Anger control: सध्याचे विशेष करून कोरोना संसर्गानंतरच्या काळात जीवन आणखी धावपळीचे आणि धकाधकीचे झाले आहे. त्याचबरोबर कामाचा ताणही वाढला आहे. या ताणतणावातून राग येण्याचे प्रमाणही वाढले आहे.
त्यात अगदी लहानांपासून ते ज्येष्ठ व्यक्तीपर्यंतच्या सर्वांचाच समावेश आहे. या पार्श्वभूमीवर रागावर नियंत्रण ठेवण्यासह चांगल्या आरोग्यासाठी ताणतणावमुक्त जीवनशैलीचा प्रत्येकानेच अवलंब करायला हवा, असा सल्ला या क्षेत्रातील तज्ज्ञ देतात.
सध्याच्या परिस्थितीत चिडचिडेपणा, आदळआपट, दुसऱ्यांचे ऐकून न घेण्याची प्रवृत्ती वाढत चालली आहे. रागाच्या भरात एकमेकांचे संबंध बिघडण्यासह बदला, तोडफोड, हाणामारी ते अगदी अप्रिय घटना घडतात, हे समाजात वावरताना दिसतेच. वेगवेगळ्या कारणांमुळे आपल्याला राग येऊ शकतो, असे मानसोपचारतज्ज्ञ डॉ. प्रणद जोशी यांनी सांगितले.
आपण स्वतः अनुभवत असलेल्या कठीण परिस्थितीमुळे किंवा भूतकाळात घडलेल्या काही घटनांमुळे रागाची निर्मिती होऊ शकते. बऱ्याच वेळा परिस्थितीचा चुकीच्या पद्धतीने अर्थ लावल्याने आपल्याला राग येऊ शकतो.
आपल्याला राग कधी येतो आणि त्यावर आपण काय प्रतिक्रिया देतो, हे जीवनातील अनेक घटकांवर अवलंबून असते. आपले बालपण, संगोपन व त्या वेळची परिस्थिती, भूतकाळातील अनुभव, वर्तमानातील सुरू असलेल्या गोष्टी जसे की ताणतणाव, अन्यायकारक परिस्थिती, शोक, वाईट घटना, मनाविरुद्ध करावे लागणारे कार्य यातूनही रागाची निर्मिती होते.
मानसिक आरोग्य समस्या (उदा. नैराश्य, चिंतारोग किंवा मनोविकार) दीर्घकालीन शारीरिक व्याधी, अपुरी झोप, व्यायामातील अनियमितता व ताणतणाव तसेच कामाचे व्यवस्थित नियोजन न करणे आदी गोष्टीही रागास कारणीभूत ठरतात, असे डॉ. जोशी यांनी सांगितले.
चिंता, क्रोध मागे सारा..ताटी उघडा ज्ञानेश्वरा..
संत ज्ञानेश्वरांना सुरवातीच्या आयुष्यात अनेक संकटांना सामोरे जावे लागले. कुणीतरी हिणवल्याने त्यांनी झोपडीचे दार लावून घेतले होते. त्यावेळी त्यांची बहीण संत मुक्ताबाई हिने ज्ञानेश्वरांना ताटीच्या अभंगातून बोध केला. संत मुक्ताबाईंनी ज्ञानेश्वरांना रागातून मुक्त होण्याचे आवाहन करत जागृत केल्यामुळे आपणास ‘ज्ञानेश्वरी’ मिळाली. विश्वाचे कल्याण व्हावे, यासाठी ज्ञानेश्वर माऊलींनी ईश्वराकडे पसायदान मागितले.
चिंता, क्रोध मागे सारा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा
योगी पावन मनाचा, साही अपराध जनाचा
जीभ दातांनी चावली, कोणी बत्तीशी तोडली
मन मारूनी उन्मन करा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा
शंकर बोंगाणे,
संत साहित्याचे अभ्यासक, नांदेड
मुलांनो नका येऊ रागात, जाऊ फुलांच्या बागांत!
मुलांनो, नव्हे..! मला तुम्हाला फुलांनो म्हणायला आवडेल. तुम्ही फुलांसारखेच सुंदर आहात ना दिसायला आणि मनानेही..तुम्ही कोणावरही रागावू नका. तुमच्यातील राग आणि रागामागची आग कमी करायची असेल तर वेळ मिळेल तेव्हा फुलांमध्ये रमा... फुलपाखरू व्हा! आता पाऊस पडतोय. शेतकरी पेरणी करीत आहेत.
त्यांच्यासोबत शेतात जा. ते कसे पेरतात ते पहा. तुम्हीही पेरा. आनंद मिळेल! पेरल्यानंतर पाऊस पडला नाही अन् पीक वाया गेले तर शेतकरी नाराज होईल पण ढगांवर रागावून बसत नाही.
शेतीच करायचे सोडून देत नाही. तो पुन्हा कामाला लागतो. पेरणी करतो. त्यांचा हा न रागावण्याचा गुण आपणही घेतला पाहिजे. शाळेत मैदानावर उत्साहाने खेळा. सर्व स्पर्धांमध्ये भाग घ्या.
जिंकलात तरी हरलेल्या मित्राला तुम्ही जिंकलेल्या फुलांमधलं एक फूल द्या.. त्याला आनंदी करा. तुम्ही हरलात तरीही जिंकलेल्या मित्राला फूल देऊन सत्कार करा! यामुळे जिंकलेल्या आनंदापेक्षाही मोठा आनंद यातून मिळेल! आपले मनही मोठे होईल. रागाला थारा राहणार नाही.
दत्ता डांगे, बालसाहित्यिक, नांदेड.
रागावर नियंत्रण मिळविण्यासाठी निरामय अशी जीवनशैली, व्यायामातील सातत्य, ध्यानधारणा, योगासने, परिवारात सुसंवाद, ज्या गोष्टी रागास कारणीभूत ठरतात त्यापासून दूर राहणे,
विचारांमध्ये सुस्पष्टता येण्यासाठी समुपदेशन व विनोद निर्मितीचा वापर करू शकतो. अचानक येणाऱ्या रागावर नियंत्रणासाठी मनातल्या मनात उलटे अंक मोजणे, दीर्घ श्वासोच्छ्वास घेणे, प्रतिक्रिया किंवा खुलासा करणे टाळणे आदी उपाय प्रभावी ठरतात.
- डॉ. प्रणद जोशी, मानसोपचारतज्ज्ञ, नांदेड.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.