एक जाज्वल्य दत्तावतार म्हणजे सन १८५४ ते १९१४ ह्या काळात होऊन गेलेले परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमत् वासुदेवानंद सरस्वती (टेंबे) स्वामी महाराज होय. श्री क्षेत्र माणगाव येथे श्री हरिभट टेंबे या दत्तोपासकाचे वास्तव्य होते. त्यांचे थोरले चिरंजीव श्री. गणेशपंत टेंबे हे मुळचेच विरक्त होते. वडिलांच्या दत्तभक्तीचा वारसा श्री. गणेशपंतांनी उचलला होता. ते दररोज श्री दत्तपादुकांची पूजा व श्रीगुरुचरित्राचे वाचन करीत असत.
श्रीनृसिंहसरस्वती स्वामी महाराजांच्या आशीर्वादाने श्रावण शुद्ध षष्ठीला श्रीदत्तरूपाने श्री गणेशपंत टेंब्यांच्या घरी अवतार घेतला. नवजात बालकाचं बाराव्या दिवशी थाटात बारसं झालं आणि बाळाचं नाव ‘वासुदेव’ ठेवण्यात आलं. बालपणापासूनच प्रगल्भ बुद्धिमत्ता आणि तेजस्वी वाणी असणाऱ्या वासुदेवांची छाप कोणावरही चटकन पडत असे. लहानपणीच वेद मुखोद्गत करून सर्व शास्त्रांचं अध्ययन त्याने केलं होतं. वयाच्या बाराव्या वर्षी दशग्रंथी ब्राह्मण म्हणून ते प्रसिद्ध झाले.
दत्त सांप्रदायातील इतर महाराजांसोबतच टेंबेस्वामीही प्रसिद्ध गुरू आहेत. टेंबेस्वामींनी दत्तसांप्रदायाचा प्रसार केलाच. पण अनेक चमत्कार दाखवून त्यांनी भक्तांचा उद्धारही केला. स्वामींच्या खाजगी आयुष्यात अनेक चढउतार त्यांनी पाहिले. त्यांचा विवाह झाला. त्यानंतर पती गर्भवती राहीली आणि तिला मृत बाळ जन्माला आले. त्यानंतर पत्नीही निवर्तीली. त्यानंतर महाराजांनी उरलेलं संपूर्ण आयुष्य दत्त भक्तीत व्यतित करण्याचा निर्णय घेतला.
टेंब्ये स्वामींचे संन्यास घेतल्यानंतरचे नाव श्री वासुदेवानंद सरस्वती असे होते. धर्माशास्त्राचे सारे नियम ते काटेकोरपणे पाळीत. भिक्षाटन करीत. त्यांचे अखंड भ्रमण चाले. स्वामी गावागावांतून प्रवचने करीत. त्यांनी गुरुचरित्राची अनेक पारायणे केली, अनेक तीर्थयात्रा केल्या. अति-अवघड अशी व्रते केली आणि अनुभूती व अनुभवातून जे ज्ञान प्राप्त झाले ते उपदेशरूपाने साधकांना सांगत असत. श्री दत्तमाहात्म्य, श्रीगुरुदेव चरित्र, शिक्षात्रयम्, श्री दत्तचंपू, श्रीसत्यदत्त पूजाकथा, नित्य उपासनाक्रम अशी श्री महाराजांची ग्रंथसंपदा खूप मोठी आहे.
पूज्य टेंबे स्वामी यांच्या उपदेशाचे थोडक्यात सार असे, ‘सर्व भरतखंडात पायीच संचार करून उपदेश करावा, ईश्वरनिष्ठा व स्वधर्मनिष्ठा जागृत करावी,’ हा श्रीदत्तात्रेयांचा आदेश शिरोधार्य मानून त्यांनी भारतभर तेवीस चातुर्मास केले. संपूर्ण महाराष्ट्र, उत्तर भारत आणि गुजरात क्षेत्रात त्यांचा विशेष संचार होता.
यावरून त्यांच्या संचाराची व्याप्ती समजून येईल. माणगाव, वाडी, ब्रह्मावर्त व गरुडेश्वर असतानाच ज्येष्ठ वद्य ३० शके १८३६ या दिवशी रात्री श्रीदत्तात्रेयाच्या समोर उत्तराभिमुख अवस्थेत त्यांनी निजानंदी गमन केले. गरुडेश्वराला त्यांचे समाधीमंदिर आणि दत्तमंदिर बांधलेले असून तेथे त्यांच्या पुण्यतिथीचा उत्सव मोठ्या प्रमाणात होत असतो.
श्रीस्वामी महाराजांचा शेवटचा, म्हणजे तेविसावा चातुर्मास श्रीक्षेत्र गरुडेश्वर येथे झाला. तिथे वैशाखामध्ये त्यांची प्रकृती बिघडली. ‘औषध घ्या’ असं सांगणाऱ्यांना ते म्हणाले, "या देहाला दोन वेळा महाव्याधी, दोन वेळा कोड इतके रोग उत्पन्न झाले. संग्रहणी तर कायमचीच आहे. त्या वेळी कोणी औषध दिले ? जन्मापासून ज्या वैद्याला धरले आहे तो याही वेळी आहेच. त्याची इच्छा असेल तसे होईल."
श्रीस्वामी महाराजांची श्रीनर्मदामातेवर अपार श्रद्धा होती. मातेन कुमारिकेच्या रूपात स्वामींना वेळोवेळी दर्शन दिलं होतं. ‘श्री स्वामी महाराजांनी आपल्या तीरावर वास करून आपल्याला धन्य करावे, ही मातेची इच्छा तिनेच पूर्ण करवून घेतली. मायलेकरातील हे मर्मबंध शेवटपर्यंत अतूट राहिले. आषाढ शुद्ध प्रतिपदा, मंगळवार दि. २४ जुलै १९१४, रोजी श्रीस्वामी महाराजांनी चिरविश्रांती श्रीनर्मदामातेच्या कुशीतच घेतली.
महाराजांसोबत नेहमी होती बोलणारी दत्त मूर्ती
संत नामदेवांबरोबर ज्याप्रमाणे श्रीविठ्ठल बोलत असे, त्याप्रमाणे भगवान श्रीदत्तात्रेय त्यांच्याशी संवाद साधत असत. त्यांचं संपूर्ण जीवन त्या पथप्रदर्शक श्रीदेववाणीच्या प्रकाशातच व्यतीत झालं, एवढंच नव्हे तर त्यांच्या संपर्कात जे जे आले, त्या त्या सर्वांचं जीवन त्यांनी त्या वाणीसामर्थ्याद्वारे उजळून टाकलं.
नर्मदेच्या काठावर असलेल्या गरूडेश्वर येथील मंदिरात टेंबे स्वामी महाराजांच्या मूर्तीसोबत दत्त महाराजांची एक मूर्ती देखील आहे.त्या मूर्तीचे वैशिष्ट्ये आहे की, ती ५ हजार वर्षांपूर्वीची आहे. ही मूर्ती स्वामींसोबक बोलायची. त्यांना मार्गक्रमण करण्यास सांगायची. असे उल्लेख स्वामींच्या चरित्रात आढळतात. टेंबे स्वामींची दिवसाची सुरूवात या मूर्तीच्या दर्शनाने व्हायची अन् रात्रही दत्तमूर्तीसोबत बोलतच व्हायची.
सकाळचे नित्यक्रम आटोपल्यानंतर दत्त मूर्तीसोबत चर्चा करूनच मग ते दिनक्रम काय करावा हे ठरवायचे. स्वामींनी आज कुठे भ्रमण करावे, अशी सांगणारी ही प्रवासमूर्ती नेहमीच टेंबेस्वामींच्या सोबत असायची. आजही ही मूर्ती या मंदिरात आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.