्गक्रमण करता येईल. उत्तम भविष्याकडे नेण्यासाठी उपयोगी नसणाऱ्या भूतकाळातल्या गोष्टी भूतकाळातच सोडायला हव्यात. एखादा कटू अनुभव, एखादं अपयश, अप्रिय घटना.... आपली सीमा ठरू शकत नाही. भूतकाळाच्या सावलीतून बाहेर पडणं हेही सीमोल्लंघन आहे.

मला अमुक गोष्ट जमणारच नाही असं असं म्हणून आपण स्वतःला सीमेत अडकवत असतो. स्वतःविषयी किती शंका असतात आपल्याला. आपण स्वतःच स्वतःला कमी समजतो. आपल्याकडे आत्मविश्वास आणि अहंकार या दोन भावनांमध्ये बरेचदा गल्लत होते. अहंकार नकोच; पण स्वतःवरचा विश्वास आणि स्वत्वाची जाणीव मात्र हवी.

याबाबतीत मला कुसुमाग्रजांचं ‘कोलंबसाचे गर्वगीत’ आठवतं. ‘अनंत आमची ध्येयासक्ती, अनंत अन् आशा! किनारा तुला पामराला!!’ कुसुमाग्रजांचा कोलंबस समुद्राला बजावतो, की तुला किनारा असेल, तुला बांधणाऱ्या सीमा असतील; पण माझी जिद्द आणि माझी आशा यांना

मात्र किनारा नाही, कोणत्याही सीमा नाहीत. स्वतःवर विश्वास ठेवणं, एखादी नवीन गोष्ट करून बघणं हेही सीमा ओलांडणं आहे. सीमा ओलांडायला दसऱ्याच्या मुहूर्ताची गरज आहे असंही नाही. मात्र, त्यासाठी आधी स्वतःची स्वतःला छान ओळख व्हायला हवी. आपल्या मर्यादा नेमक्या काय आहेत, हे ओळखता यायला हवं. त्यासाठी स्वतःकडे तटस्थपणे पाहता आलं पाहिजे.

हे आपल्याला जमत नसेल, तर यासाठी समुपदेशनासारखी मदत घ्यायलाही हरकत नाही. आपण नेमके कुठे कमी पडतो आहोत, आपली परिस्थिती आपल्या अडवते आहे, आपण संवाद साधायला कमी पडतो आहोत, की आपल्याला स्वतःत काही बदल घडवायचे आहेत, अशा पद्धतीच्या प्रश्नांची उत्तरं शोधायला हवी.

याबाबतीत अनेकदा आपल्या सहवासात असलेली माणसं आपल्याला मदत करू शकतात. त्यांना विचरता येईल, की माझ्या काय मर्यादा आहेत? अर्थात त्यांचं उत्तर ही टीका आहे असं न मानता त्यातून आपल्या मर्यादा जर ओळखता आल्या, तर आपण थेट मुळावर इलाज करू शकतो. आपल्याला नेमकं काय थोपवतं आहे हे कळलं म्हणजे त्याचा इलाज करणं सोपं जातं.

सीमा ओलांडून जाणं म्हणजे नवीन प्रांतात जाणं.... आपल्या कम्फर्ट झोनच्या बाहेर जाणं.... पण त्यातच साहस आहे.... आणि कधी न अनुभवलेली मज्जासुद्धा.... हे ध्यानात ठेवूया. सीमांच्या पलीकडच्या असीम आनंदाचा अनुभव घेऊया...

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.