- फारूक काझी, बालमानसविषयक साहित्यिक
पालक म्हणून जेव्हा आपण आपलं आत्मपरीक्षण करत असतो, तेव्हा आपणाला जाणवतं, की आपल्याही काही चुका होत असतात. आपणही पालक म्हणून कमी पडत असतो. आपण मुलांकडून जेवढ्या अपेक्षा करतो, तेवढ्या किंवा त्यापेक्षा कमी प्रमाणात तरी आपण आपलं परीक्षण करतो का? आणि केलं तर त्यात सुधारणांसाठी आपण काय काय केलं पाहिजे याचा विचार करतो का?
बरेच पालक स्वत:हून काही गोष्टी करतात. पालक म्हणून आत्मविश्वास यावा म्हणूनही काही गोष्टी केल्या जातात. पालक म्हणून आपणाला आत्मविश्वास असायला हवा. नसेल तर तो कमवावा लागेल. आपण आपल्या आसपास अशा पालकांना पाहत असतो, जे खूप समंजसपणे आपल्या मुलांशी वागत असतात. हा समंजसपणा, हा आत्मविश्वास येतो कुठून? काही गोष्टी आजच्या लेखात समजून घेऊ या.
पालक म्हणून आत्मविश्वास वाढवणाऱ्या पायऱ्या
मूल समजून घेणं : पालक म्हणून आपण पहिल्यांदा आपलं मूल समजून घेतलं पाहिजे. आपल्या मुलाचं वय, त्या वयाची वैशिष्ट्ये, त्यांचा स्वभाव, आवडी निवडी, सवयी, आजार इत्यादींविषयी आपणाला माहिती असली पाहिजे. बरेचदा मूल वयाचा एक टप्पा पार करून पुढच्या टप्प्यात जातं; पण पालकांना त्याबबत अजिबात माहिती नसते. मग सुरू होतात समस्या. आपलं मूल कसं आहे हे ज्या पालकांना पक्कं ठाऊक असतं तिथं सहसा समस्या उद्भवत नाहीत. उद्भवल्या तरी फारकाळ टिकत नाहीत.
आत्मपरीक्षण : आपलं वागणं, आपल्या सवयी याबाबत आपण सातत्यानं आत्मपरीक्षण करत राहायला हवं. आत्मपरीक्षण आणि जागरूक पुनर्विचार आपणाला एक चांगला पालक होण्यासाठी मदत करत असतात. एखाद्या प्रसंगी आपण कसं वागलो? आपलं वागणं योग्य होतं का? की केवळ रागाच्या भरात आपण तसं वागलो? आपण आपली चूक मान्य केली पाहिजे आणि त्यात दुरुस्तीही केली पाहिजे. कारण चुका दुरुस्त नाही झाल्या, तर पुढे अडचणी वाढत जातात आणि मूल-पालक यांच्यात अंतर यायला लागतं. बरेचदा लहानपणी पालकांकडून दुखावली गेलेली मुलं मोठेपणी पालकांपासून दूर जाताना दिसतात.
सल्ला, समुपदेशन : जागरूक पालक सातत्याने आत्मपरीक्षण करत असतात आणि जाणकारांचा सल्ला घेत असतात. गरज पडलीच तर योग्य समुपदेशनही घेत असतात. आपल्याकडे पालकांचे समुपदेशन हा प्रकार फारसा प्रचलित नाही. कारण मुलंच चुकतात, पालक चुकत नाहीत ही घट्ट धारणा त्यामागे असते. आपणाला पालक म्हणून आत्मविश्वास यावा असं वाटत असेल, तर योग्य व्यक्तींचा सल्ला किंवा समुपदेशन घेण्यास काहीच हरकत नाही. परंतु संबंधित व्यक्ती त्याविषयाची जाणकार असली पाहिजे. समुपदेशनाने आपल्या समस्या सुटायला मदतच होते.
मुक्त संवाद : आपली मुलं, कुटुंबातील इतर व्यक्ती, मित्र, संपर्कातील व्यक्ती यांच्याशी आपला मुक्त संवाद असला पाहिजे. मुलं तुमच्याकडे बघून शिकत असतात. तेव्हा तीही मुक्त वातावरणात वाढतील आणि स्वत:ला मुक्तपणे व्यक्त करत राहतील. मुलांना बोलायला कुणी नाही, घरात अतिकडक शिस्त आहे, अशा वातावरणात मुलांची निरोगी वाढ होत नाही.
तेव्हा असा मुक्त संवाद घडायला हवा. घरात मैत्रीपूर्ण वातावरण असायला हवं.
पुस्तकं : अलीकडे एक खूप चांगली गोष्ट घडते आहे. पालक वाचत आहेत. पालक म्हणून आपल्याकडे कोणतीही पूर्वतयारी नसते, कुठलाही कोर्स नसतो, की समज वाढवणारं कोणतं माध्यम. तेव्हा पुस्तकं हा चांगला पर्याय आपल्याकडे उपलब्ध आहे. पुस्तकं, वर्तमानपत्रातील लेख, पालकांसाठीच्या कार्यशाळा, पालकांसाठीचे वेबिनार इत्यादी माध्यमातून आपण आपल्या पालकत्वाला अधिक आत्मविश्वासपूर्ण बनवू शकतो.
पालक म्हणून आत्मविश्वासू वाढवणाऱ्या याहून अधिक पायऱ्या असू शकतात. आपण यात भर घालत राहू या. पालक म्हणून आपण आपला हा प्रवास एंजॉय करायचा आहे. तेव्हा प्रवासात चढउतार येतच राहतील. परंतु आपला आत्मविश्वास ढळू न देता आपणाला ‘चांगला पालक’ व्हायचं आहे हे कायम लक्षात असू द्या.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.