- प्रतीक्षा शेळके, महिला उद्योजिका
आजकाल जागतिक हवामानबदल, त्याचे दुष्परिणाम याबाबत जगभरात सुरू असलेली चर्चा आपण सर्वजण ऐकत असतो. वायू, पाणी, ध्वनी, जमीन यांचे होणारे प्रदूषण, त्यामुळे आरोग्याला निर्माण होणारे धोके याबाबतही आपण सर्वजण काळजी व्यक्त करतो; पण यात आपलाही मोठा हिस्सा आहे, याकडे डोळेझाक करत असतो.
मात्र, काही लोक याबाबत सजगतेने विचार करतात. केवळ विचार करत नाहीत, तर पर्यावरण रक्षणासाठी आपल्या परीने प्रयत्न करतात. पर्यावरणाबाबत जागरूक असलेल्या अशाच एक तरुणीने आपली परदेशातील भरभक्कम पगाराची नोकरी सोडून तिने भारतात परत येऊन पर्यावरणपूरक वस्तू बनवण्याचा उद्योग सुरू केला आहे.
या तरुणीचे नाव आहे प्रतीक्षा शेळके. पुण्यातील या तरुणीने कोविड साथीच्या आव्हानात्मक काळात जंगल बाउंड नावाने बांबू, जुने सागवान, पाइन वृक्षाचे लाकूड यांपासून विविध वस्तू बनवण्याचा उद्योग सुरू केला.
प्रतीक्षा शेळके पुण्यातील एक उच्चशिक्षित तरुणी. मध्यमवर्गीय कुटुंबातील प्रतीक्षाच्या घरात कायमच पर्यावरण जपण्याबाबत जागरूक वातावरण होते. मेकॅनिकल इंजिनिअर झाल्यानंतर तिने अमेरिकेत जाऊन ओटोमोटिव्ह क्षेत्रात एमएस केले आणि बीएमडब्लू, जीप या कंपन्यांमध्ये डिझायनिंग, प्रॉडक्ट डेव्हलपमेंटचे काम केले.
चार वर्षांच्या या कालावधीत तिला आपण पर्यावरणाला हानी पोहोचवणाऱ्या उत्पादनांची निर्मिती करत आहोत, अशी टोचणी तीव्रतेने जाणवू लागली आणि लहानपणापासून मनात असलेला पर्यावरणपूरक उद्योग करण्याच्या इच्छेने उचल खाल्ली. कोविड साथीच्या आधी ती लाखोंचे पॅकेज असलेली नोकरी सोडून भारतात परतली आणि जुन्या लाकडापासून, बांबूपासून विविध वस्तू बनवण्याचा उद्योग सुरू करण्याचा निर्णय घेतला.
नोकरी करून साठवलेले पैसे, थोडे कर्ज आणि मुख्यमंत्री एम्प्लॉयमेंट अनुदान योजनेंतर्गत स्टार्टअपसाठी २५ टक्के मिळते, ते अनुदान अशी भांडवल उभारणी करत ५० लाखांहून अधिक गुंतवणूक करून वारजेजवळील दांगट औद्योगिक वसाहतीत तीन हजार चौरस फूट जागेवर लाकडी वस्तूंच्या उत्पादन प्रकल्पाची सुरुवात केली.
कोविड साथीमुळे यंत्रसामग्री येण्यात अडथळे आले. अशा विविध अडचणींवर मात करत जुलै २०२१ च्या सुमारास उत्पादन सुरू झाले. आज तिच्याकडे दहा कर्मचारी काम करत असून, त्यात पाच महिला आहेत. तिची वार्षिक उलाढाल आता ५० लाख रुपयांपर्यंत गेली आहे.
झाडे कापून मिळणारे लाकूड वापरून वस्तू बनवायच्या नाहीत, हे प्रतीक्षाचे मुख्य तत्त्व आहे. त्यामुळे विक्रीसाठी लागवड केलेला बांबू, वाडे, जुनी घरे पाडल्यानंतर त्यातील सागवानी लाकूड सामान कंत्राटदारांकडून विकत घेऊन त्यापासून वस्तू बनवल्या जातात. पॅकिंगसाठी वापरले जाणारे बॉक्स त्यासाठी पाईन वूड वापरले जाते. ते भंगार विक्री करणाऱ्या व्यापाऱ्याकडून विकत घेतले जाते.
कटिंग बोर्ड, पेन स्टँड, होल्डर अशा नानाविध वस्तू बनवल्या जातात. ती स्वतः अनेक वस्तूंचे डिझाईन करून त्याचे उत्पादन करते. त्यासह काही कंपन्या, संस्था किंवा व्यक्ती आपली डिझाईन देऊन त्या बनवून घेतात. ब्रिजस्टोन, सँडविक अशा कंपन्या तिची उत्पादने नियमितपणे विकत घेतात.
टाटा मोटर्स,रॉयल एनफिल्ड आदी ब्रँडच्या पुण्यातील वितरक कंपन्याही आपल्या कर्मचाऱ्यांना देण्यासाठी भेटवस्तू म्हणून विविध वस्तू बनवून घेतात. वनराईसारख्या काही संस्था, पर्यावरणपूरक वस्तू विक्री करणारी काही दुकाने ही उत्पादने ग्राहकांपर्यंत पोहोचवतात. जंगल बाउंडची स्वतःची वेबसाईट आहे. त्यावरूनही या वस्तू खरेदी करता येतात.
आता पर्यावरणपूरक वस्तू वापरण्याकडे लोकांचा कल वाढत आहे. त्यामुळे मागणी वाढत आहे. आणखी पर्यावरणपूरक कच्च्या मालाचा वापर करून नवनवीन वस्तू तयार करण्याचा तिचा मानस आहे. तिच्या कामाची दखल घेऊन तिला शाळा, महाविद्यालये, संस्थांमध्ये मुलांना जागरूक करण्यासाठी बोलावले जाते. ही तिच्यासाठी खूप मोठी बाब आहे.
तिच्या वडिलांच्या पाकीटात त्यांच्या कार्डपेक्षा तिची कार्डे अधिक असतात. ते अतिशय अभिमानाने तिच्या वस्तूंची माहिती लोकांना देतात. हा तिच्यासाठी मोठा सन्मान आहे. घरच्यांनी दिलेल्या पाठिंब्यामुळे ती आपले स्वप्न,आवड पूर्ण करू शकली आहे, असे प्रतीक्षा आवर्जून सांगते. पुढे कायम मागणी राहतील अशी दोन ते तीन उत्पादने बनवण्याची तिची योजना आहे. लोकांमध्ये जागरूकता वाढण्याची गरज आहे.
आजही सात आसनी गाडी घेऊन एकटा माणूस प्रवास करतो. या आणि यांसारख्या अनेक कृतीमुळे आपण प्रदूषणात किती भर घालतो आहोत, याची जाणीवही अनेकांना नसते. ही मानसिकता बदलणे गरजेचे आहे, तरच पुढील पिढीला चांगले पर्यावरण मिळेल, असे तिला वाटते.
(शब्दांकन : प्राची गावस्कर)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.