दिवाळी फराळाचा घमघमाट सर्वत्र सुटला आहे. दिवाळीचा चवदार फराळ खायला चिमुकल्यांची लगबग असते. गरमा-गरम करंजी, चटकदार चकली बनवायला घरातील पुरूषमंडळीही मदत करत असतात. पण, कितीही वर्ष फराळ केला तरी काही ना काही बिघडतंच.
दिवाळीच्या फराळामध्ये सर्वच पदार्थ बनवायला सोपे वाटत असले. तरी ते सोपे नसतात. कारण, एखाद्या पदार्थाचे प्रमाण बिघडले तर संपूर्ण पदार्थ बिघडतो. त्यामुळे, तुम्ही फराळ बनवताना काय काळजी घ्यावी याबद्दल शेफ सरिता यांनी काही खास टिप्स दिल्या आहेत. (Diwali Recipe)
दिवाळी फराळ करत असताना कुठल्या कुठल्या गोष्टींची काळजी घ्यावी, जेणेकरून तो पदार्थ बिघडणार नाही. आणि जर चुकून बिघडलास तर त्यावर काय उपाय करायचे याबद्दलही जाणून घेऊया.
कोणताही पदार्थ प्रमाण घेऊन केला तर तो परफेक्ट जमतो. पण तरीसुद्धा प्रमाण घेत असताना एक तर सर्व प्रमाण वजनाने घ्या किंवा सर्व प्रमाण वाटीने घ्या. वजनी प्रमाण घेताना काही प्रॉब्लेम येत नाही. पण प्रत्येकाच्याच घरी वजन नसतं म्हणून मग बरेच जण वाटीने वजन घेतात. पण काही पातळ पदार्थ जसे तूप,डालडा घेताना तो वितळवून घ्यायचा. म्हणजे परफेक्ट प्रमाण मिळतं.
पहिल्यांदा पदार्थ करताना थोडी भिती असते. कारण, पदार्थ बिघडेल असे वाटत असते. त्यामुळे, फराळ करताना घाबरू नका. अगदी थोड्या प्रमाणात साहीत्य घेऊन पदार्थ करून पहा आणि मग तो जास्त प्रमाण घेऊन करा. म्हणजे मनातील भिती मोडते. (Diwali Sweet Recipe)
फराळाचे पदार्थ आपण वर्षातून एकदा करतो. कारण, दिवाळी हा सणच असा आहे जो सर्वांच्या मनाला सुखद अनुभव देणारा आहे. दिवाळीत पदार्थ खराब होऊ नयेत म्हणून फराळासाठी वापरला जाणारा किराणा ताजाच असेल याची काळजी घ्या. फराळासाठी वापरणार असलेला किराणा खराब असेल तर फराळाचे पदार्थही जास्त दिवस टिकत नाहीत.
फराळामध्ये सर्वच पदार्थ असे आहेत ज्यांची पूर्वतयारी आधीच करावी लागते. अनारसे, चकली, लाडू, यांची पिठ आधीच भिजवून अन् दळून आणावी लागतात. त्यामुळे तुम्ही नियोजनबद्ध पद्धतीने फराळाचे पदार्थ बनवायला घेतले तर जास्त त्रासही होणार नाही.
शंकरपाळीचे पीठ जास्त पातळ करू नका. दूध पाण्याचा वापर जास्त करू नका, त्यामुळे शंकरपाळी कडक होते. तसेच ती तेलात विरघळते. त्यामुळे ही काळजी घ्यावी.
रवा लाडू बिघडण्याचे कारण म्हणजे पाक बिघडणे होय. अनेक महिलांना लाडूचा पाक योग्य पद्धतीने जमत नाही. लाडूसाठी बारीक रवा निवडा. तसेच तो मंद आचेवर ३० मिनिटे भाजा.
रवा लाडूला एकतारी पाक लागतो. कारण, पाक जास्त झाला असेल तर पाक वाटीमध्ये बाजूला काढून ठेवा. अन् रवा पाकात घालून घ्या. यानंतर लागला तर पाक वापरू शकता. यामुळे लाडू बिघडणार नाहीत.
बेसन कधीही जास्त प्रमाणात भाजू नका, ते थोड्या थोड्या प्रमाणात भाजले की योग्य पद्धतीने भाजले जाते अन् ते कच्चे राहत नाही. तसेच, बेसनात तूप जास्त झाले तरी लाडू बिघडतात. त्यामुळे, बेसनाचे लाडूत सुरूवातीला तूप घालू नका. बेसन भाजल्यानंतर तूप घाला.
लाडूत तूप जास्त झाले तर त्यात अधिकचे कोरडे बेसन भाजून घाला. यामुळे, मिश्रण मिळून येते आणि लाडू योग्य पद्धतीने होतात.
करंजीचे पीठ पातळ करू नका. करंजी तळत असताना मंद आचेवर तळा. कारण, करंजी हलकी असते ती पटकन तळली जाते. जास्त मोठ्या गॅसवर करंजी करपते. मऊसूत, खुसखूशीत करंजी हवी असेल तर ती पांढरट तळावी.
कुठल्याही प्रकारची शेव केली तरी त्यात सोडा वापरायाच नाही. यामुळे शेव तेलकट होते.
चकलीचे पीठ आधी भिजवून ठेवा आणि लागेल तसे मळून घ्या. पीठ अगदीच घट्ट करू नका. तसेच ते पातळही करू नका. यामुळे चकली तेलात विरघळते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.