दत्तात्रेयांनी जिथे प्रत्यक्ष निवास केला आहे असे ठिकाण पर्वतशिखरांचा समूह म्हणजे श्रीगिरनार होय. दत्त भक्तांसाठी हे ठिकाण खास आहे. दत्त जयंतीच्या दिवशी तर इथे अनेक भक्तांची मादियाळी जमते. गिरनार पर्वतावर नवनाथ महाराजांपैकी नेमिनाथ भगवान यांचेही मंदिर आहे.
श्रीरामाचे तसेच पांडवांचे वास्तव्य या पर्वतावर झाल्याचे दाखले पुराणांत मिळतात. पुराणांमध्ये याचा श्वेताचल, श्वेतगिरी अशा नावाने उल्लेख आढळतो. तर गिरनार हा हिमालयापेक्षाही प्राचीन असल्याचा संदर्भ मिळतो. वरील सर्व गोष्टी गिरनारच्या दिव्यत्वाशी निगडीत आहेत. असा श्री गिरनार तेजोमय भगवान श्रीदत्तप्रभू यांचे हे अक्षय निवासस्थान आहे.
पश्चिम भारतातील गुजरात राज्यामध्ये जुनागड या शहरापासून गिरनार तळ ५ कि. मी. अंतरावर आहे. या पर्वताचा विस्तार सुमारे ४ योजनं म्हणजेच १६ गावांपर्यत आहे. सुमारे २८ चौ. कि. मी. ने व्याप्त आहे. गिरनार पर्वताचा हा परिसर अत्यंत निसर्गरम्य, विलोभनीय, वन्यप्राणी, जगताने संपन्न विविध औषधी वनस्पतीने युक्त आहे.
मृगी कुंड
महाशिवरात्रीला येथे पाच दिवसांची जत्रा भरते. तेथे मृगी कुंड आहे. शिवरात्रीच्या मेळ्याला या कुंडाजवळ भगवान महादेव मंदिरच्या दर्शनाला १० ते १२ लाख लोक जमा होतात. मृगी कुंडातील सिध्दांचे स्नान हे यातील प्रमुख आकर्षण असते.
अशी एक आख्यायिका आहे कि, स्वयं शिव या कुंडात स्नानासाठी येतात. मृगी कुंडामध्ये हे नागा साधू स्नानाला जेंव्हा उतरतात, त्या साधूंमध्ये असा एक साधू असतो, की जो मृगी कुंडात डुबकी मारल्यावर बाहेर येत नाही. अंतर्धान पावतो. तोच स्वयं शिव असतो.
अशी आख्यायिका आहे की
गिरनारवर श्रीदत्तगुरूंची तपस्या चालू होती. त्यावेळी गिरनारमध्ये प्रचंड दुष्काळ पडला. सामान्य जीवांचे प्रचंड हाल होऊ लागले. हा दुष्काळ बरेच दिवस होता. शेवटी माता अनसूयेला हे बघवेना. त्या गिरनारवर श्रीदत्तगुरूंना तपस्येतून जागृत करायला आल्या.
दत्तगुरु तपस्येत लिन होते. मातेने त्यांना जागृत करायला प्रारंभ केला आणि दत्तगुरु तपस्येतून जागृत होताना त्यांच्या कमंडलूला धक्का लागला आणि ते कमंडलू खाली पडले. खाली पडल्यावर त्याचे दोन भाग झाले. एक भाग जिथे पडला तिथे गंगा अवतीर्ण झाली तर दुसरा भाग जिथे पडला तिथे अग्नी उत्पन्न झाला. तेव्हापासून दुष्काळ संपुष्टात आला.
कोणत्याही ज्वलनशील पदार्थाशिवाय पेटते धुनी
ते तीर्थ आणि अग्नी अजूनही गिरनारवर उपस्थित आहे. आता तिथे छोटासा छान आश्रम निर्माण झाला आहे. दर सोमवारी सकाळी ६ वाजता त्या धुनिवर पिंपळाची लाकडे ठेवण्यात येतात. कापूर, रॉकेल, काडेपेटी यांचा अजिबात वापर न करता हि धुनी आपोआप दत्तकृपेने प्रज्वलित होते. हा सोहळा अतिशय बघण्यासारखा असतो.
त्यामुळे रविवारी रात्री गिरनार चढायला सुरुवात करून बरेचजण पहाटे कमंडलू कुंड येथे हजर होतात. लाकडाने आपोआप पेट घेतला की अवधूत चिंतन श्रीगुरुदेवदत्त चा गजर सर्वांच्या मुखातून होऊ लागतो. मग नैवैद्य वगैरे दाखवून सर्वांना जवळून दर्शन घेण्यासाठी आत सोडतात.
कमंडलू कुंडाचे पाणीच तेथे सर्व गोष्टींसाठी वापरले जाते. मुख्य कुंडातून इतर कुंडात ते पाणी साठवले जाते. महंत श्री मुक्तानंदगिरी बापू तेथील सध्याचे प्रमुख आहेत. इतर काहीजण तेथे सेवेसाठी आहेत त्यात योगेशबापू हे एक प्रमुख आहेत. आश्रमाच्या वतीने सकाळी ७ ते रात्री ८ पर्यंत अखंड अन्नदान चालू असते.
चहा सुद्धा आश्रमातर्फेच उपलब्द करून देतात. १०००० पायऱ्यावर चहा, पूर्ण जेवण उपलब्ध करून देणे हे अतिशय कठीण आहे. प्रचंड वारा, कडक ऊन, धुवांधार पाऊस अशा अतिशय विपरीत परिस्थितीत हे सर्वजण विनामोबदला अहोरात्र सेवा बजावत असतात.
सध्या धुनिवर ठेवण्यासाठी पिंपळाचे लाकूड मिळणे कठीण जात आहे. पंचक्रोशीत फिरून पिंपळाचे झाड विकत घेऊन त्याचे तुकडे करून गिरनार पायथ्याशी आणले जाते व इथून स्थानिक माणसांकडून वर आणले जाते.
कमंडलू कुंड, धुनी आणि आश्रम यांची महती वर्णन करावी तेवढी कमीच आहे. वर्णन करण्यास शब्द अपुरे पडतात. एकदातरी गिरनारवर जाऊन हा अनुभव प्रत्येकाने घ्यावाच!
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.