कोरफड अजरा (रा-वार्धक्य) अमरा, तरुणी, माता, वीरा या तिच्या फक्त नावांमधूनच ती किती गुणवंत आहे हे सांगते
- डॉ. किरण पाठक
तुम्ही म्हणाल, की कोरफड ही काय बगीच्यामध्ये वाढवायची वनस्पती आहे का? तर याचे उत्तर अगदी ठामपणे हो असेच आहे. कारण कोरफड अजरा (रा-वार्धक्य) अमरा, तरुणी, माता, वीरा या तिच्या फक्त नावांमधूनच ती किती गुणवंत आहे हे सांगते.
विद्यार्थीदशेत असताना आमच्या गायनॅक वार्डमध्ये प्रसुतीनंतर ‘काळा बोळ’ नावाचे औषध दिले जात असे आणि यामुळे या महिलांना प्रसुतीनंतर होणारी पोटदुखी, अंगावरची सूज खूप झटपट थांबायला मदत होई. त्यावेळी आमच्या आयुर्वेद हॉस्पिटलला येणाऱ्या प्रसुतीरोगतज्ज्ञांना सुरुवातीला हे खूप आश्चर्य वाटायचे;
परंतु पुढे ही तज्ज्ञ मंडळीसुद्धा पेशंटला सुरुवातीला काळा बोळ द्यायला प्राधान्य देऊ लागली. हा काळा बोळ म्हणजे दुसरे तिसरे काही नसून कोरफडीच्या पानाचे रसक्रिया पद्धतीने केलेले औषधच. बाळंतपणानंतर कुमारी आसव आजही सर्रास घरोघरी दिले जाते. मृदुविरेचक, डाययुरेटिक, बलवर्धक अशा तिच्या अनेक गुणांचा फायदा यामुळे मिळतो.
सुंदर दिसण्यासाठी या कोरफडीचे अनेक प्रयोग तरुणाई करतच असते. मग ते गालावरचे डाग, मुरमाचे फोड, काळसर व्रण असो किंवा केस गळणे, केस कोरडे होणे, केसात कोंडा होणे, चेहऱ्यावरच्या सुरकुत्या असो- कोरफडीचे अनेक प्रयोग सुरूच असतात. आजकाल यासाठी ॲलोवेरा जेल, ॲलोवेरा शांपू, ॲलो क्रीम, मॉइश्चरायझर वापरले जाते.(कोरफडीमधे सॅलिसिलिक ॲसिड आहे. शिवाय ती ॲंटिसेप्टीकही आहे, हे अलीकडे समजलेले आहे.)
आयुर्वेद हॉस्पिटलमध्ये लहान मुलांमध्ये पोटात कृमी झाल्यास या काळे बोळाचे बस्ती दिले जातात. कोरफड ही विरेचक आणि कृमिनाशक आहे, मात्र बस्तीचे हे प्रयोग तज्ज्ञांच्या निरीक्षणाखालीच करावे लागतात. महिलांच्या मासिक पाळीच्या त्रासामध्ये रजोदोष नाहीसे करण्यामध्ये ही अग्रणी आहे. शिवाय आयुर्वेदातील अनेक औषधे तयार करताना कोरफड रस हे भावनाद्रव्य म्हणूनही वापरले जाते. (हिच्या रसाबरोबर औषधे घोटली जातात. उदा. वंगभस्म).
विदेशी लोकांमध्ये हिचे भयंकर आकर्षण. ॲलोवेरा जेल, ॲलोवेरा सोप, ॲलोवेरा शाम्पू, ॲलोवेरा क्रीम.. अगदी हिचा ॲलोवेरा ज्यूससुद्धा ही मंडळी प्रेमाने आणि कौतुकाने पितात आयुर्वेद उपचारांसोबत.
सोलून कोरफड पाण्यात धुता साफ बर्फ हो आपोआप काचेवाणी.. असा हा कोरफडीच्या पानातला ‘काचेवाणी’ दिसणारा गर उन्हामुळे त्वचा टॅन झाल्यास चेहऱ्यावर, डोळ्याखाली काळे वर्तुळे असतील तर डोळ्यांच्या भोवती, ओठांना क्रॅक्स येत असतील तर ओठांवर, प्रसुतीनंतर डिलिव्हरी स्ट्रेच मार्क असतील तर,
किंवा वयात येताना पडणाऱ्या स्ट्रेच मार्कवर, त्वचा कोरडी असेल तर अंगभर (स्किन हायड्रेशन वाढवण्यासाठी), मृदू मुलायम केस हवे असतील तर केसांवर, सुपर फेशियल बर्न असतील तर त्या डागांवर , वॅक्सिंग, थ्रेडिंग, प्लकिंग केल्यानंतर लाल होणाऱ्या त्वचेवर घरच्या घरी जरूर लावून पाहा. कुठलीही महागडी शाम्पू, क्रीम, मॉइश्चरायझर, जेल आणण्याचे खर्च नक्की कमी होतील. आपल्या पैशाचा पाकिटाचा आणि आरोग्याचाही बॅलन्स वाढेल.
अशी ही वयाच्या कुठल्याही टप्प्यावर अत्यंत उपयुक्त असलेली, कमी पाण्यावर वाढणारी आणि आई जसे आपले परिपूर्ण पालन पोषण करते तसे आपले आरोग्य परिपूर्ण संवर्धित करणारी कोरफड आपल्या दारी असायलाच हवी आणि आपण तिचे वेगवेगळे उपयोगही दैनंदिन करायला हवेत. नाहीतर ‘तुझे आहे तुजपाशी परी जागा चुकलासी’ असं व्हायचं आणि अमेरिकेसारख्या राष्ट्रातून नवा साज देऊन कोरफडबाई डॉलरमध्ये खरेदी करावी लागायची....
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.